‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्र आणि भारत
भारताने ‘अग्नी ५’ या आंतरखंडीय ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्राची (मिसाईलची) चाचणी घेतली. या चाचणीत ‘अग्नी ५’ने रात्रीच्या अंधारात ठरलेल्या मार्गाने ५ सहस्र ४०० किलोमीटरहून अधिकचा पल्ला पार करून लक्ष्यभेद केला. भारताने ही चाचणी यशस्वी झाल्याचे जागतिक पातळीवर स्पष्ट केले आहे. या चाचणीनंतर पुन्हा एकदा भारताची क्षेपणास्त्रे आणि ‘हायपरसॉनिक’ क्षमता यांविषयी चर्चा चालू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्नांचा घेतलेला आढावा !
१. ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्र म्हणजे काय ?
ध्वनीचा वेग आहे १ सहस्र २२५ किलोमीटर / प्रतिघंटा (समुद्रसपाटीवर) या वेगापेक्षा जेव्हा एखादी गोष्ट अधिक वेगात प्रवास करते, तेव्हा तिच्या वेगाला ‘मॅक’ या परिमाणात व्यक्त करतात. ‘मॅक १’ म्हणजे ध्वनीचा वेग, त्याप्रमाणे ‘मॅक २’ म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट वेग. जेव्हा एखादी वस्तू ‘मॅक १’ ते ‘मॅक ५’पर्यंत प्रवास करते तेव्हा ती वस्तू ‘सुपरसॉनिक’ आहे, असे म्हणतात. उदाहरण द्यायचे झाले, तर भारताचे ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र. ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र साधारण ३ सहस्र ७०० किलोमीटर / प्रतिघंटा अशा सुपरसॉनिक वेगाने प्रवास करते. त्याचा हाच वेग त्याला जगातील सगळ्यात वेगवान ‘क्रूझ’ क्षेपणास्त्र बनवतो.
फोर्स (शक्ती) = व्हेलॉसिटी (वेग) X मास (वस्तूमान)
हे साधे सूत्र आपण लक्षात घेतले, तर कळेल की, ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र का घातक आहे ? या सूत्रावरून स्पष्ट होते की, जेवढा वेग अधिक तेवढी क्षेपणास्त्राची शक्ती अधिक ! त्यामुळे ‘ब्राह्मोस’चे वस्तूमान अल्प असले, तरी त्याची शक्ती त्याच्या वेगामुळे प्रचंड आहे. त्यामुळेच एक ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र एखाद्या मोठ्या जहाजाचे एका झटक्यात दोन तुकडे करू शकते.
वेग जेवढा अधिक तेवढा प्रतिकारासाठी वेळ न्यून मिळतो. याचाच अर्थ जर आपण एखाद्या क्षेपणास्त्राचा वेग वाढवत नेला, तर त्याची शक्ती आपोआप वाढत जातेच; पण त्याला थोपवण्याचा किंवा प्रतिकार करण्याची संधी जवळपास नष्ट होते. त्यामुळेच ‘मॅक ५’ या वेगाच्या पुढे प्रवास करणार्या क्षेपणास्त्रांना ‘हायपरसॉनिक’ असे म्हटले जाते. जगातील सगळी आंतरखंडीय ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्रे ही ‘हायपरसॉनिक’ आहेत. भारताचे ‘अग्नी ५’ हे आपल्या ‘टर्मिनल फेज’ (मुदतीच्या टप्प्यात)मध्ये ‘मॅक २४’ म्हणजे २९ सहस्र ६०० किलोमीटर / प्रतिघंटा वेगाने लक्ष्याकडे झेपावते.
२. भारताकडे ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान आहे का ?
याच उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असे आहे; कारण भारताकडे आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत; पण त्याच वेळी इतर पद्धतीची क्षेपणास्त्रे नाहीत. आंतरखंडीय क्षेपणास्त्राखेरीज ३ वेगळ्या पद्धतीने आपण ‘हायपरसॉनिक’ वेग गाठू शकतो. त्या पद्धती पुढीलप्रमाणे –
अ. ‘एरो बॅलेस्टिक’ : यात ही प्रणाली (सिस्टीम), म्हणजे क्षेपणास्त्र विमानातून डागले जाते. ते डागल्यानंतर रॉकेटच्या साहाय्याने ‘हायपरसॉनिक’ वेग गाठला जातो. रशिया-युक्रेन युद्धात रशियाने ज्या ‘किंझ्हल हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राचा वापर केला. ती याच तत्त्वावर कार्य करतात.
आ. ‘ग्लाईड व्हेईकल’ : यात या प्रणालीला रॉकेटच्या साहाय्याने वरच्या वातावरणात नेण्यात येते आणि मग तिथल्या वातावरणात ग्लाईड करत आणि स्वतःच रस्ता पालटवत ‘हायपरसॉनिक’ वेगाने लक्ष्यावर आक्रमण करते. चीनचे ‘डोन्गफेंग १७’ आणि रशियाचे ‘एव्हनगार्ड’ क्षेपणास्त्र याच तत्त्वावर कार्य करते. काही दिवसांपूर्वी भारताच्या ‘इस्रो’ने ‘इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ’च्या साहाय्याने ‘हायपरसॉनिक ग्लाईड व्हेईकल’ची चाचणी केली आहे. भारत यावर अतिशय वेगाने काम करत असून येणार्या काळात देशाकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध झालेले असेल किंवा अशा पद्धतीचे ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्र असेल.
इ. ‘क्रूझ’ क्षेपणास्त्र : यामध्ये भारत इतर देशांपेक्षा पुढे असल्याचे अनेक संरक्षण संघटनांचा अहवाल आहे. ‘ब्राह्मोस’ या ‘सुपरसॉनिक’क्षेपणास्त्राची पुढची आवृत्ती (व्हर्जन) ज्याला ‘ब्राह्मोस २’ किंवा ‘ब्राह्मोस के’, असे ओळखले जाते, ते जवळपास भारताने बनवले असल्याचे स्पष्ट होते आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेच्या अहवालानुसार ‘भारत २०२५ पर्यंत ‘हायपरसॉनिक क्रूझ’ क्षेपणास्त्र जे जवळपास १० सहस्र किलोमीटर / प्रतिघंटा किंवा ‘मॅक ८’ वेगाने जाणारे असेल की, जे भारताच्या भात्यात समाविष्ट झालेले असेल’, असा अंदाज आहे. इतका प्रचंड वेग गाठण्यासाठी क्षेपणास्त्राला पहिल्या टप्प्यात ‘बूस्टर’च्या साहाय्याने ‘हायपरसॉनिक’ वेग दिला जातो. त्यानंतर ‘मिसाईल स्क्रेमजेट (इंजिनाचा प्रकार)’ तंत्रज्ञानाचा वापर करत आपला वेग शेवटपर्यंत ठेवते. यासाठी लागणारे तंत्रज्ञान भारताने रशियाच्या साहाय्याने मिळवले आहे, असे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालात स्पष्टपणे म्हटलेले आहे.
३. ‘हायपरसॉनिक क्रूझ’ क्षेपणास्त्रामध्ये भारताची घौडदौड
‘हायपरसॉनिक क्रूझ’ क्षेपणास्त्र जगातील युद्ध नीती पालटवणारे असेल, असे अनेक तज्ञांचे मत आहे. याला कारण म्हणजे भारताच्या ‘ब्राह्मोस सुपरसॉनिक’ क्षेपणास्त्राची अचूकता आणि दाहकता. जर ‘ब्राह्मोस’ सुपरसॉनिक वेगात इतका प्रचंड विध्वंस करू शकते, तर त्याच्या ३ पट वेगाने विध्वंसाची तीव्रता काय असेल ? याचा अंदाज बांधून अनेकांना धडकी भरली आहे.
वर्ष २०२५ पर्यंत भारत ३ पैकी २ पद्धतीत तरी ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्र असणारा देश असेल, याविषयी माझ्या मनात शंका नाही. जगातील मोजक्या देशांकडे ‘सुपरसॉनिक क्रूझ’ क्षेपणास्त्रे आहेत. ज्याचा मागोवा घेणे आजही जगातील क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना जमलेले नाही. त्यामुळे अवघ्या २-३ वर्षांत भारताकडे येणार्या ‘ब्राह्मोस २ हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्राला निष्प्रभ करणे अशक्य कोटीतील गोष्ट असणार आहे.
– श्री. विनीत वर्तक, अभियंता, मुंबई. (डिसेंबर २०२२)
(साभार : विनीत वर्तक यांचा ‘ब्लॉगस्पॉट’)