रेडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील यशवंतगडाला अवैध बांधकामामुळे धोका !
|
वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) – इतिहासाची साक्ष देणार्या, ‘युनेस्को’च्या सूचीत समावेश असलेल्या, तसेच ‘राज्य संरक्षित स्मारक’ असलेल्या तालुक्यातील रेडी येथील यशवंतगडाला अनधिकृत बांधकामामुळे धोका निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाच्या पायथ्याशी तटबंदीजवळ उत्खनन करून, तसेच समुद्राच्या लगत ‘सी.आर्.झेड्.’ कायद्याचे उल्लंघन करत आर्.सी.सी. बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून ‘हे बांधकाम तात्काळ हटवावे, तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा २० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल’, अशी चेतावणी शिवप्रेमींनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम पाडण्यासाठी संंबधितांना नोटीस बजावण्यात आली आहे; मात्र अशी नोटीस देऊन बांधकाम पाडले, तर अवैध बांधकाम झाल्याचे पुरावे नष्ट होणार नाही का ? या प्रकरणामुळे संबंधित विभाग अडचणीत आले असून सर्वांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशीही प्रतिक्रिया शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
गड आणि समुद्रकिनारा यांच्याजवळ बांधकाम होत असतांना संबंधित विभाग गप्प का ? – राजन रेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, कोकण विभाग
यासंदर्भात शिवप्रेमी तथा भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन रेडकर यांनी ‘गड आणि समुद्रकिनारा यांच्याजवळ बांधकाम होत असतांना संबंधित विभाग गप्प का ?’, असा प्रश्न उपस्थित केल आहे. ते पुढे म्हणाले की,
१. यशवंतगडाच्या तटबंदी शेजारी गडाच्या तटाला लागूनच गेल्या ३ ते ४ वर्षांपासून डोंगराचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकामामुळे पर्यावरण, सी.आर्.झेड्. आणि पुरातत्व विभाग यांच्या कायद्यांचे उल्लंघन झाले आहे.
२. या बांधकामासाठी मालक, ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक, तसेच यासाठी अनुमती देणारे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, महसूल विभागाचे शिरोडा मंडळ अधिकारी, रेडीचे तलाठी, कोतवाल हे संबंधित उत्तरदायी आहेत.
३. बांधकामाविषयीच्या पुराव्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि संबंधित विभाग यांच्याकडे २३ जानेवारी २०२३ या दिवशी तक्रार प्रविष्ट केली आहे. तक्रारीनंतर २ फेब्रुवारी २०२३ या दिवशी संबंधित व्यक्तीला अनधिकृत बांधकामाविषयी नोटीस देऊन अकृषिक अनुमतीची प्रत आणि इतर संबंधित खात्यांची अनुमती घेतल्याची प्रत सादर करेपर्यंत बांधकाम थांबवण्यात आले आहे.
४. या प्रकरणी आर्थिक हितसंबंध जपत संघटितपणे केलेल्या गुन्हेगारी कृत्याशी संबंधित असणार्यांवर जोपर्यंत नियमान्वये कायदेशीर फौजदारी कारवाई होत नाही, तोपर्यंत यशवंतगडाच्या पायथ्याशी २० फेब्रुवारी पासून शिवप्रेमी ‘बेमुदत आमरण उपोषण’ करणार आहेत.
वर्ष ६१० मध्ये चालुक्य राजाने केली होती यशवंतगडाची निर्मिती !इसवी वर्ष ६१० ते ६११ या कालखंडात चालुक्य राजाने रेडी येथे यशवंतगडाची निर्मिती केली होती. नंतरच्या काळात हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी कह्यात घेतला. अनेक देशी-विदेशी पर्यटक या गडाला भेट देतात. या गडावर शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिवप्रेमींकडून या गडाची स्वच्छताही केली जाते; मात्र सध्या गडाच्या परिसरातील अनधिकृत बांधकामामुळे गडाची तटबंदी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे गड-दुर्गांवरील अवैध बांधकाम हटवण्याचा प्रयत्न शासन करत असतांना दुसरीकडे यशवंतगडाच्या जवळच नियम मोडून बांधकाम चालू आहे. |
संपादकीय भूमिका
|