प.पू. दास महाराज यांचा डॉ. भरत बुगडे आणि सौ. मांडवी बुगडे यांना लाभलेला चैतन्यमय सत्संग आणि त्यांनी अनुभवलेली प.पू. दास महाराज यांची प्रीती !
प.पू. दास महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. भरत आणि सौ. मांडवी बुगडे यांनी अनुभवलेली प.पू. दास महाराजांच्या प्रीतीविषयीची सूत्रे पाहूया.
१. साधिकेचे लग्न झाल्यावर ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात रहाण्यास जाणे, तेथे आजूबाजूला साधक नसणे, सेवा अल्प होणे, याविषयी तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करणे आणि तिला अनेक संतांच्या भेटी घडणे
‘मी (सौ. मांडवी बुगडे) मुंबई येथे असतांना सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार सेवा चालू केली. मी अनेक सेवांमध्ये सहभाग घेतला आणि दायित्व घेऊन सेवा केल्या. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत. ते मला शिकवत आहेत’, असे मला जाणवायचे.
माझे लग्न झाल्यावर मी तळवदे, जिल्हा सिंधुदुर्ग येथे रहाण्यास गेले. माझे यजमान (डॉ. भरत बुगडे) साधक आहेत; परंतु आमच्या घराच्या आजूबाजूला साधक किंवा नातेवाईक नव्हते. मी यजमानांच्या समवेत सत्संगाला आणि सेवेला कधीतरी जात असे. माझ्याकडून पूर्वीसारखी सेवा होत नव्हती. याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन केले. त्यांच्या कृपेने मला प.पू. विनायक राऊळ महाराज, शिरोडा तालुक्यातील पू. गोगटेगुरुजी, प.पू. परुळेकर महाराज, प.पू. भाऊ मसुरकर, प.पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. माई (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक) या संतांच्या भेटीचा योग आला. या संतांनी माझी आत्मीयतेने विचारपूस केली आणि माझ्यावर प्रीतीचा वर्षाव केला. मी या संतांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रीती अनुभवली.
२. बुगडे दांपत्याला प.पू. दास महाराज यांचा लाभलेला सत्संग
२ अ. प.पू. दास महाराज यांची भेट होणे, त्यांनी साधक दांपत्याच्या घरी येणे आणि त्यांनी ‘वास्तुशांत न झाल्याने घरात त्रास जाणवत आहे’, असे सांगणे : सावंतवाडी येथे एका साधकाच्या घरी आम्ही प.पू. दास महाराज यांना भेटलो. त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही त्यांच्या बांदा, पानवळ येथील आश्रमात गेलो. त्यानंतर प.पू. दास महाराज आमच्या घरी आले. तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘या वास्तूत तीव्र त्रास आहे. वास्तुशांत केली आहे का ?’’ माझ्या सासर्यांनी त्यांना वास्तुशांत केली नसल्याचे सांगितले.
२ आ. घरी वाद झाल्यामुळे साधक दांपत्य भाड्याच्या घरात रहायला जाणे : काही मासांनी आमच्या घरात वाद झाला. त्यामुळे आम्ही पती-पत्नी घराबाहेर पडलो. आम्ही भाड्याच्या घरात राहिलो. याविषयी आम्ही प.पू. दास महाराज (प.पू. बाबा) यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘जे झाले, ती देवाचीच इच्छा होती. काही काळजी करू नका. जेथे वास्तुशांत झाली नसेल, त्या वास्तूमध्ये अनिष्ट शक्तींचा वावर असतो. वास्तुपुरुष घराचे रक्षण करतो. ’’
३. प.पू. दास महाराज यांनी साधिकेवर केलेला प्रीतीचा वर्षाव !
३ अ. प.पू. दास महाराज यांनी साधिकेला मुलीचे प्रेम देणे : प.पू. बाबांचे आमच्यावर पूर्ण लक्ष असल्याचे आम्ही अनुभवले. मला त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम दिले. त्यांनी मला एकटेपणा जाणवू दिला नाही. प.पू. दास महाराज आणि पू. माई (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक) यांनी आमच्याशी एवढी जवळीक साधली की, ‘आम्ही त्यांच्या कुटुंबातीलच सदस्य आहोत’, असे आम्हाला वाटत असे. आमची पू. माईंच्या माहेरच्या लोकांशीही जवळीक झाली होती. प.पू. बाबा म्हणतात, ‘‘मांडवी पूर्वजन्मात आमची मुलगी असणार.’’
३ आ. प.पू. बाबांनी साधिकेला तिच्या वाढदिवसाला दर्शन देणे : एकदा प.पू. बाबा यज्ञासाठी जाणार होते. तेथे जाण्यापूर्वी ते आमच्या घरी आले. ते आमच्या घरी थोडा वेळ थांबले. त्यांनी पू. माईंनी दिलेले एक पाकीट माझ्याकडे (सौ. मांडवी यांच्याकडे) दिले. नंतर काही वेळाने माझ्या लक्षात आले, ‘आज माझा वाढदिवस आहे.’ वाढदिवसाच्या दिवशी प.पू. बाबांचा सत्संग लाभल्याने मला आनंद झाला.
३ इ. साधिकेला गर्भारपणात चैतन्य मिळावे, यासाठी रामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी तिला सेवा देणे : माझ्या गरोदरपणात प.पू. बाबांनी माझ्याकडून रामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी सेवा करून घेतली. त्यामुळे गर्भावर चैतन्याचे संस्कार झाले. ‘माझ्या पोटात दैवी बालक वाढत आहे’, हे प.पू. बाबा जाणून होते. याविषयी त्यांनी नंतर बोलून दाखवले. प.पू. बाबांनी माझ्या मुलाचे नाव ‘सनातन’ ठेवले.
३ ई. साधिकेच्या मुलाला प.पू. बाबा आणि पू. माई यांचे संतत्व लक्षात येणे : माझा मुलगा ‘सनातन’च्या मनातही प.पू. बाबा आणि पू. माई यांच्याबद्दल अपार आदर आहे. एकदा त्याने मला सांगितले, ‘‘आई, हे दोघेही संत आहेत. हे सामान्य मानव नाहीत. त्यांच्या आश्रमाचा संपूर्ण परिसर त्यांच्या चैतन्याने भारित झाला आहे.’’
४. साधिकेला जाणवलेले प.पू. दास महाराज यांचे दैवी गुण !
४ अ. प.पू. दास महाराज यांनी नातेवाइकांशी आत्मीयतेने आणि सहजतेने बोलणे : मी अनेक वेळा प.पू. बाबा आणि पू. माई यांच्या समवेत त्यांच्या नातेवाइकांच्या घरी गेले. तेथे प.पू. बाबा सहजतेने वागायचे. प.पू. बाबांच्या बोलण्यात नम्रता आणि प्रेमभाव जाणवायचा. ते सर्वांचे बोलणे मनापासून ऐकून घ्यायचे आणि सर्वांशी आत्मीयतेने बोलायचे. प.पू. बाबा संत आहेत; पण ते त्यांच्या वागण्या-बोलण्यातून तसे जाणवू देत नाहीत.
४ आ. प.पू. दास महाराज यांनी त्यांच्या आश्रमाच्या आजूबाजूला रहाणार्या लोकांची प्रेमाने विचारपूस करून त्यांना आधार देणे : प.पू. दास महाराज यांच्या आश्रमाच्या आजूबाजूला रहाणारे आणि आश्रमाजवळून जा-ये करणारे लोक स्वतःहून प.पू. बाबांशी बोलायचे. प.पू. बाबा आणि पू. माई यांचे त्या लोकांकडे लक्ष गेले, तर ते लोकांना आवाज देऊन त्यांची विचारपूस करायचे. ते लोकांना आश्रमात यायला सांगून चहा द्यायचे आणि त्यांची प्रेमाने विचारपूस करायचे. गावातील लोकांनाही प.पू. बाबांचा आधार वाटतो.
४ इ. प.पू. बाबांनी मांजरीच्या पिल्लांचे लहान बाळांप्रमाणे प्रेमाने संगोपन करणे : प.पू. बाबा माणसांप्रमाणे प्राण्यांवरही प्रेम करायचे. त्यांच्याकडे एक मांजर होती. ती मांजर ४ – ५ पिल्लांना जन्म देऊन मेली. तेव्हा प.पू. बाबांनी तिच्या पिल्लांसाठी छान टोपली सिद्ध केली. ते त्या पिल्लांना लहान मुलांच्या दुधाच्या बाटलीने दूध पाजत असत.
४ ई. पुरोहितांना जाणवलेले प.पू. बाबांचे वेगळेपण ! : एकदा आम्ही प.पू. बाबा आणि पू. माई यांच्या समवेत आमची कुलदेवता कळंगुट येथील श्री शांतादुर्गादेवीच्या दर्शनाला गेलो होतो. प.पू. बाबांनी पुरोहितांना जिज्ञासेने प्रश्न विचारून देवीबद्दल माहिती जाणून घेतली. इतर वेळी भाविकांची देवळात ये-जा सतत चालू असते; पण आम्ही देवळात गेलो असतांना त्या वेळी तेथे कुणी नव्हते. पुरोहितांनी प.पू. बाबांना सविस्तर माहिती दिली. पुरोहित म्हणाले, ‘‘आजपर्यंत असे जिज्ञासेने कुणी प्रश्न विचारले नाहीत.’’ त्यांना प.पू. बाबांचे वेगळेपण जाणवले.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
प.पू. बाबा पूर्वी आणि अजूनही म्हणतात, ‘‘मांडवी आणि डॉ. बुगडे यांनी तीव्र प्रारब्ध सहन केले. त्यांनी त्याबद्दल माझ्याकडे बोलून दाखवले नाही; पण मी ते सर्व जाणून होतो.’’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आमच्या तीव्र प्रारब्धाची झळ आम्हाला कधीच लागू दिली नाही. त्यांनी आम्हा दोघांना प.पू. बाबा आणि पू. माई यांच्या चैतन्यमय अन् प्रीतीमय संरक्षण कवचात अलगद ठेवले होते आणि आम्ही दोघेही आनंदी होतो. मला अजूनही त्या वेळचे प्रीतीमय क्षण आठवले, तर माझे डोळे कृतज्ञतेने भरून येतात.
‘प.पू. गुरुदेव, ‘आपली आमच्यावर अशीच कृपा अखंड राहू दे. आम्हाला लवकरात लवकर तुमच्या चरणापाशी येता येऊ दे’, अशी आपल्या पावन चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
– सौ. मांडवी भरत बुगडे आणि डॉ. भरत बुगडे, नवीन पनवेल, रायगड. (२९.१.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.