वाईट शक्तींमुळे होणार्या त्रासांवर मात करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायांची क्षमता आणि साधना वाढवा !
१. मनुष्याच्या जीवनातील ८० टक्के समस्या आध्यात्मिक कारणांमुळे असणे
‘मनुष्याच्या जीवनात उद्भवणार्या ८० टक्के समस्यांमागे प्रारब्ध, अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांचे त्रास, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी आध्यात्मिक कारणे असतात.
२. कालमाहात्म्यानुसार सध्या वाईट शक्तींचा प्रकोप झालेला असणे
सध्याच्या कलियुगात बहुतांशी समाज धर्माचरणापासून विन्मुख झाला आहे. त्यामुळे समाज आणि वातावरण यांतील रज-तम या त्रासदायक गुणांचे प्राबल्य वाढले आहे. हे वाईट शक्तींना पोषक असल्याने त्यांचे प्राबल्य वाढले आहे आणि त्यामुळे त्यांचे मानवांना त्रास देण्याचे प्रमाणही पुष्कळ वाढले आहे. आज जवळजवळ प्रत्येकालाच अल्प-अधिक प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास आहे किंवा एखाद्याला आज जरी असा त्रास होत नसला, तरी भविष्यात होऊ शकतो.
३. वाईट शक्तींमुळे होणार्या त्रासांची उदाहरणे आणि ते त्रास दूर करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आवश्यक असणे
वाईट शक्तींमुळे होणार्या त्रासांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. पुष्कळ औषधोपचार करूनही आजार बरा न होणे
आ. अकारण वारंवार नकारात्मकता किंवा निराशा येणे आणि अती निराशेमुळे काहींच्या मनात ‘आता जीवनाचा अंत करूया’, असे टोकाचे विचारही येणे
इ. अकारण सारखे गोंधळून जायला होणे
ई. सांसारिक अडचणींनी अती त्रस्त होणे
उ. साधनेचे पुष्कळ प्रयत्न करूनही साधकाची साधना चांगली न होणे
वाईट शक्तींमुळे होणारे वरील प्रकारचे त्रास दूर करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आवश्यक असते. यासाठी ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’नुसार नामजपादी उपाय शोधून ते करावे लागतात. या उपायपद्धतीच्या संदर्भात सनातनने २ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्या ग्रंथांचा अभ्यास करा, तसेच आवश्यकतेनुसार जाणकाराकडून ही पद्धत शिकूनही घ्या !
४. वाईट शक्तींनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला दिशा आणि गती देणार्या कार्यक्रमांच्या संदर्भात निर्माण केलेले अडथळे दूर करण्यासाठीही आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आवश्यक असणे
सध्याच्या कलियुगात वाईट शक्ती भूतलावर ‘आसुरी (अधर्माचे) राज्य’ स्थापण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्या हिंदु राष्ट्राच्या (धर्मराज्याच्या, ईश्वरी राज्याच्या) स्थापनेच्या कार्याला दिशा आणि गती देणार्या कार्यक्रमांच्या संदर्भात अडथळे निर्माण करतात. या अडथळ्यांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. प्रशासनाकडून कार्यक्रमाला अनुमती न मिळणे किंवा अनुमतीसाठी पुष्कळ खेपा घालाव्या लागणे
आ. जातीय संघटनांनी कार्यक्रमाला अनुमती देण्यास विरोध दर्शवणे
इ. इच्छुकांना कार्यक्रमास उपस्थित रहाण्यात अडचणी निर्माण होणे
ई. कार्यक्रमावर पावसाचे किंवा वादळाचे सावट येणे
उ. कार्यक्रमात मार्गदर्शन किंवा भाषण करण्याच्या थोडा वेळ आधी काही कारण नसतांना वक्त्याचा आवाज बसणे, त्याला ‘काय बोलायचे’ ते न सुचणे, त्याची प्राणशक्ती अल्प होणे, त्याच्या घरी अचानक कौटुंबिक समस्या उद्भवणे इत्यादी.
ऊ. कार्यक्रमाच्या वेळी काहीही कारण नसतांना संगणक-यंत्रणा किंवा ध्वनीक्षेपण-यंत्रणा मध्येच बंद पडणे
समष्टी कार्यात येणारे वरील प्रकारचे अडथळे दूर करण्यासाठीही सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपाय शोधून ते करावे लागतात. इतकेच नव्हे, तर ‘वाईट शक्तींनी कार्यात अडथळे निर्माण केल्यावर नव्हे, तर कार्यात अडथळे निर्माण करू नयेत’, यासाठी आधीच आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आवश्यक असते. याचे कारण म्हणजे, वाईट शक्तींचे समष्टी कार्यात अडथळे निर्माण करण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले असल्याने ‘हे कार्य निर्विघ्नपणे होईल’, याची शाश्वती देता येत नाही.
५. समष्टी स्तरावरील त्रासांवर आध्यात्मिक उपाय शोधणे आणि ते उपाय करणे, यांसाठी आवश्यक असलेली पात्रता अन् त्यांमागील अध्यात्मशास्त्र
व्यष्टी स्तरावरील त्रासांच्या तुलनेत समष्टी स्तरावरील त्रासांवर आध्यात्मिक उपाय शोधून ते करणे कठीण असते.
अ. समष्टी स्तरावरील त्रासांवरील उपाय शोधण्यासाठी आणि ते परिणामकारक करता येण्यासाठी सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अधिक असावी लागते, तसेच साधनेचे बळही असावे लागते, म्हणजेच साधना चांगली असावी लागते. अशी साधना असलेल्यांची (उदा. संतांची) सूक्ष्म ज्ञानेंद्रिये सक्षम असल्याने त्यांना कार्यात आलेले सूक्ष्मातील अडथळे, तसेच पुढे येऊ शकणारे सूक्ष्मातील अडथळे जाणता येऊन त्यांवर आध्यात्मिक उपाय शोधता येतात. उपाय शोधतांना ‘ब्रह्मांडी ते पिंडी’ हे अध्यात्मातील तत्त्व लागू असल्याने ब्रह्मांडातील, म्हणजे समष्टी कार्यातील अडथळे ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’नुसार आपल्या देहावरच शोधता येतात, तसेच शोधलेले उपाय ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या तत्त्वानुसार पिंडावर, म्हणजे आपल्या देहावर केल्यावर ब्रह्मांडावर, म्हणजे समष्टीवर आपोआप उपाय होतात.
आ. समष्टी स्तरावरील त्रासांवर उपाय शोधण्यासाठी आणि ते करण्यासाठी स्वतःला आध्यात्मिक त्रास नसावा; अन्यथा स्वतःला वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता वाढते.
‘समष्टी उपाय शोधण्याच्या आणि करण्याच्या संदर्भात स्वतःची क्षमता आहे कि नाही’, हे समष्टी उपाय करणारे संत किंवा जाणकार यांना विचारावे.
६. भावी भीषण आपत्काळाचा विचार करून आतापासूनच आध्यात्मिक उपाय नीट शोधून ते करण्याची क्षमता वाढवा, तसेच साधनाही वाढवा !
आगामी तिसरे महायुद्ध, तसेच भूकंपादी नैसर्गिक आपत्ती यांच्या काळात नामजपादी स्वरूपाचे सूक्ष्म स्तरावरील उपाय शोधण्यासाठी आणि ते करण्यासाठी कुणी सक्षम साधक किंवा संत त्या त्या स्थळी उपलब्ध होतीलच, असे नाही. यासाठी त्या आपत्काळातही दैनंदिन जीवनात वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी, तसेच हाती घेतलेले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य निर्विघ्न होण्यासाठी प्रत्येकाने आतापासूनच आध्यात्मिक उपाय नीट शोधून ते करण्याची क्षमता वाढवायला हवी. यासह चांगली साधना करून स्वतःचे आध्यात्मिक बळही वाढवायला हवे.’
– (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. आठवले (८.१.२०२३)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |