स्त्रियांच्या मासिकधर्माचा त्यांच्या स्वतःवर आणि वातावरणावर होणारा परिणाम समजून घ्या !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘स्त्रियांचा मासिकधर्म (मासिक पाळी) हा अशौचाच एक प्रकार आहे, असे धर्मग्रंथांत सांगितले आहे. ही अवस्था नेहमीच्या अवस्थेहून निराळी असते, हे पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोगांतून सिद्ध केलेले आहे. पूर्वीच्या काळी मासिकधर्माच्या वेळी स्त्रिया देव-धर्माशी संबंधित ठिकाणी वावर टाळणे, वर्षभराच्या साठवणीतील वस्तूंना स्पर्श न करणे, स्वयंपाक न करता विश्रांती घेणे इत्यादी आचारधर्म पाळत. आजकाल रहाण्याच्या जागेची समस्या, नोकरीची बंधने इत्यादी कारणांमुळे स्त्रियांचा मासिकधर्म पाळणे बरेच गुंतागुंतीचे आणि त्रासदायक ठरत चालल्याचे सांगितले जाते. मासिकधर्माचा संबंधित स्त्री आणि वातावरण यांवर काय परिणाम होतो ? याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने काही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत एका स्त्रीची मासिक पाळी चालू असतांना आणि नसतांना (४-५ दिवसांनी पाळी संपल्यावर) तिच्या, तसेच तिने स्पर्श केलेले अन्न अन् पाणी यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. तिची मासिक पाळी चालू असतांना तिने नामजप केल्यावर तिच्यावर काय परिणाम होतो, हेही अभ्यासण्यात आले. तसेच तिची मासिक पाळी नसतांना तिने स्पर्श केलेले अन्न अन् पाणी यांच्यावर काय परिणाम होतो, हेही अभ्यासण्यात आले.
वरील निरीक्षणांतून लक्षात आलेली सूत्रे
१. स्त्रीची मासिक पाळी चालू असतांना तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा आढळून आली.
२. तिने मासिक पाळी चालू असतांना २० मिनिटे नामजप केल्यावर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन तिच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
३. मासिक पाळी झाल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प किंवा नाहीशी होऊन तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून आली.
४. तिने मासिक पाळी चालू असतांना अन्न आणि पाणी यांना स्पर्श केल्यावर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. याउलट तिने मासिक पाळी नसतांना अन्न आणि पाणी यांना स्पर्श केल्यावर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.
२. निष्कर्ष
मासिक पाळीच्या काळात स्त्रीवर, तसेच तिने स्पर्श केलेल्या गोष्टींवर नकारात्मक परिणाम होतात. मासिक पाळीच्या काळात तिने नामजप केल्यावर तिच्यावरील नकारात्मक परिणाम अल्प किंवा नाहीसा होऊन तिची सात्त्विकता वाढते.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. मासिक पाळी चालू असतांना स्त्रीतील रजोगुण वाढून तिची सात्त्विकता उणावणे : स्त्रियांच्या मासिक धर्माला ‘रजस्वलाधर्म’, असेही म्हणतात. या काळात स्त्रियांमधील रजोगुण वाढतो. रजोगुण वाढल्यामुळे स्त्रियांवर वातावरणातील त्रासदायक शक्तीचे आवरण येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्यांची सात्त्विकता उणावते.
३ आ. मासिक पाळी चालू असतांना स्त्रीकडून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक स्पंदनांमुळे तिने स्पर्श केलेले अन्न अन् पाणी दूषित होणे : चाचणीतील स्त्रीने मासिक पाळी चालू असतांना अन्न आणि पाणी यांना स्पर्श केल्यावर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. मासिक पाळी चालू असतांना स्त्रीकडून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक स्पंदनांचा हा परिणाम आहे. या काळात तिच्याकडून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक स्पंदनांमुळे सभोवतालचे वातावरण दूषित होते.
३ इ. चाचणीतील स्त्रीने मासिक पाळी चालू असतांना नामजप केल्यामुळे तिच्या भोवती नामाचे संरक्षक-कवच निर्माण होणे : मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांतील रज-तम वाढत असल्याने अशा स्थितीत अनिष्ट शक्ती त्यांच्यावर आक्रमण करू शकतात; म्हणून मासिक पाळीच्या ४-५ दिवसांत स्त्रियांनी अधिकाधिक प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे त्यांच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होऊन त्रासदायक शक्तींपासून त्यांचे रक्षण होईल. चाचणीतील स्त्रीने मासिक पाळी चालू असतांना नामजप केल्याने तिला चैतन्य मिळून तिच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण झाले, तसेच तिची सात्त्विकता वाढली.
थोडक्यात पूर्वीच्या काळी स्त्रिया वर्षभराच्या साठवणीतील वस्तूंना स्पर्श न करणे, स्वयंपाक न करता विश्रांती घेणे इत्यादी आचारधर्म पाळत, हे किती योग्य होते, हे यातून लक्षात येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात पूर्वीप्रमाणे सर्वच यथासांग पाळणे शक्य नसले, तरी किमान मासिक पाळीच्या काळात अधिकाधिक नामजप केल्यास स्त्रियांचे त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होईल. नामजप मनाने करावयाचा असल्याने त्याला स्थळ-काळ, अशौच यांचे कोणतेच बंधन नाही.’ (२८.१.२०२३)
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
ई-मेल : mav.research2014@gmail.com
|