शाळिग्राम यात्रेमुळे चिनी ‘अजेंड्या’ला (षड्यंत्राला) धक्का !
चीन सदैव भारत आणि नेपाळ यांच्या संबंधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतो. नेपाळही चीनच्या प्रभावाखाली येऊन भारताला लांब ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो; परंतु शाळिग्राम यात्रेने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.
१. श्रीराम मंदिराच्या उभारणीत नेपाळचा सहभाग रहाण्यासाठी तेथून शाळिग्राम शिळा आणण्यात येणे
‘अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीच्या कार्याला प्रारंभ झाला, तेव्हा नेपाळचे माजी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री विमलेंद्र निधी यांनी ‘या कार्यात नेपाळचेही योगदान असावे’, यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला आग्रह केला. विमलेंद्र निधी हे नेपाळच्या जनकपूर धाम येथील खासदार आहेत, ती सीतामातेची जन्मभूमी आणि माहेर आहे. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या स्तरावरही चर्चा चालू केली. त्यानंतर लवकरच तीर्थक्षेत्र न्यासाने मान्यता दिली आणि ‘श्रीराम मंदिरातील मूर्तींची निर्मिती काली गंडकी नदीत मिळणार्या शाळिग्राम शिळेतून करावी’, हा नेपाळचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.
नेपाळची काली गंडकी नदी ही जगातील एकमेव नदी आहे, जेथे उच्च कोटीच्या शाळिग्राम शिळा प्राप्त होतात. नेपाळ सरकारने मंत्रीमंडळाची बैठक घेतली आणि त्वरित काली गंडकी नदीकडे तज्ञांचा चमू पाठवला. त्यानंतर २६ टन आणि १४ टन वजनांच्या या २ शाळिग्राम शिळांची निवड करण्यात आली. ६ कोटी वर्षे जुन्या या शाळिग्राम शिळांपासून भगवान श्रीराम आणि देवी सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहेत. या शिळा अजून १ लाख वर्षे रहातील, असे म्हटले जात आहे.
२. शिळेच्या आगमनालाच एवढी मोठी गर्दी जमणे हा केवळ रामनामाचा महिमा !
शाळिग्राम शिळांना नदीतून काढण्यापूर्वी तिचे क्षमापूजन करण्यात आले. त्यानंतर या शिळा जनकपूर येथून बिहारच्या मधुबनी मार्गाने दरभंगा फइरी, गोपालगंज, गोरखपूर असे मार्गक्रमण करत अयोध्या येथे पोचल्या आहेत. या शिळा मार्गस्थ झाल्यानंतर नेपाळ आणि बिहार येथील लक्षावधी लोकांनी रस्त्यांवर उभे राहून शिळापूजन केले. लोक अतिशय भावूक झाले होते. लक्षावधी महिला या शिळांचे पूजन करण्यासाठी चंदन-कुंकू घेऊन रस्त्यावर प्रतीक्षा करत होत्या. कुणीही निमंत्रण न देताही ठिकठिकाणी लोक स्वत:हून मंडप सजवून स्वागत करू लागले. कोणतेही धर्मगुरु किंवा मोठे नेते नसतांनाही केवळ श्रीरामाच्या शिळेच्या आगमनालाच एवढी मोठी गर्दी उसळत होती. हा रामनामाचा महिमा आहे.
३. प्रभु श्रीराम मूर्तीसाठीच्या शाळिग्राम शिळांनी भारतविरोधी षड्यंत्र उद्ध्वस्त करणे
राममंदिराच्या गर्भगृहात ज्या मूर्ती विराजमान होणार आहेत, त्या नेपाळच्या शिळांपासून बनलेल्या असतील, असे म्हटले जात आहे. ही नेपाळ आणि भारत यांच्यातील आध्यात्मिक संबंधांना अधिक सबळ करणारी गोष्ट आहे. पुष्पकमल दहल प्रचंड हे नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर चीन आणि नेपाळी कम्युनिस्ट (साम्यवादी) पक्ष भारतविरोधी षड्यंत्र रचत असतांना त्याला प्रभु श्रीरामाच्या शिळांनीच उद्ध्वस्त केले आहे.
४. अयोध्येत होणार्या लक्षावधी भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे योगी सरकारसाठी मोठे आव्हान
वर्ष २०२४ च्या मकरसंक्रातीला या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होईल आणि रामनवमीपासून भक्तांसाठी दर्शन चालू होईल. या भव्य मंदिरासाठी १ सहस्र ८०० कोटी रुपये व्यय होणार आहेत आणि पहिल्या मजल्याचे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. येथे प्रतिदिन ५० सहस्र आणि विशेष प्रसंगी ५० लाख भाविकांचे आगमन होण्याची शक्यता आहे. या भाविकांच्या प्रचंड गर्दीचे नियोजन करणे, हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
(साभार : मासिक ‘विवेक, हिंदी’)