पनवेल येथील हिंदु राष्ट्र-धर्म जागृती सभेचा ४० गावांमध्ये प्रचार !
पनवेल, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने १२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता येथील ‘दि मिडल क्लास को-ऑप. हाऊसिंग सोसायटी’च्या मैदानावर हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येणार आहे. या सभेच्या प्रचारासाठी पनवेल परिसरातील ४० गावांमध्ये आतापर्यंत ५० हून अधिक बैठका घेण्यात आल्या आहेत. सभेला येण्यासाठी सर्व धर्मप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.
सभेच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी फलक लिखाणही करण्यात आले आहे. बैठकांसह प्रत्यक्ष भेटून ३ सहस्रांहून अधिक जणांना सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे. सभेचा अधिकाधिक प्रसार व्हावा, यासाठी शहरी आणि ग्रामीण भागांत ७४ फलक लावण्यात आले आहेत. विविध स्थानिक मित्रमंडळे, स्थानिक संघटना, स्थानिक पातळीवरील विविध कार्यक्रम, ग्रामस्थांच्या बैठका, कीर्तन, कोपरासभा, महाविद्यालये, बसस्थानके, भाजीबाजार, सोसायटी आदी विविध ठिकाणी स्थानिकांना एकत्र करून सभेचे निमंत्रण देण्यात आले. या प्रसारात हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. सभा यशस्वी करण्यासाठी पनवेल परिसरात धर्मप्रेमी प्रचार करत असून आता सर्वांमध्ये प्रत्यक्ष सभेची उत्सुकता आहे, असे श्री. सागर चोपदार यांनी सागितले.