पणजी हे गोव्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर
राज्यसभेत मंत्री अश्विन कुमार चौबे यांनी दिली प्रदूषित शहरांची माहिती
नवी देहली – पणजी शहर गोव्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. शहरातील ‘पर्टीक्युलेट मॅटर १०’ (पी.एम्.१०)चे प्रमाण ७३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे आणि वास्तविक हे प्रमाण ६० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर किंवा त्याहून अल्प असल्यास ते सुरक्षित मानले जाते. वर्ष २०२१ मधील हा हवेच्या गुणवत्तेचा अहावाल केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान पालट मंत्री अश्विन कुमार चौबे यांनी राज्यसभेत प्रस्तुत केला आहे. देशातील प्रदूषित शहरांविषयी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नावर मंत्री अश्विन कुमार चौबे यांनी ही माहिती दिली.
या माहितीनुसार देशातील ३८९ प्रदूषित शहरांच्या सूचीमध्ये पणजी शहराचा २३० वा क्रमांक लागतो. ‘पी.एम्.१०’चे प्रमाण ३१९ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर असलेले हरियाणामधील सोनेपत शहर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.
९ ठिकाणांवर ‘पी.एम्.१०’चे प्रमाण ६० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरहून अधिक
गोव्यातील ९ ठिकाणांवर ‘पी.एम्.१०’चे प्रमाण ६० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा अधिक आहे. यामध्ये पणजी ७३, कुंकळ्ळी ६७, उसगाव-पाळे ६४, फोंडा ६३, कोडली ६२, कुंडई ६२, तिळामळ ६२, डिचोली ६१ आणि होंडा ६१. गोव्यातील इतर शहरांचे ‘पी.एम्.१०’चे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. सांगे ६०, आमोणा ५९, मडगाव ५९, तुये ५९, वास्को ५८, अस्नोडा ५८ आणि म्हापसा ५७.
केंद्राने ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा योजने’च्या अंतर्गत प्रदूषित शहरांमधील हवेतील प्रदूषण उणे करण्यासाठी वर्ष २०२० ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत ८ सहस्र ७२७ कोटी रुपये खर्च केले आहेत.