सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेले छायाचित्र पहातांना आलेल्या अनुभूती !
‘१७.९.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये ‘पू. वामन नामजप करताना आणि पू. वामन यांची पारंपरिक पोशाखामधील भावमुद्रा’ , अशी २ छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. ‘त्या छायाचित्रांकडे पाहून साधकांना काय जाणवते ?’, असा सूक्ष्मातील प्रयोग करून काही अनुभूती आल्यास त्या लिहून पाठवण्यास सांगण्यात आले होते . पू. वामन राजंदेकर यांचे ध्यानावस्थेतील छायाचित्र पाहून मला पुढील अनुभूती आल्या.
१. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पू. वामन यांचे छायाचित्र पाहिल्यावर ‘स्वतःला चैतन्य मिळत आहे’, असे जाणवणे
‘१७.९.२०२१ या दिवशी ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात मिळाल्यावर तो चाळून पहातांना मला पान क्र. ४ वर पू. वामन यांचे छायाचित्र दिसले. ते बघतांना ‘दैनिक हातातून बाजूला ठेवू नये’, असे मला वाटले. मागील २ दिवस माझी प्रकृती ठीक नसल्याने मला प्रचंड निरुत्साह आला होता. ‘माझ्यावर आवरण आल्यामुळे सेवेला जाऊ नये’, असे मला वाटत होते; पण पू. वामन यांचे छायाचित्र पहाताच ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे तीव्रतेने जाणवले.
२. पू. वामन यांच्या छायाचित्रातून चैतन्याचे कण प्रक्षेपित होतांना दिसून निरुत्साह जाऊन आनंद जाणवणे
मी आसंदीवर बसून पू. वामन यांचे छायाचित्र आणखी निरखून पाहू लागले. काही सेकंदांतच माझा निरुत्साह मावळला आणि मला ‘पू. वामन यांच्या छायाचित्रातून चैतन्याचे कण प्रक्षेपित होत आहेत’, असे दिसून आनंद जाणवू लागला. मी जवळजवळ १ घंटा हा आनंद अनुभवत होते.
३. पू. वामन यांचे छायाचित्र पहातांना मन निर्विचार होऊन ‘ॐ’ चा नामजप आपोआप चालू होणे
माझा ‘निर्विचार’ हा नामजप सातत्याने होत नाही; परंतु पू. वामन यांच्या छायाचित्राकडे पहातांना माझे मन निर्विचार झाले आणि आतून आपोआप ‘ॐ’ चा नामजप चालू होऊन तो बराच वेळ चालू राहिला.
४. मला पू. वामन यांच्या एका हातात लाडू आणि दुसर्या हातात पिवळा मोदक दिसत होता.
५. पू. वामन यांच्या मुखाकडे बघतांना मला त्यांच्या डोक्याच्या पाठीमागे पांढरी आणि पिवळी प्रभावळ स्पष्टपणे दिसत होती.
या अनुभूतींमुळे मला गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि पू. वामन यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली.
– सौ. वंदना चंद्रशेखर बुचे, अकोला. (१०.१.२०२३)
|