तुर्कीये आणि सीरिया यांच्यानंतर पाकिस्तानात भूकंप येण्याच्या अफवेमुळे भीतीचे वातावरण
नवी देहली – तुर्कीये आणि सीरिया यांच्यानंतर आता अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत यांचा क्रमांक आहे, असे भाकीत नॉर्वे येथील ‘सोलर सिस्टम ज्यॉमेट्री सर्व्हे’या संस्थेचे शास्त्रज्ञ फ्रँक होगरबीट्स यांनी केले आहे, असे वृत्त सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे; मात्र फ्रँक होगरबीट्स यांनी हा दावा ४ आणि ६ फेब्रुवारी या काळासाठी केला होता. आता हे दिनांक उलटून गेल्याने त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतांना तुर्कीये आणि सीरिया येथील विनाशकारी भूकंपानंतर पाकिस्तानमध्येही भूकंप येणार असल्याची अफवा सामाजिक माध्यमांतून प्रसारित होऊ लागल्यामुळे तेथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे अमेरिकेतील ‘युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हे’ने म्हटले आहे की, आमच्या संस्थेच्या कोणत्याही शास्त्रज्ञांनी भूकंप येण्याविषयी अशा प्रकारचे कोणतेही भाकीत केलेले नाही. ‘कॅलटेक’ नावाच्या संस्थेने म्हटले आहे, ‘सध्यातरी अशा प्रकारचा भूकंप येण्याविषयी काही सांगणे शक्य नाही.’ काही शास्त्रज्ञांनी होगरबीट्स यांच्यावर भाकीत केल्यावरून टीकाही केली आहे.
इंडोनेशियामध्ये भूकंपामुळे ४ जणांचा मृत्यू
इंडोनेशियाच्या पापुआ प्रांतामध्ये ९ फेब्रुवारीला ५.४ रिक्टर स्केलचा भूकंप येऊन त्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक इमारत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.