प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ !
प्रयागराज – येथे चालू असलेल्या माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत विविध संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांना संपर्क करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या अभियानाच्या अंतर्गत शास्त्र धर्म प्रचार सभेच्या वार्षिक अधिवेशनात सहभाग घेण्यात आला. या अधिवेशनात पू. डॉ. शिवनारायण सेन यांची वंदनीय उपस्थिती होती. तसेच विश्व हिंदु परिषदेच्या एका शिबिरात ‘हलाल जिहाद’विषयी उद्बोधन करण्यात आले. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वैशिष्ट्यपूर्ण
१. मध्यप्रदेशमधील अनंत विभूषित श्री रावतपुरा सरकार यांनी हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाला भेट दिली आणि हिंदु राष्ट्रविषयक सर्व ग्रंथांची मागणी केली.
२. राष्ट्रीय हिंदु भगवा वाहिनी, गौ-गीता-गंगा रक्षा समिती, हिंदु धर्म रक्षा समिती आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी सर्वांनी ‘संपूर्ण माघ मेळ्यामध्ये सध्याच्या स्थितीला जे आवश्यक आहे, ते सांगणारे असे हे एकमेव प्रदर्शन आहे’, असा अभिप्राय दिला.
३. माघ मेळ्याचे अधिकारी श्री. अरविंद चौहान यांनीही प्रदर्शनाला भेट दिली. हिंदु राष्ट्रविषयक प्रदर्शन पाहून त्यांनी ‘पुष्कळ महत्त्वाचा विषय आहे’, असे सांगून समितीच्या कार्याची प्रशंसा केली.
४. ‘दिव्य प्रेम सेवा मिशन’चे श्री. आशिष गौतम यांना ‘हलाल जिहाद ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी श्री. आशिष गौतम यांनी ‘हलालविषयक जागृती अभियानाची पुष्कळ आवश्यकता आहे’, असे सांगितले.
५. अमेठी (उत्तरप्रदेश) येथील परमहंस सेवा आश्रमाचे पीठाधीश्वर, बाल आणि अखिल भारतीय हिंदु संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाल ब्रह्मचारी मौनीबाबा यांचे कार्याला शुभाशीर्वाद मिळाले. यावेळी महाराजांनी ‘हलाल जिहाद’ हा विषय पुष्कळ गंभीर असून या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
शास्त्र धर्म प्रचार सभेच्या वार्षिक अधिवेशनात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
शास्त्र धर्म प्रचार सभेच्या वार्षिक अधिवेशनात समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी ‘धर्मनिरपेक्षता शब्दाला विरोध करा’, या विषयावर संबोधन केले. या वेळी ‘ट्रुथ’ वृत्तपत्राचे संपादक पू. डॉ. शिवनारायण सेन यांनी शास्त्र धर्म प्रचार सभेचे संस्थापक पू. डॉ. उपेंद्र मोहन यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त हिंदु धर्मासाठी केलेल्या कार्याची वैशिष्ट्ये सांगितली.
विश्व हिंदु परिषदेच्या शिबिरात ‘हलाल जिहाद’विषयी मार्गदर्शन
विश्व हिंदु परिषदेच्या विधी प्रकोष्ठ शाखेचे अधिवक्ता अरविंद मिश्रा यांनी ‘हलाल जिहाद’विषयी जागृती करण्याकरता समितीच्या कार्यकर्त्यांना वक्ता म्हणून आमंत्रित केले होते. या वेळी समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी उपस्थितांना विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले.