द्वापरयुगातील पांडवांच्या मयसभेप्रमाणे रामनाथी आश्रमात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट !
सप्टेंबर २०१३ पासून रामनाथी आश्रमातील कोटा लाद्या आणि टाईल्स यांवर, म्हणजे फरशीवर पटल, कुंडी, दारे इत्यादी सर्वच वस्तूंचे पाण्यात पडल्याप्रमाणे दिसावे, तसे प्रतिबिंब दिसते. याचा साधकांना अहंकार वाटायला नको; म्हणून ईश्वराने महाभारतातील पुढील प्रसंगाची मला आठवण करून दिली. नंतर श्रीरामाच्या बालपणी त्याचे लादीवर प्रतिबिंब पडलेले चित्र ‘कल्याण’ मासिकात प्रसिद्ध झालेले पहायला मिळाले. यावरून हेही लक्षात आले की, विश्वात नवीन असे काहीच घडत नाही. त्याच त्याच गोष्टी परत परत घडत असतात. ‘रामनाथी आश्रमात पंचमहाभूतांच्या परिणामांनी दिसून येणारे विविध पालट अनुभवले की, पांडवांच्या मयसभेत दुर्याेधनाला आलेले अनुभव कसे आले असतील, याची थोडी कल्पना करता येईल. रामनाथी आश्रमात काही कोटा लाद्यांवर प्रतिबिंब पाण्यात पडल्याप्रमाणे दिसते, तर काही काचांतून बाहेरील दृष्य पाहिल्यावर ते ‘पाण्याच्या लाटांवर पडलेले प्रतिबिंब आहे’, असे वाटते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (वर्ष २०१३) |
भूमीवरून कमाल प्रमाणात आपतत्त्वरूपी चैतन्य प्रक्षेपित होऊ लागले की, भूमी जलाप्रमाणे भासू लागणे
१. पृथ्वीतत्त्वरूपी चैतन्याच्या आधारे प्रतिबिंब भूमीवरच स्थित केले जाणे : भूमीवर कमाल प्रमाणात आपतत्त्वरूपी चैतन्य प्रक्षेपित होऊ लागले की, भूमी एखाद्या जलाप्रमाणे भासू लागते. तिच्यात जलयुक्त गुणधर्म येतात, म्हणजेच प्रत्येक गोष्टीचे प्रतिबिंब उमटू लागते. बर्याचदा पृथ्वीतत्त्वरूपी चैतन्याच्या आधारे हे प्रतिबिंब भूमीवरच स्थित केले जाते, म्हणजेच येथे जणूकाही प्रत्यक्ष चैतन्ययुक्त प्रतिबिंबाचे स्थूल दर्शनच साधकांना घडते. हे दर्शन मनाला लुभावणारे, प्रसन्नता देणारे, तसेच देहाला प्राणशक्तीयुक्त थंडावा देणारे असते.
२. आपतत्त्वाचा तेजतत्त्वाशी संयोग झाल्यास प्रतिबिंबातूनच प्रकाश बाहेर पडतांना दिसू लागतो.
३. वायूतत्त्वाच्या आधारे भूमीवरील प्रतिबिंब वर उचलले जाणे : कधी कधी कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे हे प्रतिबिंब वायूतत्त्वावर स्वार होऊन वर वर जाऊ लागते, तेव्हा तीच प्रतिबिंबित वस्तू भूमीवरून वातावरणातच उंच होतांना दिसू लागते. हे पहातांना मनाला आणि देहाला हलकेपणा प्राप्त होतो.
कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे पृथ्वी, तेज आणि वायू या तत्त्वांचा आपतत्त्वाशी संयोग झाला असता, अशा अनुभूती येतात.
४. आकाशतत्त्वाच्या संयोगातून मात्र प्रतिबिंब नादयुक्त बनते.
– ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ (आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) यांच्या माध्यमातून, १९.९.२०१३, सायं. ७.१६)
मयसभा : प्राचीन स्थापत्यशास्त्राचे अलौकिक उदाहरण !
१. मयासुराने मयसभेसाठी लागलेले साहित्य बिंदुसार तीर्थावरून आणलेले असणे
‘खांडववनात अभयदान दिल्याने मयासुराने कृतज्ञभावाने पांडवांना बांधून दिलेल्या सभेला ‘मयसभा’ म्हणतात. या वास्तूच्या निर्मितीसाठी लागणारे बरेचसे साहित्य मयासुराने हिरण्यशृृंग पर्वताजवळील बिंदुसार नावाच्या तीर्थावरून आणले होते. हिरण्यशृंग पर्वत कैलास पर्वताच्या उत्तरेला मैनाक पर्वताजवळ आहे. त्या ठिकाणी प्रजापतीने अनेक यज्ञ केले होते. या यज्ञांसाठी मणीमय खांब आणि सोन्याच्या वेदी उभ्या केल्या होत्या. त्या तीर्थावर जाऊन मयासुराने मयसभेसाठी लागणारे बरेचसे साहित्य आणि स्फटिक आणले होते. या सभेच्या निर्मितीला मयासुराला १४ मासांचा कालावधी लागला होता.
२. मयसभेच्या मायावी रचनेमुळे दुर्याेधनाची ठिकठिकाणी फजिती होणे
मयसभेत वेगवेगळ्या भूल घालणार्या गोष्टी होत्या. त्यामुळे ती पहाण्यास गेलेल्या दुर्याेधनाची तेथे चांगलीच फजिती उडते. स्फटिकमय स्थानाशी आल्यावर येथे पाणी आहे, असे समजून तो आपली वस्त्रे उचलून चालू लागतो. नंतर प्रत्यक्षात जिथे स्फटिकासारखे स्वच्छ पाणी असते, तिथे मात्र पाणी आहे, असे लक्षात न आल्याने तो पुढे जातो आणि पाण्यात पडतो. दुसर्या एका ठिकाणी स्फटिकाचे दार असते. ते न जाणवल्यामुळे आत शिरू लागल्यावर दुर्याेधनाचे डोके त्यावर आपटते.’
(संदर्भ : महाभारत, सभापर्व)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |