भ्रष्टाचार संपवणे आवश्यक !
गेल्या वर्षी लाचलुचपत विभागाने जी कारवाई केली त्यात लाच घेतांना पकडले जाणार्यांमध्ये पोलीस विभाग आघाडीवर असून त्या खालोखाल महसूल विभागाचा क्रमांक लागला होता. या सर्वांमध्ये ‘वर्ग-३’चे कर्मचारी सर्वाधिक अडकले आहेत. ही घटना पाहिल्यानंतर भ्रष्टाचाराने शासकीय यंत्रणा इतकी पोखरली गेली आहे की, ‘भ्रष्टाचारमुक्त विभाग दाखवा आणि बक्षीस मिळवा’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे’ आणि हे देशासाठी अत्यंत घातक आहे.
‘लाच देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा आहे’, या आशयाचे वाक्य सरकारी कार्यालयांमध्ये वाचायला मिळते; परंतु ‘ही केवळ औपचारिकता तर राहिली नाही ना ?’, असा प्रश्न अशा बातम्या वाचल्यावर येतो. त्यामुळे नागरिकांनी ‘आता लाच दिल्याविना सरकारी काम होणारच नाही’, हाच संस्कार करून घेतला आहे. सर्वपक्षीय शासनकर्त्यांमुळे देशातील नागरिकांची अशी मानसिकता होणे, हे देशाच्या प्रगतीमध्ये खीळ घालणारे आहे. त्यामुळे ही मानसिकता पालटण्यासाठी भ्रष्टाचार संपवणे आवश्यक आहे. बाहेरील परिस्थिती पालटण्यास प्रारंभ झाला की, जनतेचे विचारही पालटतील. त्यातील प्रामाणिक लोक देशाच्या विकास कार्यात झोकून देतील.
ज्यांच्याकडे जनता त्यांचे ‘रक्षक’ म्हणून पहाते, ती पोलीस यंत्रणाच कायद्याचे ‘भक्षक’ होत असेल, तर सामान्य जनतेने कुणाकडे पहायचे ? लाच देणे आणि घेणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असला, तरी अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी खासगीत सर्रासपणे लाच घेतात; कारण या सर्वांवर कायद्याचा वचक राहिलेला नाही, असे खेदाने म्हणावे लागते. महाराष्ट्राचा विचार करता नाशिक परिक्षेत्राचा भ्रष्टाचारात राज्यात दुसरा क्रमांक लागतो.
लाच घेतांना शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांना पकडले जातेच; पण जर एखादा अधिकारी कायदेशीरपणे काम करत असतांना एखादी व्यक्ती अवैध काम करून घेण्यासाठी त्यास लाच देण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई होत असते. याचाच अर्थ भ्रष्ट अधिकार्यांसमवेत भ्रष्ट जनताही या परिस्थितीला तितकीच कारणीभूत आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. देशाला महासत्ता बनवण्यासाठी विकासासमवेत भ्रष्टाचाराची कीड संपवणे आवश्यक आहे. अन्यथा भारत भ्रष्टाचारमध्येही महासत्ता आहे, अशी चुकीची प्रतिमा होण्यास वेळ लागणार नाही.
– श्री. जयेश बोरसे, पुणे