सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या ‘उग्ररथ शांतीविधी’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
‘सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ९.१.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘उग्ररथ शांती’ हा विधी करण्यात आला. तेव्हा देवद आश्रमातील साधिकेला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या ‘उग्ररथ शांतीविधी’च्या दिवशी वेगळाच उत्साह आणि आनंद जाणवणे
सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या ‘उग्ररथ शांतीविधी’च्या दिवशी आश्रमातील वातावरण एखाद्या सणाप्रमाणे वाटत होते. आश्रमातील सर्व साधकांनी सात्त्विक पोशाख परिधान केला होता. सकाळी उठल्यापासून वेगळाच उत्साह जाणवत होता. मला आध्यात्मिक त्रास असल्यामुळे प्रत्येक कृती करतांना थकव्यामुळे माझा संघर्ष होतो. कृती करतांना माझ्यात सहजता नसते; परंतु त्या दिवशी एक वेगळाच उत्साह माझ्या मनात संचारला होता. ‘माझ्या मनात आनंदाचे कारंजे उडत आहेत’, असे मला जाणवत होते.
२. आध्यात्मिक त्रासाच्या निवारणासाठी मला नियमित ३ घंटे नामजप करावा लागतो; परंतु त्या दिवशी २ घंटे नामजप करूनही मला नेहमीपेक्षा अधिक चांगले वाटत होते.
३. सद़्गुरु राजेंद्रदादांच्या जागी चैतन्याचा गोळा दिसणे आणि शांतीविधी अन् सद़्गुरु दादा यांच्यातील चैतन्यामुळे आश्रम भारित झाल्याचे जाणवणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला ५ मिनिटे विधीच्या ठिकाणी बसण्याची संधी मिळाली. तेव्हा सद़्गुरु दादांनी सोनेरी पिवळ्या रंगाचे सोवळे आणि उपरणे परिधान केले होते. सद़्गुरु दादांच्या जागी मला चैतन्याचा गोळाच दिसत होता. त्यांच्याकडून चैतन्याचे पुष्कळ प्रक्षेपण होत होते. त्यांची त्वचा चकाकत होती. शांतीविधी आणि सद़्गुरु दादा यांच्यामधील चैतन्यामुळे देवद आश्रम भारित झाला होता.
‘परम पूज्य गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले)आणि सद़्गुरु राजेंद्रदादा यांच्या कृपेमुळे आम्हाला हे दैवी वातावरण अनुभवता येऊन चैतन्य ग्रहण करता आले’, याबद्दल गुरुमाऊली, तसेच सद़्गुरु दादा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. राधा रवींद्र साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.१.२०२३)
|