चहाची सवय सोडण्यासाठी स्वयंसूचना
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १५१
‘अनेकांना चहा सोडायचा असतो; पण त्यांचे मन त्यासाठी सिद्ध नसते. मनाची सिद्धता होण्यासाठी स्वयंसूचना द्यावी. तुम्ही दिवसभरात अनेक वेळा चहा घेत असाल, तर दिवसातून सायंकाळी अमुक वाजता एकदाच चहा घेण्याचे ठरवावे. त्यानंतर दिवसभरात चहा घेण्याच्या प्रलोभनापासून वाचण्यासाठी दिवसातून ५ वेळा, तसेच प्रत्येक वेळेला ५ वेळा पुढील स्वयंसूचना वाचावी.
जेव्हा मला अवेळी चहा प्यावासा वाटेल, तेव्हा ‘मी सायंकाळी अमुक (येथे वेळ घालावी) वाजता एकदाच चहा प्यायचे ठरवले आहे’, याची मला जाणीव होईल आणि मी चहाऐवजी गरम पाणी पिईन.
अशी स्वयंसूचना दिल्याने आरंभी ‘चहा अगदीच बंद होणार नसून दिवसातून एकदा चहा प्यायला मिळणार आहे’, ही जाणीव होते. त्यामुळे मन पालट स्वीकारण्यास सिद्ध होते. काहींना काहीतरी गरम प्यायला हवे, एवढ्यासाठीच चहा प्यायचा असतो. अशा वेळी गरम पाणी प्यायल्याने त्यांच्या मनाचे काही अंशी का होईना; पण समाधान होते. पुढे काही काळाने चहाचे प्रमाण अल्प करणे, एक दिवसाआड चहा घेणे असे प्रयत्न करून चहा सोडणे सहज शक्य होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.२.२०२३)
तुम्ही चहा घेण्याची सवय कशी सोडली, हे आम्हाला कळवा !
ई-मेल पत्ता : ayurved.sevak@gmail.com