अध्यात्माची महानता !
भारतभरात ध्रुव जैन या विद्यार्थ्याचे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. याचे कारणही तसेच आहे. बिलासपूर (छत्तीसगड) येथील ध्रुवने ‘जेईई मेन’ (अभियांत्रिकी शिक्षणाची प्रवेश परीक्षा) २०२३ या सर्वांत प्रवेश परीक्षेत १०० टक्के गुण प्राप्त करून यश मिळवले आहे. खरे पहाता ‘जेईई मेन’ ही परीक्षा अवघड असते. त्यामुळे यात पैकीच्या पैकी गुण मिळवणे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. हे यश त्याने कसे संपादन केले, याविषयी प्रत्येकालाच उत्सुकता आहे. ध्रुवने त्याची अभ्यासाची पद्धत, त्यात आखलेली ध्येय-धोरणे यांविषयीची दिलेली माहिती सर्वत्र प्रसारित झालेली आहे. त्यात त्याने सांगितलेले एक सूत्र महत्त्वपूर्ण आहे. ध्रुव म्हणाला, ‘‘मी अभ्यास आणि अध्यात्म यांची सांगड घालून माझे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केला. अध्यात्माच्या साहाय्याने मन शांत ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे झाले. माझा विश्वास आहे की, जेव्हा आपण देवाशी जोडलेले असतो, तेव्हा आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. ती मला प्राप्त झाली.’’ अवघड परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याचे हे विधान सर्वांसाठी आदर्शवत् आहे. अध्यात्म नाकारणार्या लोकांसाठी, तसेच तथाकथित पुरो(अधो)गामी, विज्ञानवादी, निधर्मीवादी यांच्यासाठी धु्रवचे विधान म्हणजे मोठी चपराकच ठरेल. ‘अध्यात्म अस्तित्वातच नाही’, ‘अध्यात्माने यश मिळू शकत नाही, तर बुद्धीमुळेच यश मिळते’, ‘अध्यात्मापेक्षा विज्ञान श्रेष्ठ आहे’, असे म्हणणार्यांना ध्रुवचे बोलणे पटणारच नाही. ते कसे चुकीचे आहे, हेच ते सांगत रहातील. ध्रुवच्या बोलण्यामागील अध्यात्मातील तथ्ये जाणून घेण्याचा ते प्रयत्नही करणार नाहीत. ‘जेईई मेन’ परीक्षा देणारा विद्यार्थी देवाशी स्वतःला जोडून त्याविषयीचा यशस्वी अनुभव समाजासमोर मांडतो, याहून आणखी कोणता वेगळा पुरावा विज्ञाननिष्ठांना द्यायला हवा ? त्याच्या उदाहरणातूनच विज्ञान हे अध्यात्माच्या मागे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होते.
‘अध्यात्माचा पाया असल्यास यश मिळू शकते’, हे ध्रुवने स्वतःच्या उदाहरणातून सिद्ध करून दाखवले आहे. केवळ दिवसरात्र अभ्यास करून नाही, तर अभ्यासाला अध्यात्माची जोड देऊन तो आज यशाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या युगात अध्यात्माची कास धरणे, हे पुष्कळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. अध्यात्माच्या बळावर ध्रुवला संयम राखता आला. त्याला ना ताण आला, ना परीक्षेच्या प्रक्रियेत कोणते अडथळे आले. त्याने परीक्षा आणि अभ्यास यांचे नियोजनही व्यवस्थित पूर्ण केले. त्यामुळे तो परीक्षेला सामोरे जाऊ शकला. याचे मूळ अध्यात्मामध्ये आहे. जे ध्रुवला जमले, ते अन्य विद्यार्थ्यांनाही जमू शकते. सर्वांनीच त्या दृष्टीने प्रयत्न करून मिळवलेले यश खर्या अर्थाने कौतुकास्पद ठरेल. ‘जेईई मेन’ या परीक्षेत ध्रुवसह १९ जणांनी यश मिळवले; पण केवळ त्यानेच त्याच्या यशामागील मुख्य सार सांगितले, हे विशेष आहे. ‘परीक्षेपूर्वी गणपतिस्तोत्र पठण करून गेल्याने अभ्यासातील सूत्रे आठवतात आणि चांगले यश मिळते’, हे अनुभवणार्या विद्यार्थ्यांचीही अनेक उदाहरणे आहेत. ‘परीक्षेत एखादे सूत्र आठवले नाही, मग देवाला प्रार्थना केल्यावर सूत्रे आठवून ती भराभर लिहिता आली’, याचीही प्रचीती अध्यात्म अनुसरणार्या अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. ही उदाहरणे पाहिली, तर बुद्धीला जेथे मर्यादा येते, तेथे अध्यात्माचा आधार घ्यावाच लागतो, हे लक्षात येते !
विज्ञानाची मर्यादा आणि अध्यात्माचा प्रारंभ !
अनेक जण आज ध्यान-धारणा किंवा ‘मेडिटेशन’ यांचे साहाय्य घेत आहेत. विज्ञानाच्या बळावर आज मनुष्याने अवकाशापर्यंत भरारी घेतलेली आहे; पण तरीही ‘इस्रो’मधील वैज्ञानिक प्रत्येक उपग्रह अवकाशात सोडण्यापूर्वी त्याची प्रतिकृती तिरुपति बालाजीच्या मंदिरात अर्पण करतात. उपग्रहाचा अंतराळातील पुढील प्रवास सुरक्षित होण्यासाठी पूजा आणि प्रार्थना करतात. आणखी एक उदाहरण द्यायचे झाले, तर गुजरातमधील गोशाळेतील २५ गायींना मध्यंतरी ‘लंपी’ विषाणूची लागण झाली होती. गायींना वाचवण्यासाठी श्री. महादेव देसाई यांनी द्वारकाधीश श्रीकृष्णाला नवस केला की, जर माझ्या गायी वाचल्या, तर मी तुझ्या दर्शनाला माझ्या २५ गायींसह चालत येईन. प्रत्यक्षातही गायी वाचल्याने त्यांनी त्यांचा नवस पूर्ण केला. जेथे विज्ञान हात टेकते, तेथून अध्यात्माचा मार्ग चालू होतो. मग मनुष्यालाही ईश्वरी शक्तीची जाणीव होते. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी ‘प्रार्थना केल्यामुळे कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते का ?’, याविषयी मध्यंतरी संशोधन केले होते. अध्यात्माची कास धरणार्यांचे प्रमाण हळूहळू वाढत आहे, हे दिलासादायक आहे. ध्रुव जैन याच्या उदाहरणातून ‘अध्यात्माच्या महानतेवर पुन्हा एकदा विचारमंथन घडावे, अशी आशा आहे.
‘अध्यात्मशास्त्रा’चा अभ्यासक्रमात समावेश व्हावा !
एखादी गोष्ट करण्यामागील भौतिक कारणमीमांसा विज्ञानामुळे समजते; पण त्यामागील भगवंताला अपेक्षित असणारा कार्यकारणभाव हा केवळ अध्यात्मातूनच सापडू शकतो. यातूनच अध्यात्माची श्रेष्ठता पदोपदी लक्षात येते. अध्यात्माचा मार्ग अवलंबल्याने सकारात्मकता वाढते. नैराश्य, तणाव आणि चिंता यांसारख्या मानसिक समस्या दूर होऊन मानसिक स्थैर्य लाभते. भविष्याची चिंता भेडसावत नाही. कार्यकुशलता वाढून व्यक्ती जीवनात यशस्वीही होते. प्रत्येक मनुष्याने अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायला हवा; पण त्याविषयी काही ठाऊकच नसणे हा सध्याच्या शिक्षणपद्धतीतील मूळ दोष आहे. तो प्रथम दूर करायला हवा. यासाठी व्यापक स्तरावर आणि मुळापासून प्रयत्न व्हायला हवेत. ध्रुव जैन याने संपादन केलेले यश आणि त्याने अवलंबलेला अध्यात्माचा मार्ग पहाता शैक्षणिक स्तरावर सर्वांनाच हा लाभ होण्यासाठी राज्यशासनाने पूर्वीच्या गुरुकुलपद्धतीनुसार सध्याच्या अभ्यासक्रमात ‘अध्यात्मशास्त्र’ या विषयाचा अंतर्भाव केल्यास सर्वांनाच त्यातील ज्ञानाचा लाभ होऊन मनुष्यजन्माचे सार्थक करता येईल, हेच खरे !
‘जेईई मेन’ परीक्षा देणार्या विद्यार्थ्याने अध्यात्माचे महत्त्व सांगणे, ही विज्ञानवाद्यांसाठी मोठी चपराकच ! |