आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत ‘वंदे भारत’ रेल्वेचे लोकार्पण !
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी या दिवशी मुंबई दौर्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते ‘मुंबई-सोलापूर’ आणि ‘मुंबई-शिर्डी’ या मार्गावर धावणार्या ‘वंदे भारत’ रेल्वेचे लोकार्पण होणार आहे. तीर्थक्षेत्रांच्या पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी या रेल्वे चालू करण्यात येणार आहेत. या दोन्ही रेल्वे भारतात चालू असलेल्या अनुक्रमे ९ आणि १० व्या ‘वंदे भारत’ रेल्वे असतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी २.४५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’ रेल्वेने सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, आळंदी या तीर्थक्षेत्रांना, तर मुंबई-शिर्डी ‘वंदे भारत’ ही रेल्वे नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शनीशिंगणापूर या तीर्थक्षेत्रांवरून जाणार आहे. ‘वंदे भारत’ च्या लोकार्पणानंतर सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार भुयारी मार्ग यांचेही पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होईल. दुपारी ४.३० वाजता पंतप्रधान ‘अल्जामिया-तुस-सैफियाह’ या परिससरातील विकासकामांचे उद़्घाटन करणार आहेत.