जिल्हा प्रशासन विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी कटीबद्ध : शिवभक्तांनी करसेवा करू नये ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी
कोल्हापूर, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन बांधील आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी काही प्रशासकीय गोष्टी पूर्ण कराव्या लागतात, त्या आम्ही पूर्ण करू. गडावर ज्यांच्याकडे रहिवासी असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही, हे अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत हटवलेच जाईल. आपण कायद्याच्या राज्यात रहात असल्याने कुणीही कायदा हातात घेऊ नये. जिल्हा प्रशासन विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी कटीबद्ध असून शिवभक्तांनी करसेवा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ९ फेब्रुवारीला गडप्रेमी, शिवभक्त, तसेच विविध संघटना यांच्या एकत्रित बोलावलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
Anti-encroachment drive at Vishalgad in 15 days: Collector https://t.co/fwLfEWOpIs
— TOI Cities (@TOICitiesNews) February 8, 2023
१. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, ‘‘अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया चालू आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने विविध गट सिद्ध केले आहेत. विशाळगडावर जेसीबी अथवा कोणतेही मोठे यंत्र जाणार नसल्याने पूर्णत: मनुष्यबळाचा वापर करून ते अतिक्रमण काढावे लागणार आहे. त्यामुळे शिवभक्तांनी महाशिवरात्रीला गालबोट लागेल अशी कोणतीही कृती करू नये, तसेच हा संदेश बाहेरच्या जिल्ह्यातही द्यावा. गडावर गांजा, अफू अशा गोष्टींच्या संदर्भात आम्ही कडक कारवाई करत आहोत.’’
२. श्री. सुखदेव गिरी म्हणाले, ‘‘यंदा महाशिवरात्रीसाठी शिवभक्त मोठ्या प्रमाणात विशाळगडावर येणार असल्याने त्यांना गडावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची आडकाठी करण्यात येऊ नये. हा सोहळा त्यांना आनंदाने साजरा करता येऊ दे.’’
३. ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई म्हणाले, ‘‘अतिक्रमणकर्ते न्यायालयात जातात. खाली खटला हरला की वरिष्ठ न्यायालयात दाद मागतात. हे असे किती दिवस चालणार ? आता जिल्हा न्यायालयात अतिक्रमणकर्त्यांनी दाद मागितली असून त्याचा निकाल जिल्हा प्रशासनाच्या बाजूने लागल्यास वनविभागाने त्यांना आणखी वरिष्ठ न्यायालयात जाण्याची वाट न पहाता तात्काळ अतिक्रमण काढून टाकावे.’’
४. शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे म्हणाले, ‘‘ऐतिहासिक स्मारके, गड, दुर्ग येथे पशूहत्या न होण्याविषयी जो शासकीय अध्यादेश निघाला आहेत. त्यावर कार्यवाही व्हावी.’’ यावर सर्वच शिवभक्तांनी ही कारवाई केवळ महाशिवरात्री पुरती न होता वर्षभर सातत्याने व्हावी, अशी मागणी केली.
५. श्री. हर्षल सुर्वे म्हणाले, ‘‘प्रशासन एकीकडे अतिक्रमण होणार नाही, असे स्पष्ट सांगत असतांना पशूहत्येसाठी शेड उभारली जाते हे योग्य नाही. अशा संदर्भात कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. विशाळगडावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक स्मारक उभारणार आहोत, त्यासाठी पुरातत्व विभागाने लवकरात लवकर ना हरकत अनुमती द्यावी.’’
या प्रसंगी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, श्री. इंद्रजित सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे, शहरप्रमुख श्री. रवीकिरण इंगवले यांसह विविध गडप्रेमी, शिवप्रेमी संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, विशाळगडावरील अतिक्रमणकर्ते उपस्थित होते.