नाशिक येथे ९ सहस्र रुपयांची लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्याला अटक !
भ्रष्टाचाराने पोखरलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग !
नाशिक – उपाहारगृह आणि मद्यालय चालू ठेवण्यासाठी प्रति मासाला ३ उपाहारगृहांचा १२ सहस्र रुपये हफ्ता मागत त्याबदल्यात ९ सहस्र रुपयांची लाच स्वीकारण्यात आली. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी लोकेश गायकवाड यांच्यासह २ खासगी दलाल पंडित शिंदे आणि प्रवीण ठोंबरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ७ फेब्रुवारी या दिवशी रंगेहात पकडून अटक केली आहे.
१. निफाड शहरातील उपाहारगृह व्यावसायिक असलेल्या तक्रारदाराचे येवला रस्त्यावर ३ बार आणि उपाहारगृहे आहेत. याची पडताळणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून केली जात असते.
२. नियमित पडताळणीमध्ये उपाहारगृहातील कामाच्या त्रुटी न काढण्यासाठी पथकातील अधिकारी गायकवाड, तसेच वसुलीसाठी मध्यस्थी असलेले खासगी व्यक्ती शिंदे आणि ठोंबरे यांनी एका उपाहारगृहाचे ४ सहस्र रुपये यांप्रमाणे १२ सहस्र रुपयांची ३ फेब्रुवारी या दिवशी मागणी केली होती.
३. तडजोडीअंती ३ उपाहारगृहांचे मिळून ९ सहस्र रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
संपादकीय भूमिकासर्व शासकीय सुविधा आणि भरघोस वेतन असतांनाही राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी लाच घेण्याचे भ्रष्ट कृत्य करतात. त्यामुळे त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे ! |