सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भ्रष्टाचार !
|
सिंधुदुर्गनगरी – सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेच्या वेळी ४ लाख ३२ सहस्र ३५० रुपयांचा अपहार झाला असून या प्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाचा वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम पुसांडे याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली. या भ्रष्टाचाराच्या विरोधात गावडे यांनी प्रारंभी आवाज उठवला होता.
१. पुसांडे याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची रक्कम शासनाच्या खात्यात न भरता स्वत:च्या वैयक्तिक खात्यात भरली, तसेच काही विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त रक्कमही वसूल केली, असा आरोप करत मनसेचे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त आणि संचालक यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.
२. त्यानुसार केलेल्या प्राथमिक चौकशीत विद्यार्थ्यांच्या शुल्कामध्ये घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी वरिष्ठ लिपिकाविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, असा आदेश दिला होता. आदेशानुसार महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रकाश गुरव यांनी ओरोस पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. तक्रारीवरून पुसांडे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला, असे गावडे यांनी सांगितले.