शॅकधारकांकडून समुद्रकिनार्यांवर अवैधरित्या कुपनलिका आणि शौचालयांचे ‘सोक पिट’
उच्च न्यायालयाची सरकार आणि शॅकधारक यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरणाची मागणी
पणजी, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – कळंगुट आणि कांदोळी किनारपट्टी भागांत पर्यटन शॅकधारक आणि इतर व्यावसायिक यांनी जागोजागी अवैधरित्या कुपनलिका (बोअरवेल) खोदल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढतांना सरकारकडे ‘या प्रकरणी कारवाई का केली नाही ?’, याचे स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच ज्यांनी शौचालयाचे शोष खड्डे (सोक पिट) आणि कुपनलिका खोदल्या आहेत, त्या सर्वांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून १७ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण मागवण्याचा आदेश खंडपिठाने दिला आहे, तसेच २२ फेब्रुवारीपर्यंत कार्यवाही अहवाल सुपुर्द करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पर्यटन खात्याला सहकार्य करण्याचा आदेश न्यायालयाने कळंगुट पोलिसांना दिला आहे.
🔸MUST READ | कांदोळी, कळंगुट किनाऱ्यांवरील बोअरवेल, सोकपिट बंद करा!
*वाचा सविस्तर बातमी👇https://t.co/pVlp9C4m48
— Goanvartalive (@goanvartalive) February 9, 2023
कांदोळी आणि कळंगुट किनारपट्टी भागांत मोठ्या प्रमाणावर पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. कुपनलिका खोदल्याने आणि शौचालयाचे शोष खड्डेही खोदल्याचे आढळून आले आहे. यामुळे किनारपट्टी नियमन क्षेत्राच्या (सी.आर्.झेड्.च्या) नियमाचे उल्लंघन झाले आहे. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका स्थानिक नागरिकाने प्रशासनाकडे वारंवार या प्रकाराविषयी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने शेवटी न्यायालयात धाव घेतली. (नागरिकांच्या तक्रारींची नोंद न घेणारे आणि शॅकवाल्यांसमोर झुकणारे प्रशासन काय कामाचे ? – संपादक) हे प्रकरण सुनावणीला आले, तेव्हा पर्यटन खात्याने कारवाई न केल्याबद्दल खंडपिठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या कुपनलिका आणि शोष खड्डे तातडीने ‘सील’ (बंद) करावे, असा आदेश खंडपिठाने दिला. ‘ज्या पर्यटन व्यावसायिकांनी हे अनधिकृत प्रकार केले आहेत, त्यांची पर्यटन शॅकची अनुज्ञप्ती रहित का करू नये ?’, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे.