गांधी कुटुंब नेहरूंचे आडनाव लावायला का घाबरते ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्यसभेत प्रश्न !
नवी देहली – कोणत्याही कार्यक्रमात नेहरूजींचे नाव घेतले नाही, तर काही लोकांचे केस उभे रहायचे. रक्त गरम व्हायचे. त्यांच्या पिढीतील व्यक्ती नेहरू आडनाव ठेवण्यास का घाबरतात, हे मला समजत नाही. नेहरू आडनाव असायला काय लाज आहे ? एवढी महान व्यक्ती तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मान्य नाही आणि तुम्ही आमचा हिशेब मागता ?, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेस आणि गांधी परिवारावर कठोर टीका केली. राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. या वेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून संपूर्ण भाषणाच्या वेळी ‘मोदी-अदानी भाई भाई’ अशा घोषणा देण्यात आल्या.
Addressing the Rajya Sabha. https://t.co/XO3F8kfkfY
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2023
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात मांडलेली सूत्रे !
एकटा व्यक्ती सर्वांवर भारी पडला !
देश पहात आहे की, एक व्यक्ती सर्वांना पुरून उरला आहे. अरे, घोषणाबाजी करायलाही माणसे पालटावी लागतात. मी एकटा तासभर बोलत आहे आणि थांबलेलो नाही. त्यांच्यात (विरोधी पक्षात) धाडस नाही, ते पळून जाण्याचा मार्ग शोधत आहेत.
भारत एका कुटुंबाची जहागिरी नाही !
भारत सर्वसामान्यांच्या घामातून उभारलेला आणि पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरांचा देश आहे, हे काही लोकांना समजून घ्यावे लागेल. ही कौटुंबिक जहागिरी नाही. ध्यानचंद यांच्या नावाने आम्ही खेलरत्न दिले आहेत. आम्ही अंदमान बेटांची नावे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवली.
गरिबी हटवण्यासाठी काहीही केले नाही !
कुणीही सरकारमध्ये आले की, देशासाठी काहीतरी करण्याची आश्वासने देऊन येतो. ‘गरिबी हटवा’ असे एकेकाळी सांगितले जात होते, ४ दशकांत काहीही झाले नाही. विकासाचा वेग काय आहे, विकासाचा हेतू काय आहे, त्याची दिशा, प्रयत्न आणि परिणाम काय आहेत, हे महत्त्वाचे आहे. जनतेच्या गरजांसाठी श्रम करावे लागतात.
मतपेढी नसल्याने ईशान्य भारतात वीजही पोचवली नाही !
ईशान्य भारतात काँग्रेसची मतपेढी नव्हती, त्यामुळे तेथे वीज पुरवण्याकडे लक्ष दिले नाही. आम्ही १८ सहस्र गावांना वीज पुरवली. त्यांचा विकास झाला आणि देशाच्या व्यवस्थेवरील विश्वास वाढला. तो विश्वास आम्ही जिंकला आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर दुर्गम गावांना आशेचा किरण दिसला, याचा आनंद आहे.
काँग्रेसने शेतकर्यांचा राजकारणासाठी वापर केला
लहान शेतकर्यांकडे दुर्लक्ष झाले, त्यांचा आवाज कोणी ऐकला नाही. आमच्या सरकारने छोट्या शेतकर्यांवर लक्ष केंद्रित केले. त्यांना बँकिंगशी जोडले आणि आज किसान सन्मान निधी वर्षातून ३ वेळा त्यांच्या खात्यात जमा केला जातो.
लस बनवणार्या शास्त्रज्ञांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला !
कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवणार्या शास्त्रज्ञांचा अपमान करण्याचे किती प्रयत्न झाले. लेख लिहिले गेले, बोलले गेले. ‘हे लोक विज्ञानविरोधी आहेत, ते तंत्रज्ञानविरोधी आहेत’, अशी टीका करण्यात आली. आमच्या शास्त्रज्ञांची अपकीर्ती करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांना देशाची चिंता नाही, त्यांना त्यांच्या राजकारणाची चिंता आहे.
काँग्रेसने ९० वेळा निवडून आलेली राज्य सरकारे पाडली !
विरोधी पक्षात बसलेल्यांनी राज्यांचे अधिकार हिरावून घेतले आहेत. सत्तेत कोण होता, कोणता पक्ष होता, कलम ३५७ चा वापर कुणी केला ? ९० वेळा निवडून आलेली सरकारे पाडली. ते कोण आहेत ? हे कुणी केले ? इतकेच नाही, तर एका पंतप्रधानाने कलम ३५६ चा ५० वेळा वापर केला. त्या म्हणजे इंदिरा गांधी. केरळमधील जे आज त्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्या डाव्या विचारसरणीच्या लोकांचे तेथे सरकार होते, जे नेहरूजींना आवडले नाही आणि त्यांनी ते पाडले. तमिळनाडूमध्ये एम्.जी.आर्., करुणानिधी यांच्यासारख्या दिग्गजांची सरकारेही या काँग्रेसवाल्यांनी पाडली. शरद पवार वर्ष १९८० मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे सरकारही पाडण्यात आले. आज तेही काँग्रेस समवेत आहेत.