न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी अधिवक्त्याला न्यायालयीन कोठडी !
कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश
बेंगळुरू – कर्नाटक उच्च न्यायालयाने अधिवक्ता के.एस्.अनिल यांना न्यायिक व्यवस्था आणि न्यायिक अधिकारी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याच्या प्रकरणी १ आठवड्याची न्यायालयीन कोठडी ठोठावली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अशोक एस्. किनगी यांच्या खंडपिठाने ही शिक्षा सुनावली. न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणात अधिवक्ता अनिल यांनी, ‘ज्या खंडपिठाच्या अंतर्गत माझा खटला चालू आहे, त्याच खंडपिठातील न्यायमूर्तींच्या विरोधात आरोप केल्यामुळे माझ्या विरोधात चालवण्यात येणारा खटला दुसर्या खंडपिठाकडे वर्ग करावा’, अशी मागणी केली होती.
The High Court of #Karnataka has sentenced an advocate to prison for one week for “making wild allegations against the judicial system and the Judicial Officers in particular”https://t.co/iTbF4exE1z
— Hindustan Times (@htTweets) February 9, 2023
अधिवक्ता अनिल यांना शिक्षा सुनावतांना न्यायालयाने म्हटले की,
१. अधिवक्त्यांनी न्यायाधिशांवर केलेल्या आरोपांवरून हे लक्षात येते की, अधिवक्त्यांना न्यायव्यवस्थेशी काहीही देणे-घेणे नाही. त्यांनी यापूर्वीही न्यायव्यवस्थेविषयी अशा प्रकारची वक्तव्ये केली होती.
२. त्यांनी न्यायव्यवस्था आणि न्यायिक अधिकारी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून समाजात न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला.
३. अनिल हे वकिली व्यवसाय करतात; मात्र त्यांनी ज्या प्रकारे आरोप केले आहेत, ते पहाता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यावाचून दुसरा पर्याय नाही.
४. न्यायाधिशांच्या विरोधात केलेले आरोप विनाअट मागे घेण्याची सूचना अनिल यांना दिली होती. विनाअट क्षमा मागण्यासाठी आरोपीला मुदत देऊनही त्यांनी तसे केले नाही.
५. मौखिक अथवा लिखित अर्ज केल्याविषयी न्यायालयाने अधिवक्ता अनिल यांना काही प्रश्न विचारले; मात्र त्यांनी न्यायालयाचा प्रश्न टाळून अहंकाराने वागायला प्रारंभ केला. न्यायालयाने संयमाने ऐकण्याचा प्रयत्न केला, तरीही अनिल यांनी न्यायालयात वाईट वर्तन करण्यास प्रारंभ केला.