महिलांना मशिदीत नमाजपठण करण्याची मुभा !
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सर्वाेच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र !
नवी देहली – मुसलमान महिलांची इच्छा असेल, तर त्या मशिदीत जाऊन नमाजपठण करू शकतात. इस्लाममध्ये महिलांना मशिदीत पठण करण्यात कोणताही प्रतिबंध नाही; पण त्यांनी पुरुषांमध्ये किंवा त्यांच्यासमवेत मशिदीत बसू नये. एखाद्या मशिदीत तेथील व्यवस्थापन समितीने महिलांसाठी वेगळी जागा निश्चित केली असेल, तर महिला तिथे जाऊ शकतात, अशी माहिती ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वाेच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. पुण्यातील अधिवक्त्या फरहा अनवर हुसैन शेख यांनी वर्ष २०२० मध्ये सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून त्यात मशिदीत महिलांना करण्यात आलेली प्रवेशबंदी अवैध घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यावर न्यायालयाने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार बोर्डाने वरील माहिती दिली.
‘मस्जिद में अलग बैठकर नमाज पढ़ सकती हैं महिलाएं,’ सुप्रीम कोर्ट में बोला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड #SupremeCourt https://t.co/PgB3sYfcF0
— AajTak (@aajtak) February 9, 2023
याचिकेत दावा करण्यात आला आहे की, इस्लामचा पवित्र ग्रंथ असणार्या कुराणमध्ये महिलांना मशिदीत प्रवेश नसण्यासंबंधीचा कोणताही उल्लेख नाही. या निर्बंधामुळे मुसलमान महिलांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करण्यासह त्यांच्या सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकाराचेही उल्लंघन होते. मक्का आणि मदिना येथे महिला भाविक त्यांच्या कुटुंबातील पुरुषांसमवेत हज यात्रा करतात.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रतिज्ञापत्रात मांडलेली सूत्रे
१. महिलांनी मशिदीत नमाजासाठी जायचे कि नाही, हे त्यांनाच ठरवायचे आहे. मुसलमान महिलांना ५ वेळा नमाज किंवा शुक्रवारचे नमाजपठण करण्याचे कोणतेही बंधन नाही. महिलांनी घरात किंवा मशिदीत नमाजपठण केले, तर त्यांना एकसमानच पुण्य मिळेल; पण पुरुषांसाठी असे नाही. त्यांनी मशिदीतच नमाजपठण करण्याचा नियम आहे.
२. बोर्ड तज्ञांची संस्था आहे. ती इस्लामच्या सिद्धातांवर सल्ला देते; पण ती कोणत्याही धार्मिक मान्यतेवर प्रतिक्रिया व्यक्त करत नाही.
३. मक्का किंवा मदिना येथे पुरुष आणि महिला यांसाठी वेगवेगळी व्यवस्था आहे. महिला आणि पुरुष यांना वेगळे करणे इस्लामी धर्मग्रथांत नमूद एक धार्मिक आवश्यकता होती. ती रहित करता येत नाही. मक्का आणि मदिना यांच्या संदर्भात याचिकाकर्त्याची भूमिका पूर्णतः चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. मक्केच्या संदर्भात तिथे पुरुष आणि महिला दोघांनाही एकमेकांपासून अंतर राखण्याचा सल्ला दिला जातो. तिथे पुरुष आणि महिला वेगवेगळ्या गटांत बाजूला होतात.
४. भारतात मशीद समित्या महिलांसाठी स्वतंत्र जागा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र आहेत. मुसलमान समुदायानेही नवी मशीद बांधतांना महिलांसाठी जागा ठेवण्याची योग्य ती काळजी घ्यावी.