‘संकटात साहाय्य करतो तोच खरा मित्र’, ही म्हण सार्थ करणारी भारताची कृती !
‘भारताला सतत पाण्यात बघणारा, काश्मीर प्रश्नावर सतत पाकिस्तानची बाजू घेणारा आणि काश्मीरमधील आतंकवादी कारवायांना आर्थिक पाठबळ देणारा तुर्कीये देश आज निसर्गाच्या रौद्र रूपापुढे अक्षरशः कोलमडून पडला आहे. ६ फेब्रुवारीपासून चालू असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी संपूर्ण तुर्कीये देश अक्षरशः हादरून गेला आहे. जी छायाचित्रे समोर येत आहेत, त्यातून जवळपास २० सहस्र लोकांचा यात मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुर्कीये जवळपास ५० वर्षांनी विकासामध्ये मागे ढकलला गेला आहे, इतकी भयंकर भूकंपाची मालिका ही अजून चालू आहे.
१. अन्य राष्ट्रांच्या तुलनेत भारताने तातडीने केलेले साहाय्य
एकीकडे त्याचे मित्र देश ‘आम्ही हे साहाय्य करू’ आणि ‘ते साहाय्य करू’, असली आश्वासने देण्यात व्यस्त आहेत. असे असतांना भारताने स्वतःचे शत्रूत्व बाजूला ठेवून तातडीने मानवतेच्या दृष्टीने लागणारे साहाय्य पाठवून दिले आहे. हा लेख लिहीपर्यंत ते साहाय्य तिकडे पोचले असून त्यांनी बचावकार्याला प्रारंभही केलेला असेल.
भारताने युद्ध पातळीवर ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण दला’चे (‘एन्.डी.आर्.एफ्.’चे) शोध आणि बचाव पथक ज्यामध्ये अशी परिस्थिती हाताळण्यासाठी अतिशय प्रशिक्षित असलेले ४७ लोक (पुरुष-महिलांचे) समाविष्ट आहेत. त्याखेरीज ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी अत्यंत कुशल ‘श्वान पथक’ वायूदलाच्या विमानाने तुर्कीला रवाना केले आहे. भारताने यासह वैद्यकीय साहाय्य, बचाव साहित्य, ड्रिलिंग मशीनही पाठवून दिले आहे. ही केवळ पहिली टीम आहे. या पाठोपाठ जवळपास १०० लोकांपेक्षा अधिक जणांचा सहभाग असलेल्या एन्.डी.आर्.एफ्.च्या पथकांना सज्ज रहाण्याचे आदेश दिले गेले आहेत.
२. तुर्कीयेच्या मित्रराष्ट्रांकडून केवळ नियोजन, तर भारताकडून प्रत्यक्ष कृती
जिकडे रशिया, चीन, युरोपियन युनियनसारखे देश ‘अजून काय साहाय्य करायचे ?’, याचे नियोजन करत आहेत. तोवर भारताच्या पथकाने संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्याला प्रारंभही केला आहे. तुर्कीयेचा मित्र असलेल्या पाकिस्तानला स्वतःच्याच घरातील समस्या सावरता येत नाहीत. तेव्हा त्याच्याकडून साहाय्याची अपेक्षा वगैरे करणे दूर राहिले.
तुर्कीयेचे राजदूत फिरात सुनेल (तुर्कीयेचे भारतातील राजदूत) यांनी भारताच्या साहाय्याने भारावून जाऊन तुर्कीश भाषेत एक सुविचार ट्वीट केला आहे. ज्याचा अर्थ होतो ‘संकटात साहाय्य करतो तोच खरा मित्र !’
३. तुर्कीये सरकार भारताच्या साहाय्याचा विचार करील का ?
भारताने हे दाखवून दिले आहे, तसेच कोणताही गाजावाजा न करता एक वेगळा आदर्श जगापुढे ठेवला आहे. आता तुर्कीयेने ठरवायचे आहे की, यातून काय शिकायचे ? भारताविषयीची भूमिका पुढे जाऊन शत्रूत्वाची ठेवायची ? कि त्याला वेगळे रूप द्यायचे ?; पण भारताने केलेले साहाय्य नक्कीच तुर्कीयेच्या सरकारला विचार करायला लावेल, अशी अपेक्षा आहे.’
– श्री. विनित वर्तक, मुंबई (श्री. विनित वर्तक यांच्या ‘ब्लॉग’वरून)