भाविकांना आध्यात्मिक लाभ प्राप्त करून देणारी मंदिर व्यवस्था निर्माण व्हावी ! – परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या विश्वस्तांचा मनोदय
जळगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत ‘मंदिरांचे सुप्रबंधन (सुव्यवस्थापन)’ या विषयावर पार पडलेला परिसंवाद
जळगाव – येथे पार पडलेल्या महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेमध्ये ‘मंदिराचे सुप्रबंधन (सुव्यवस्थापन)’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील मंदिरांचे विश्वस्त, तसेच सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीचे जळगाव समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. यामध्ये सहभागी झालेले मंदिरांचे विश्वस्त मंदिरांचे व्यवस्थापन गचांल्या पद्धतीने होण्यासाठी करत असलेले प्रयत्न आणि त्यामध्ये गुणवृद्धी कशी करता येईल, याविषयी चर्चा झाली. यातील सूत्रे राज्यातील सर्वत्रच्या मंदिर विश्वस्तांना मंदिरांतील व्यवस्थापनात गुणवृद्धीसाठी उपयोगाची ठरतील. यासाठी या संवादामधील महत्त्वाची सूत्रे येथे देत आहोत.
अतीमहनीयांच्या प्रवेशिकेमुळे सर्वसामान्य भाविकांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो ! – दिगंबर महाले, मंगलग्रह देवस्थान, अंमळनेर, जळगाव
अनेक देवस्थानांमध्ये विश्वस्तांची छायाचित्रे लावलेली असतात. आमच्या येथे छायाचित्र दूर; पण विश्वस्तांची नावेही लिहिली जात नाहीत. मंदिर ट्रस्टीच्या अध्यक्षांपासून ते झाडू मारणारा या सर्वांच्या गळ्यात ‘सेवेकरी’ लिहिलेला सारखाच ‘बॅच’ असतो. आमच्याकडे जेव्हा दूरभाष येतात, तेव्हा कुणीही विश्वस्त ‘मी अध्यक्ष किंवा विश्वस्त बोलत आहे’, असे सांगत नाही. ‘आम्ही सेवेकरी बोलत आहोत’, असेच आम्ही सांगतो. मंदिरातील धर्म आणि धार्मिकता टिकवण्याचे अन्यांच्या तुलनेत आपले दायित्व अधिक आहे. हे दायित्व कुणीही आपल्याला दिलेले नाही. धर्मप्रेमामुळे आपण ते स्वीकारले आहे. धर्म आणि धार्मिकता वाढवायची असेल, तर भाविकांच्या सद़्भावनेला धक्का पोचवू नका. असे झाल्यास त्यांच्या धर्मभावनांची हानी होईल. आमच्याकडे ‘अतीमहनीय’ (व्ही.आय्.पी.) या गोंडस नावाने कुणालाही मंदिरात प्रवेश दिला जात नाही. देवापुढे सर्व समान आहेत. अशा धनाढ्यांना प्रवेश दिल्यास सर्वसामान्य भाविकांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. त्यामुळे ही प्रथा सर्वप्रथम बंद करायला हवी. देवाच्या दारी आरतीचा लिलाव करू नका. मंदिराची स्वच्छता महत्त्वाची आहे. प्रसादाप्रती भाविकांचा भाव असतो; परंतु तो चविष्ट देण्याचा प्रयत्न असायला हवा, म्हणजे तो ग्रहण करून भाविक तृप्त होतील. मंदिरामध्ये नम्रता, स्वच्छता आणि पारदर्शकता असावी, यासाठी विश्वस्तांचा प्रयत्न असावा.
आमच्या देवस्थानाकडून भाविकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न ! – अशोक गगडे, व्यवस्थापक, श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट, ओझर, पुणे
ओझर येथील श्री विघ्नहर गणपति देवस्थानामध्ये दर्शनार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. येथे भक्तांसाठी रहाण्याची सुविधा, महाप्रसाद याची उत्तम सुविधा देण्यात आली आहे. सकाळ आणि सायंकाळी अल्पदरात पोटभर महाप्रसाद दिला जातो. सहस्रावधी भाविक याचा लाभ घेत आहेत. हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शनाची सुविधा अवघ्या ६ घंट्यांमध्ये देण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आमच्या देवस्थानाचा गौरव केला आहे.
भाविकाला आध्यात्मिक लाभ व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न ! – विजय पवार, अध्यक्ष, आशापुरी देवस्थान, पाटण, धुळे
वर्ष २००९ मध्ये देवीच्या मूर्तीला तडा गेला होता. त्या वेळी धर्मशास्त्रानुसार आम्ही वज्रलेप महाविधी केला. तेव्हापासून हा पूजाविधी मंदिरामध्ये प्रतिवर्षी केला जातो. राजा ज्याप्रमाणे देवीची पूजा करील, त्याप्रमाणे हा ‘राजोपचार’ विधी होतो. ग्रामस्थांनीही त्यासाठी सहकार्य केले. आमच्या मंदिरात येणार्या भाविकांची निवास आणि महाप्रसाद यांची अल्पदरामध्ये उत्तम सोय केली जाते. येणार्या प्रत्येकाला आनंद मिळावा आणि तो आनंद घेऊन घरी जावा, असा आमचा प्र्रयत्न असतो. भाविकांनी अर्पण केलेला एक-एक रुपया आमच्यासाठी लाख रुपयाप्रमाणे आहे. मंदिरात आलेल्या प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक लाभ मिळावा, यासाठी आमचा प्रयत्न असतो.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन करतांना श्री. प्रशांत जुवेकर यांनी ‘भक्तांच्या शारीरिक आणि मानसिक गरजांसह आध्यात्मिक गरजाही असतात. आध्यात्मिक गरजांची पूर्तता मंदिरांमध्ये झाली पाहिजे. भाविक मंदिरामध्ये यथाशक्ती अर्पण करतात, त्याचा योग्य विनियोग व्हायला हवा’, असे मत व्यक्त केले.
‘भक्त घडेल’, असा मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम असायला हवा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्थामंदिरे ही भक्तांसाठी आहेत. भगवंताशी अनुसंधान साधण्याचे मंदिर हे माध्यम आहे. भाविकांना मंदिरामध्ये सुलभतेने दर्शन मिळायला हवे. ‘अतीमहनीय’ प्रवेशिकेची प्रथा बंद व्हायला हवी. देवासाठी सर्व भक्त हे अतीमहनीय आहेत. भक्ताला प्रसाद मिळाला पाहिजे. गरीब भाविकांना रहाण्याची सुविधा अल्पदरात मिळावी. मंदिर व्यवस्थापनात भाविकांचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. मंदिरांमधून देवहित म्हणजे देवतांची पूजा, भक्तहित म्हणजे भाविकांची सुयोग्य व्यवस्था आणि धर्महित म्हणजे मंदिरांतून धर्मप्रसार हे योग्य प्रकारे साधणे याचाच अर्थ चांगले व्यवस्थापन होय. मंदिरांच्या माध्यमातून धर्मवृद्धी व्हायला हवी. मंदिराच्या व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम व्हायला हवा; मात्र हा अभ्यासक्रम केवळ बौद्धिक न होता आध्यात्मिकदृष्ट्या असावा. मंदिर व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमातून भक्त घडला पाहिजे. |
संपादकीय भूमिकामंदिरांच्या माध्यमातून देवहित, भक्तहित आणि धर्महित साधल्यास चांगले व्यवस्थापन साध्य होणे शक्य ! |