संभाजीनगर येथे साडेआठ लाखांची लाच घेणार्या जलसंधारण अधिकार्याला अटक !
संभाजीनगर – कोल्हापुरी बंधार्याच्या कामाचे १ कोटी ३७ लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी ठेकेदाराकडून ८ लाख ५० सहस्र रुपयांची लाच घेणारे येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी ऋषिकेश देशमुख (३४ वर्षे) यांना ६ फेब्रुवारी या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. जलसंधारण कार्यालयाच्या आवारातच ही कारवाई करण्यात आली. देशमुख यांना साहाय्य करणारा लिपिक भाऊसाहेब गोरे याच्या विरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षीची ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
परभणी जिल्ह्यातील गवळी पिंपळी (ता. सोनपेठ) येथील कामाचे १८ लाख रुपये आणि गोविंदपूर (तालुका पूर्णा) येथील कामाचे १ कोटी १९ लाख अशी एकूण १ कोटी ३७ लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी १ ठेकेदार जलसंधारण कार्यालयात चकरा मारत होता. उपविभागीय जलसंधारण अधिकारी ऋषिकेश देशमुख यांच्याकडे सध्या संभाजीनगरचाही पदभार आहे. त्याने हे देयक काढण्यासाठी जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे यांना ७.५ टक्क्यांप्रमाणे ८ लाख ३ सहस्र रुपये आणि स्वतःला ५० सहस्र रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. त्यामुळे ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराने पोखरलेला जलसंधारण विभाग ! अशा लाचखोर अधिकार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल ! |