विरोधकांना देशाची क्षमता आणि सामर्थ्य यांच्या वाढीमुळे निराशा ! – पंतप्रधान मोदी
नवी देहली – विरोधकांच्या निराशेचे कारण म्हणजे, देशाची क्षमता वाढत आहे, देशाचे सामर्थ्य वाढत आहे. वर्ष २००४ ते २०१४ या काँग्रेस सरकारच्या १० वर्षांच्या काळात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दहशतीचे वातावरण होते. संपूर्ण देशात हिंसाचार पसरला होता. त्या १० वर्षांत भारताचा आवाज ऐकायलाही कुणी सिद्ध नव्हते; पण वर्ष २०१४ पासून देशाचे सामर्थ्य वाढले आणि जगभरात देशाचे नाव उंचावले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलतांना काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसच्या काळात देशात आतंकवाद, हिंसाचार आणि घोटाळे वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘पायाखाली भूमी नाही, असे असतांनाही तुम्हाला त्याची जाणीव नाही’, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
(सौजन्य : CNBC-TV18)
पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली सूत्रे
१. सत्तेत असतांना वर्ष २००४ पासून २०१४ पर्यंत विरोधकांना मोठी संधी होती; पण त्यांनी सर्व संधी वाया घालवल्या. देशावर इतकी आतंकवादी आक्रमणे झाली; पण सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. १० वर्षे सहस्रो भारतियांचे रक्त वाहिले. सीमांवर सुरक्षा वाढवण्याची आवश्यकता होती; पण काँग्रेस घोटाळ्यांत व्यस्त होती.
२. काँग्रेसवाले ‘२ जी’ घोटाळ्यात अडकले. वर्ष २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा झाली. देशातील खेळाडूंना मोठी संधी होती; पण हे लोक या स्पर्धेच्या घोटाळ्यात अडकले आणि देशाची अपकीर्ती झाली. ऊर्जेला कोणत्याही देशाच्या विकासात पुष्कळ महत्त्व आहे. जेव्हा भारताला ऊर्जेच्या क्षेत्रात पुढे जाण्याची आवश्यकता होती, त्या काळात देशभरात विद्युत् पुरवठा खंडित होण्याविषयी चर्चा व्हायची. यांचा कोळसा घोटाळाही चर्चेत आला.
३. येणार्या काळात काँग्रेसच्या र्हासावर हॉर्वर्डसह जगभरातील अनेक विश्वविद्यालयांमध्ये अभ्यास केला जाईल.