सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर यांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या साप्ताहिक भक्तीसत्संगाविषयी शिकायला मिळालेली सूत्रे !
‘१.२.२०२३ या दिवशी सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात मला गुरुकृपेने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा सत्संग लाभला. त्या सत्संगाच्या वेळी मला त्या घेत असलेल्या साप्ताहिक भक्तीसत्संगाविषयी जाणून घेण्याची इच्छा झाली; म्हणून मी त्यांना विचारले, ‘‘वर्ष २०१६ पासून प्रत्येक गुरुवारी भक्तीसत्संग चालू आहे. त्यामध्ये तुम्ही सतत २ घंटे मार्गदर्शन करता. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने चालू असलेला हा भक्तीसत्संग तुम्ही कशा प्रकारे घेत आहात ?’, हे मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. याविषयी तुम्ही सांगू शकाल का ?’’ त्या वेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनातील सूत्रे, त्या सूत्रांविषयी गुरुकृपेने माझे झालेले चिंतन आणि मला शिकायला मिळालेली अन् जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
पू. शिवाजी वटकर यांच्या या लेखामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या साप्ताहिक भक्तीसत्संगाचे अद्वितीयत्व शिकायला मिळाले. ‘या भक्तीसत्संगाचा लाभ घेण्याची प्रेरणा सर्व साधकांना होऊदे’, अशी माझी माझे गुरू प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी प्रार्थना ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ( ७.२.२०२३) |
१. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितलेले सूत्र
‘भक्तीसत्संग हा माझ्यासाठी आहे’, असे मला वाटते. त्या दृष्टीने मी सत्संग घेत असते.
१ अ. (पू.) शिवाजी वटकर यांचे झालेले चिंतन – ‘उच्च आध्यात्मिक पातळी असूनही श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना ‘हा सत्संग स्वत:साठी आहे’, असे वाटते, तर सामान्य साधकांना सत्संगाचे पुष्कळ महत्त्व वाटून त्यांनी त्यातील सूत्रे कृतीत आणली पाहिजेत’, असे वाटणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने होत असलेला हा भक्तीसत्संग माझ्यासारख्या सर्वसामान्य साधकांसाठी आहे, तरीही हा सत्संग घेणार्या साक्षात् महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना ‘हा सत्संग स्वत:साठी आहे’, असे वाटते. अशा वेळी ‘माझ्यासारख्या साधकांना त्याचे महत्त्व किती वाटले पाहिजे ?’, हे लक्षात घेऊन ‘सत्संग तळमळीने ऐकायला पाहिजे आणि त्यात शिकायला मिळालेली सूत्रे कृतीत आणली पाहिजेत’, याची मला जाणीव झाली.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितलेले सूत्र
सत्संगातील प्रसंग सत्ययुगातील असेल, तर मी सूक्ष्मातून सत्ययुगात जाऊन प्रसंगातील स्थळी जाऊन सत्संगात वर्णन करत असलेले ते स्थळ अनुभवते.
२ अ. (पू.) शिवाजी वटकर यांचे झालेले चिंतन – श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याप्रमाणे सत्संगाशी पूर्ण समरस झाल्यास साधकांना सत्संगात सांगितलेल्या गोष्टींचा लाभ होऊ शकणार असणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सत्संगाशी समरस होतातच; पण सत्संग ऐकणार्या साधकांनाही त्या सत्संगात वर्णन केलेल्या युगात आणि त्या स्थळी सूक्ष्मातून घेऊन जातात. अर्थातच ‘साधकांनी मनापासून आणि आत्मीयतेने भक्तीसत्संगात सहभागी होऊन श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यासारखा भाव ठेवला, तरच त्यांना त्याचा लाभ होऊ शकतो’, असे मला शिकायला मिळाले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितलेले सूत्र
‘सत्संगात सांगत असलेला प्रसंग प्रत्यक्ष घडत आहे’, असे मला जाणवते. मी तो प्रसंग प्रत्यक्ष अनुभवते. मी सत्संगात चालू असलेल्या प्रसंगातील भूमिकेशी एकरूप होऊन जाते, उदा. गुरुचरित्रातील प्रसंगामध्ये ‘त्या भक्ताने सेवा कशी केली ? कसा भाव ठेवला ?’, ते मी स्वतः अनुभवते.
३ अ. (पू.) शिवाजी वटकर यांचे झालेले चिंतन – श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याप्रमाणे साधकांनीही भक्तीसत्संगाच्या वेळी आणि अन्य प्रसंगी त्या त्या भूमिकेशी एकरूप झाल्यास साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊ शकणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भक्तीसत्संगात वर्णन केलेल्या प्रसंगातील पात्राच्या भूमिकेशी एकरूप होतात. त्या सत्संगातील प्रसंगाचे इतके सुंदर वर्णन करतात की, तो प्रसंग प्रत्यक्ष अनुभवता येतो. ‘साधकही भक्तीसत्संगाच्या वेळी आणि सेवा करतांना त्या त्या भूमिकांशी एकरूप झाले, तर साधकांना त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती निश्चित होऊ शकते’, असे माझ्या लक्षात आले.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितलेले सूत्र
मी रामनाथी आश्रमातील माझ्या नेहमीच्या सेवेच्या खोलीत बसूनच भक्तीसत्संग घेते. त्या ठिकाणी अनिष्ट शक्तींची मोठी आक्रमणे होत असतात. परम पूज्यांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) प्राणशक्ती न्यून असल्याने ते शक्यतो खोलीबाहेर जात नाहीत. तरीही त्यांनी एक दिवस माझ्या सेवेच्या खोलीत येऊन खोलीचे परीक्षण केले. त्यांच्या खोलीत येण्यामुळे खोलीतील चैतन्य वाढून त्याचा भक्तीसत्संगाला लाभ झाला.
४ अ. (पू.) शिवाजी वटकर यांचे झालेले चिंतन – भक्तीसत्संगाला अनिष्ट शक्तींचा सूक्ष्मातून प्रचंड विरोध होत असल्याने साधकांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय, प्रार्थना आणि कृतज्ञताभाव वाढवणे आवश्यक ! : अनिष्ट शक्तींचा भक्तीसत्संगाला सूक्ष्मातून प्रचंड विरोध होत असल्यामुळे त्या शक्ती साधकांवर आक्रमणे करत आहेत. त्यामुळे साधकांना त्रास होऊन भक्तीसत्संगात मन एकाग्र होण्यात अडथळे येऊ शकतात. त्यासाठी आपण साधकांनी आध्यात्मिक उपाय, प्रार्थना आणि कृतज्ञताभाव यांत वाढ करणे आवश्यक आहे’, असे मला वाटले.
५. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितलेले सूत्र
सत्संग गुरुवारी असतो, तो गुरूंचा वार आहे. त्या दिवशी गुरुतत्त्व कार्यरत असते.
५ अ. (पू.) शिवाजी वटकर यांचे झालेले चिंतन – भक्तीसत्संगाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला पराकोटीचा भाव प्रकट होत असतो. ‘आपण साधकांनी श्री गुरूंप्रती तसाच भाव ठेवला, तर आपल्यालाही भावस्थितीत रहाता येईल’, असे मला वाटते.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितलेले सूत्र
सत्संगाला ईश्वराचे म्हणजे गुरुतत्त्वाचे अधिष्ठान आहे. त्यामुळे तो सत्संग कुणीही घेतला, तरी तेवढाच परिणामकारक होईल.
६ अ. (पू.) शिवाजी वटकर यांचे झालेले चिंतन – अहंशून्य असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगाचा कर्तेपण न घेणे आणि भक्तीसत्संगासाठी परात्पर गुरु डॉक्टर अन् श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा संकल्प कार्यरत असल्यामुळे भक्तीसत्संग प्रभावी होत असणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या बोलण्यावरून ‘त्या भक्तीसत्संगाचा कर्तेपणा घेत नाहीत’, हे माझ्या लक्षात आले. स्वतःकडे कर्तेपण न घेणे आणि अहंशून्यता यांमुळे भक्तीसत्संग प्रभावी अन् दैवी होतो. क्वचित् प्रसंगी अन्य साधिका (कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि कु. योगिता पालन) भक्तीसत्संग घेतात. ‘इतर साधिकांनी घेतलेला सत्संगही प्रभावी होतो; कारण त्यांच्या भक्तीसत्संगासाठीही ईश्वरी अधिष्ठान असून परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा संकल्प कार्यरत असतो’, असे मला सत्संग ऐकतांना जाणवते.
७. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितलेले सूत्र
भक्तीसत्संग हा दैवी सत्संग आहे. तो दैवी नियोजनानुसार चालतो.
७ अ. (पू.) शिवाजी वटकर यांचे झालेले चिंतन – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधकांमध्ये भक्तीभाव वाढावा आणि त्यांना साधना करून आनंद मिळावा’, यासाठी हा दैवी भक्तीसत्संग चालू केला असल्यामुळे साधकांनी त्याचा लाभ करून घेतला पाहिजे’, असे वाटणे : ३.२.२०२३ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मार्गदर्शनात म्हटले आहे, ‘सध्या आपत्काळ सूक्ष्मातून आला असल्याने साधकांच्या मनात नकारार्थी विचार येत आहेत. बर्याच साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास वाढले आहेत. त्यामुळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करतांना आपण देव आणि गुरु यांच्या प्रतीचा भाव वाढवायला हवा.’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले त्रास मी स्वतः अनुभवत आहे. ते त्रिकाल ज्ञानी आणि द्रष्टे आहेत. त्यांना पुढे येणारा आपत्काळ ठाऊक असल्यामुळे त्यांनी ‘साधकांना त्रास न होता साधना करून आनंद मिळावा आणि साधकांमध्ये भक्तीभाव वाढवा’ यासाठी हा भक्तीसत्संग चालू केला आहे; म्हणून ‘साधकांनी दैवी नियोजनानुसार चालू झालेल्या या दैवी सत्संगाचा लाभ करून घेतला पाहिजे’, हे मला शिकायला मिळाले.
८. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितलेले सूत्र
भक्तीसत्संगाच्या वेळी चैतन्यमय वातावरण निर्माण होऊन पक्षी आणि फुलपाखरे येतात.
८ अ. (पू.) शिवाजी वटकर यांचे झालेले चिंतन – श्रीसत्शक्ति सिंगबाळ यांच्यातील भावभक्तीमुळे भक्तीसत्संगाच्या वेळी वातावरण चैतन्यमय होऊन संपूर्ण सृष्टी आनंदाने पुलकित होते. सत्संगाचा लाभ घेण्यासाठी पक्षी आणि फुलपाखरेही सत्संगाच्या ठिकाणी येतात.
प्रत्येक गुरुवारी २ घंटे भक्तीसत्संगाच्या माध्यमातून सहस्रो साधकांना भावविश्वात घेऊन जाणारे आणि साधकांची प्रगती करवून घेणारे महान गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी मी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.२.२०२३)
भक्तीसत्संगाविषयी जाणवलेली अन्य सूत्रे !अ. मी कथाकार, प्रवचनकार आणि कीर्तनकार यांचेही सत्संग ऐकले असून त्यातूनही मला पुष्कळ शिकायला मिळाले; परंतु मी भावस्थिती अनुभवून कृतीप्रवण होण्यास पुष्कळ अल्प पडलो. ‘सनातनच्या भक्तीसत्संगाने त्याची उणीव भरून निघत आहे’, असे मला जाणवते. आ. भक्तीसत्संग हा ‘ऑनलाईन’ म्हणजे संगणकीय प्रणालीद्वारे आयोजित केलेला असतो, तरीही त्यामध्ये जिवंतपणा जाणवतो. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ प्रत्यक्ष समोर सत्संग घेत असून त्या आम्हा साधकांना भावविश्वात घेऊन जात आहेत’, असे मला जाणवते. इ. ‘भक्तीसत्संग किती दिवस चालू असेल ? किंवा किती दिवस सत्संग ऐकण्याची संधी मिळेल ?’, हे कुणालाही सांगता येणार नाही. त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करून घेणे, म्हणजे ‘सत्संगाचा अधिकाधिक लाभ करून घेणे’, हीच माझी साधना आहे. ई. ‘भक्तीसत्संगाचा पूर्ण लाभ होण्यासाठी साधकांनी एकाग्रतेेने सत्संग ऐकून भावभक्ती मनात रुजवण्याचा प्रयत्न केला, तर साधकांच्या व्यष्टी साधना आणि समष्टी सेवेला गती मिळू शकते. भक्तीसत्संगामुळे सहस्रो साधकांना प्रेरणा आणि उत्साह मिळत असून ते साधना अन् सेवा अधिक चांगली करत आहेत. ते त्यांची व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा यांना गती मिळाल्याची अनुभूती घेत आहेत. ऊ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सत्संगात आत्मीयतेने आणि भावस्थितीत जाऊन बोलतात. त्यामुळे त्यांचा आत्मा हा श्रवण करणार्या साधकांच्या आत्म्याशी आत्मीयतेने संवाद करतो. त्यामुळे मनापासून सत्संग ऐकला जाऊन ती श्रवणभक्ती होते. (पू.) शिवाजी वटकर (४.२.२०२३) |