सनातनच्या ५४ व्या संत रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांनी स्वतःच्या देहत्यागाविषयी दिलेली पूर्वसूचना आणि त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे
माघ कृष्ण चतुर्थी (९.२.२०२३) या दिवशी पू. (श्रीमती) मंगला श्रीधर खेर यांच्या देहत्यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
‘रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) मंगला श्रीधर खेर (वय ९० वर्षे) यांनी २९.१.२०२३ या दिवशी पहाटे ५.३० वाजता देहत्याग केला. ९.२.२०२३ हा त्यांच्या देहत्यागानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने रत्नागिरी येथे रहाणार्या त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. श्री. मिलिंद खेर (पू. आजींचा मुलगा, वय ६६ वर्षे)
१ अ. पू. आईंनी स्वतःच स्वतःच्या देहत्यागाविषयी पूर्वसूचना देणे : ‘पू. आईंचे निधन होण्यापूर्वी २ दिवस आधी त्या मला ‘‘मी आता जाणार’, ‘मी आता जाणार’’, असे सांगत होत्या. काही मासांपूर्वी पू. आईंवर उपचार करणारे वैद्य मंदार भिडे माझ्या पत्नीला म्हणाले होते, ‘‘आजी जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतील’’ आणि तसेच झाले. आम्हाला देवाची ही लीला अनुभवायला मिळाली.
१ आ. शांत आणि मितभाषी : पू. आईंनी पूर्ण आयुष्यात कुणालाच कधी दुखावले नाही. त्या शांत आणि मितभाषी होत्या. त्या स्वतः अध्यात्म जगल्या आणि त्यांनी आम्हालाही अध्यात्म जगायला शिकवले.’
२. सौ. मीनल मिलिंद खेर (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के आणि वय ६२ वर्षे)
‘सच्चिदानंद परब्रह्म नारायणस्वरूप गुरुमाऊली, आपणच माझ्याकडून पू. आजींची सेवा करून घेतली. त्यांची सेवा करतांना मला तुमचे अस्तित्व सतत जाणवत असे.
२ अ. रुग्णाईत असूनही शांत आणि प्रसन्न असणार्या पू. आजी ! : मागील दोन वर्षांपासून पू. आजी रुग्णाईत असल्याने अंथरुणावरच झोपून असायच्या; पण त्यांनी कधी त्रागा किंवा चिडचिड केल्याचे मला स्मरत नाही. त्यांचा चेहरा प्रसन्न असायचा. त्यामुळे घरातील वातावरणही प्रसन्न असायचे. त्यांना जेवण भरवतांना ‘मी लहान मुलालाच घास भरवत आहे’, असे मला जाणवायचे. त्यांच्यातील बालकभावाचे मला दर्शन व्हायचे.
२ आ. सनातनचे साधक घरी आले की, पू. आजींना आनंद होत असे. ‘साधकांमध्ये परात्पर गुरु डॉक्टर आहेत’, असा त्यांचा भाव असे.
२ इ. वयाच्या ९० व्या वर्षी धर्मकार्याप्रती असलेली तळमळ : ३.१२.२०२२ या दिवशी रत्नागिरी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा होती. त्या वेळी ‘‘मलाही सभेला यायचे आहे’’, असे पूू. आजींनी सांगितले. मी त्यांची जाण्याची सिद्धता केली; पण दुपारी ३ वाजल्यानंतर त्यांना अशक्तपणा वाटू लागला. त्यामुळे त्या म्हणाल्या की, आता सभेला जायला नको.
२ ई. पू. आजींनी मृत्यूपूर्वी २ दिवस आधी ‘मला वर जायचे आहे’, असे सांगणे : पू. आजींचे निधन होण्यापूर्वी २ दिवस आधी त्या मला सांगत होत्या, ‘‘मला वर जायचे आहे, मला परत यायचे नाही.’’ त्या वेळी ‘त्यांचा परतीचा प्रवास चालू झाला आहे’, हेे माझ्या लक्षात आले नाही.
२ उ. पू. आजींना झोपेतच शांतपणाने मृत्यू येणे : २९.१.२०२३ या दिवशी पहाटे ३ वाजता पू. आजींना कफाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे मी त्यांना काढा पाजला; पण त्यांनी तो नीट घेतला नाही. पहाटे ५ वाजता नेहमीप्रमाणे माझ्या यजमानांनी त्यांना ‘आई, चहा प्यायला उठतेस ना’, अशी हाक मारली; पण पू. आजींनी काहीच प्रतिसाद दिला नाही. यजमानांनी पू. आजींच्या अंगाला हात लावला, तर त्यांचे अंग गरम आणि मऊ लागत होते. नंतर काही वेळाने डॉक्टर आले आणि म्हणाले, ‘‘आताच पू. आजींनी देह ठेवला आहे. त्या वेळी ‘जणू त्या झोपल्याच आहेत’, असे मला जाणवत होते. पू. आजींचे डोके गरम लागत होते. ‘त्यांचा प्राण ब्रह्मरंध्रातून गेला असावा’, असे मला जाणवले.
पू. आजी कशातच अडकल्या नाहीत. त्यांना सर्व नात्यांचा विसर पडला होता. मृत्यूच्या वेळी त्यांना कोणताही त्रास झाला नाही. गुरुदेवा, किती तुमची कृपा आहे. कृतज्ञता !’
३. सौ. रोहिणी ताम्हणकर (पू. खेरआजींची लहान मुलगी, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के आणि वय ५९ वर्षे)
३ अ. पू. खेरआजी रुग्णाईत असतांना लक्षात आलेली सूत्रे
१. पू. आजी अंथरूणावर असतांना वैद्य मंदार भिडे यांनी अविरतपणे आणि निरपेक्ष भावाने त्यांची सेवा केली. त्यांना कधीही बोलावले, तरी ते लगेच यायचे. त्यांची पू. आजींवर नितांत श्रद्धा होती.
२. पू. आजी सतत बालकभावात असायच्या. त्यामुळे ‘वृद्धपणी बालकभाव कसा असतो ?’, ते आम्हाला अनुभवायला मिळाले.
३. पू. आजींना देहबुद्धी नव्हती. त्या २ वर्षे अंथरूणावर पडून होत्या; पण त्यांच्या शरिराला कुठेही जखमा झाल्या नाहीत.
४. पू. आजींचा देह शुद्ध, सात्त्विक अन् मन पवित्र होते.
३ आ. पू. आजींनी देहत्याग केल्यानंतर
३ आ १. ‘पू. आजींचा श्वास चालू आहे’, असे वाटणे : ‘पू. खेरआजींनी देह ठेवला’, असा आम्हाला पहाटे भ्रमणभाष आला. त्या वेळी माझे मन शांत आणि स्थिर होते. मी माहेरी जाऊन पू. आजींचे दर्शन घेतल्यावर ‘त्या शांतपणे झोपल्या आहेत’, असे मला वाटत होते. ‘त्यांचा श्वास चालू असून छाती वर-खाली होत आहे’, असे मला जाणवत होते.
३ आ २. पू. आजींच्या देहातून चैतन्य प्रक्षेपित होऊन वातावरण चैतन्यमय होणे : पू. आजींच्या देहातून चैतन्य प्रक्षेपित होत होते. त्यांचा चेहरा पिवळसर आणि तेजस्वी दिसत होता. त्यांच्या शरिराला जडत्व आले नव्हते, तसेच घरातही दाब जाणवत नव्हता. तेव्हा ‘जणू भावसोहळाच चालू आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझ्याकडून आपोआप प्रार्थना आणि नामजप होत होता. तेथे सनातनचे अनेक साधक आलेे होते आणि सर्व जण तेथील चैतन्य अधिकाधिक ग्रहण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे तेथे दुःखाचे वातावरण नव्हते, तर चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
३ आ ३. आजही घरात पू. आजींचे अस्तित्व जाणवते आणि हलकेपणा जाणवतो.
३ आ ४. पू. आजी आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञता ! : पू. आजींची परात्पर गुरु डॉक्टरांवर नितांत श्रद्धा होती. त्यांनी प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना केली. पू. आजींनी आमच्यावर चांगले संस्कार केले आणि आपल्या कृतीतून आम्हा मुलांपुढे आदर्श ठेवला. ‘प.पू. गुरुदेव, पू. आजींनी केलेल्या संस्कारांची शिदोरीच आम्हाला तुमच्या चरणांपर्यंत नेण्यासाठी दिशा देणार आहे.’ ‘हे गुरुमाऊली, तुम्हाला अपेक्षित अशी साधना आमच्याकडून घडू दे. आम्हा सर्व साधकांचे मन निर्मळ करून आपल्या चरणांपर्यंत घेऊन जावे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
(सर्व सूत्रांसाठी दिनांक ३.२.२०२३)
‘परात्पर गुरु डॉक्टर’ हेच सर्वस्व असलेल्या आणि गुरूंच्या अनुसंधानात राहून साधना करण्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणार्या पू. (कै.) श्रीमती मंगला खेरआजी !
१. परिस्थिती आनंदाने स्वीकारणार्या पू. आजी !
‘पू. आजी नेहमी आनंदी आणि उत्साही असायच्या. त्या २ वर्षांपूर्वी पडल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. आधुनिक वैद्यांनी ‘या वयात काही करू शकत नाही’, असे सांगितले होते. त्यामुळे पू. आजी नेहमी अंथरूणावर पडून रहात. त्यांना कुशीवरही (एका अंगावरही) वळता येत नव्हते. ही सर्व परिस्थिती त्यांनी आनंदाने स्वीकारली होती.
२. परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा असणे
पू. आजींची परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा होती. ‘परात्पर गुरु डॉक्टर’ म्हणजे पू. आजींचे सर्वस्व होते. त्या सतत गुरुदेवांंच्या अनुसंधानात रहायच्या. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कृती करतांना त्या गुरुदेवांशी बोलायच्या.
३. ‘सनातन प्रभात’प्रती भाव
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये दिलेली प्रत्येक सूचना म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांचा संदेश आहे’, असा पू. आजींचा भाव होता. त्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व कृती करत असत.
४. पू. आजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे
४ अ. पू. आजींच्या देहातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत असणे : पू. आजींचा चेहरा, हात आणि पाय पिवळे झाले होते. ‘त्यांच्या देहातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवत होते.
४ आ. देह कडक न होणे : देहत्यागानंतर पू. आजींच्या शरिराचा स्पर्श थंड आणि मऊ होता. देहत्याग करून १२ घंटे उलटले, तरी त्यांचा देह कडक झाला नव्हता.
४ इ. पू. आजींच्या जवळ बसून त्यांच्या चेहर्यावरून हात फिरवतांना ‘त्या मध्येेच डोळे उघडून पहात आहेत’, असे जाणवत होते.
४ ई. पू. आजींच्या सहस्राराच्या स्थानी उंचवटा येणे : पू. आजींनी देहत्याग केला. तेव्हा त्यांचे डोळे किंवा मुख उघडे नव्हते; मात्र त्यांच्या सहस्राराच्या ठिकाणी उंचवटा आल्यासारखे झाले होते. तेथे स्पर्श केल्यावर पुष्कळ थंडावा जाणवत होता. त्यामुळे ‘पू. आजींचा प्राण सहस्रारातून गेला असावा’, असेे वाटले.
५. पू. आजींच्या खोलीतील परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रात पालट होणे
पू. आजींच्या खोलीत ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर असलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पुष्कळ पिवळे झाले आहेे आणि त्यातील चैतन्यही पुष्कळ वाढले आहे.
६. पू. आजी आणि चिमण्या यांचा आगळा ऋणानुबंध !
अ. घरात पू. आजींचे ज्या खोलीत वास्तव्य असायचे, त्या खोलीत दिवसभर चिमण्या यायच्या.
आ. देहत्यागानंतर पू. आजींचा देह घराबाहेर आणून ठेवण्यात आला. त्या वेळी भोवतालच्या परिसरात पुष्कळ चिमण्या येऊन बसल्या.
इ. पू. आजींना अंत्यसंस्कारासाठी नेत असतांना जमलेल्या चिमण्यांचा थवा एकदम आकाशात उडाला.
७. प्रार्थना
पू. आजींनी परिस्थिती कशीही असली, तरी ‘गुरूंच्या अनुसंधानात राहून साधना कशी करावी ?’, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. ‘हे गुरुदेवा, ‘पू. आजींचे गुण आमच्यातही येऊ देत. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे आमच्याकडून साधना होऊ दे, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– पू. खेरआजींचे सर्व कुटुंबीय, रत्नागिरी (३.२.२०२३)
|