गौतम अदानी यांचे पारपत्र जप्तीची मागणी करणारी याचिका फेटाळली !
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा निर्णय !
नागपूर – उद्योगपती गौतम अदानी देशाबाहेर पळून जाऊ नयेत, यासाठी त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) जप्त करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ७ फेब्रुवारी फेटाळली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली असता त्यांनी केंद्र शासनाच्या संबंधित विभागाला निवेदन सादर करण्यास सांगितले.
हिंडेनबर्ग अहवालानुसार भारतात गौतम अदानी यांनी अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज वेगवेगळ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतून घेतले. सहस्रो कोटी रुपये कर्ज घेणारे गौतम अदानी हे देश सोडून जाऊ नयेत, यासाठी सुदर्शन बागडे यांच्या वतीने अधिवक्ता संतोष चव्हाण आणि प्रतीक लोहंबरे यांनी नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली. वरील मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती; परंतु ‘उच्च न्यायालयाने केंद्र शासनाच्या संबंधित विभागाला निवेदन सादर करण्यास सांगून याचिका नाकारली’, अशी माहिती बागडे आणि अधिवक्ता संतोष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.