मुलांनी धर्माचरण करावे, यासाठी हिंदु पालकांनी आग्रही असले पाहिजे ! – प.पू. महामंडलेश्‍वर स्‍वामी आनंद काडसिद्धेश्‍वर महाराज, आसुर्ले-पोर्ले

प.पू. हिरालाल महाराज यांच्‍या ७९ व्‍या पुण्‍यतिथीनिमित्त दासबोध पारायण सोहळा !

प.पू. महामंडलेश्‍वर स्‍वामी आनंद काडसिद्धेश्‍वर महाराज

यादववाडी, शिरगांव (शाहूवाडी), (जिल्‍हा कोल्‍हापूर) – इतर धर्मीय जसे त्‍यांच्‍या पंथासाठी तन-मन-धन यांचा त्‍याग करतात, तसे भारतामध्‍ये हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करायचे असेल, तर हिंदूंना असा त्‍याग करावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्‍यंत प्रतिकूल परिस्‍थितीमध्‍ये समस्‍त हिंदु समाजासाठी हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापन केले. याची जाणीव ठेवून हिंदूंच्‍या घराघरामध्‍ये धर्माचे, अध्‍यात्‍माचे शिक्षण देणे आवश्‍यक आहे, असे मार्गदर्शन प.पू. महामंडलेश्‍वर स्‍वामी आनंद काडसिद्धेश्‍वर महाराज यांनी केले. प.पू. हिरालाल महाराज यांच्‍या ७९ व्‍या पुण्‍यतिथीनिमित्त दासबोध पारायण सोहळा पार पडला, त्‍या वेळी ते बोलत होते.

१. या सोहळ्‍याच्‍या अंतर्गत माघ शुद्ध एकादशी ते माघ शुद्ध पौर्णिमा या कालावधीत नित्‍य काकड आरती, दासबोध वाचन, कीर्तन, आरती, महाप्रसाद पार पडला. याचा लाभ अनुमाने दीड सहस्र भाविकांनी घेतला.

२. प.पू. आनंद काडसिद्धेश्‍वर महाराज यांना नुकतेच ‘षड्‌दर्शन साधू समाज, अखिल भारतीय सनातन धर्म रक्षा समिती’ यांच्‍याकडून ‘महामंडलेश्‍वर व समाज कल्‍याणकारी कार्य’ या पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले.

३. हा सोहळा संपन्‍न होण्‍यासाठी सर्वश्री आनंदा शंकर यादव, दादासाहेब मारुति यादव, प्रकाश श्रीपती यादव, संजय मारुति यादव, शंकर ज्ञानू यादव, मारुति गणू यादव, जालिंदर यादव, तसेच मलकापूर येथील माजी नगराध्‍यक्ष राजू भोपळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

प.पू. स्‍वामीजींनी ‘इतर प्रवचनकारांनी त्‍यांच्‍या प्रवचनामध्‍ये हिंदु जनजागृती समितीप्रमाणे धर्मजागृतीसाठी प्रबोधन करावे’, असे आवाहन केले. कोल्‍हापूर येथे १२ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेसाठी अधिकाधिक भक्‍तांनी उपस्‍थित रहावे, असेही आवाहन स्‍वामीजींनी या वेळी केले.

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी हिंदूंना तन, मन आणि धन यांचा त्‍याग करावा लागेल ! – प.पू. महामंडलेश्‍वर स्‍वामी आनंद काडसिद्धेश्‍वर महाराज