पिळये, धारबांदोडा येथील श्री भूमिकादेवीच्या मंदिरात चोरी
फोंडा, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – पिळये, धारबांदोडा येथील श्री भूमिकादेवी मंदिरात ६ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञातांनी मंदिरातील ‘सीसीटीव्ही सेटअप बॉक्स’सह, ५ समया, पूजेसाठी लागणारी तांब्याची भांडी, ताटे, पराती आणि अर्पणपेटीतील रक्कम चोरली. या मंदिरात झालेली ही तिसरी चोरी आहे.
चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशदाराचा हुक तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील कपाट आडवे करून ते तोडले. आतील देवीच्या साड्या आणि इतर कपडे अस्ताव्यस्त करून टाकले. मंदिरातील सुट्या पैशांची अर्पणपेटी फिरवून ठेवली, तर दुसरी नोटा असलेली अर्पणपेटी फोडून आतील रोख रक्कम पळवली आहे. दुसर्या अर्पणपेटीत मंदिराचा १ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या कालोत्सवात भाविकांनी अर्पण केलेला निधी होता. मंदिरातील ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ सुरक्षित आहेत. ७ फेब्रुवारी या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मंदिराचे सेवेकरी श्री. दिलीप पिळयेकर मंदिरात स्वच्छता करण्यासाठी गेले असता त्यांना प्रथम ही चोरीची घटना लक्षात आली. यानंतर ही माहिती मंदिराचे अध्यक्ष आणि फोंडा पोलीस यांना देण्यात आली. यानंतर फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मंदिर परिसराची पहाणी करून घटनेचा पंचनामा केला. मंदिराच्या कालोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या फेरीवाल्यांची काही दुकाने आणि त्यांचे साहित्य मंदिर परिसरात होते अन् हे साहित्य ५ फेब्रुवारी या दिवशी हालवण्यात आले होते. यासाठी मंदिराचे प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले होते आणि याचा अपलाभ चोरट्यांनी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.