‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखून प्रतिबंधक उपाय योजावेत !
रत्नागिरीत हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
रत्नागिरी – गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रूढ झाली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे येथील युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. या ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी अन् चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार संजय खेडसकर यांना देण्यात आले.
निवेदन देतांना हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. चंद्रकांत राऊळ, समितीचे श्री. चंद्रशेखर गुडेकर, गो सेवा संघांचे अध्यक्ष श्री. गणेश गायकवाड, स्वाध्याय परिवारचे श्री. अरविंद बारस्कर, श्री. गोपालकृष्ण पाढी आणि सनातन संस्थेचे श्री. रमण पाध्ये उपस्थित होते.