‘जी-२०’च्या निमित्त संभाजीनगर शहरातील मुख्य रस्ते चांगल्या प्रकारे दुरुस्त; मात्र अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम !
सामाजिक माध्यमांवर नागरिकांचा संताप !
संभाजीनगर – जिल्ह्यात २७ आणि २८ फेब्रुवारी या दिवशी जी-२० राष्ट्रसमुहाची महिला परिषद होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून जोरदार सिद्धता करण्यात येत आहे. यासाठी शहरात रस्त्यांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शहरातील मुख्य रस्ते आणि विमानतळाकडे जाणारे रस्ते चांगले करण्यात आले आहेत; मात्र याचवेळी शहरातील अंतर्गत रस्त्यांची मात्र दुरवस्था आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिक याविषयी सामाजिक माध्यमांवर संतप्त भावना व्यक्त करत आहेत.
२६ फेब्रुवारी या दिवशी १९ देशांच्या १५० महिला सदस्यांचे शिष्टमंडळ शहरात येणार असल्याने महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून जोरदार सिद्धता करण्यात येत आहे. ज्या भागांतून हे शिष्टमंडळ जाणार आहेत, त्या परिसरातील अतिक्रमण काढले आहे. आतापर्यंत अशी १०० हून अधिक अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत; पण फक्त जी-२० च्या शिष्टमंडळाच्या अनुषंगानेच सध्या अनेक कामे केली जात असल्याने इतर विकासकामे प्रलंबित आहेत, असा आरोप होत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच भागांतील प्रलंबित विकासकामे आणि रस्त्यांची कामे करावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
संपादकीय भूमिकाज्या अर्थी जी-२०च्या निमित्त रस्त्यांची कामे होऊ शकतात, तर अन्य वेळी का होत नाहीत ? देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेली तरी नागरिकांनी कर भरूनही त्यांना मुलभूत सुविधा न मिळणे, हे शोकांतिका आहे. |