चिलेवाडी (जिल्हा सातारा) येथे मद्यविक्रेत्यास रणरागिणींकडून चोप !
सातारा, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावाजवळ असलेल्या मुख्य चौकात आमलेट पावच्या गाडीवर अनधिकृतपणे देशी मद्याची विक्री करणार्या एका विक्रेत्यास चिलेवाडी येथील रणरागिणींनी बेदम चोप दिला.
नव्याने झालेल्या वाठार स्टेशन-डिस्कळ रस्त्यावर चिलेवाडी येथे एका व्यक्तीने आमलेट पावची गाडी चालू केली. या गाडीवर अनधिकृतपणे देशी मद्यविक्री करण्यास प्रारंभ केला. यामुळे गावातील प्रौढ व्यक्तींसह युवकांचीही पावले त्या दिशेने वळू लागली. चिलेवाडीतील महिला मद्यपींच्या उपद्रवामुळे हैराण झाल्या होत्या. एक-दोन वेळा सांगूनही गाडीचालक ऐकत नसल्याचे पाहून गावातील महिलांनी एकत्र येत त्यास मारहाण केली. तसेच लपवून ठेवलेल्या मद्याच्या बाटल्या रस्त्यावर आणून फोडल्या. ही घटना सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.