नवहिंदुत्वकारांपासून सावधान !
१. नवहिंदुत्वकारांकडून केली जाणारी आणि बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारी विधाने
सध्या साम्यवादी मास्तरांच्या तालमीत सिद्ध झालेले अनेक बौद्धिक दिवाळखोर नवनवीन हास्यास्पद विधाने करत आहेत .
अ. कुंकु अथवा टिळा लावणे म्हणजे हिंदुत्व नाही.
आ. शेंडी ठेवणे, जानवे घालणे म्हणजे हिंदुत्व नाही.
इ. उपासना करणे म्हणजे हिंदुत्व नाही.
ई. नामस्मरण, जप, तप, यज्ञयाग हे हिंदुत्व नाही.
उ. धर्मकर्मांत धोतर उपरणे, सोवळे नेसणे हे म्हणजे हिंदुत्व नाही.
ऊ. गोमाता, भूमाता यांच्या रक्षणाविषयी आत्मियतेमुळे जहाल विचार मांडणे म्हणजे हिंदुत्व नाही.
ए. संतसज्जन, ऋषीमुनींचा मार्ग अनुसरणे म्हणजे हिंदुत्व नाही.
ऐ. मंदिरात जाणे म्हणजे हिंदुत्व नाही.
‘हिंदुत्व ही जीवनपद्धत आहे’, असे यांचे म्हणणे असते. मग ऋषीमुनी आणि साधू-संत यांनी दिलेली सदाचरणाची जीवनपद्धत सोडून अन्य काय शेष आहे ? उदाहरणार्थ गृहस्थाश्रमी माणसाने स्वतः भोजन करण्याआधी देवाला नैवेद्य, वैश्वदेव, कावळा-चिमणीकरता काकबली, गायीगुरांसाठी गोग्रास, अतिथीकरता ४ घास बाजूला ठेवून आधी पोष्यवर्गाची (माता, पिता, घरगडी, कुटुंबीय, आश्रित) भोजनाची सोय करून मग जेवायचे आहे. ही धर्मशास्त्रीय पद्धत आहे. यात सर्वसमावेशकपणा आहे. हा शास्त्रकारांनी दिलेला सर्वसमावेशकपणा मान्य नाही, मग मान्य काय आहे ?
२. स्वत्व विसरलेले सध्याचे नवहिंदुत्ववादी
तुमची ‘स्व’ ओळख ही काहीतरी गुणविशेषाने होते. ते गुणविशेष, ती लक्षणे दूर करायची म्हणजे ‘स्व’ ओळख, स्वत्व गमावणे आहे. डॉक्टर म्हटले की, पांढरा कोट घातलेला माणूस डोळ्यासमोर येतो. खाकी वर्दी, डोक्यावर टोपी, हातात काठी असे वर्णन कुणाचे म्हटले, तर लगेच ‘पोलीस’ उत्तर येते. ‘कान टोचलेले असणे, कपाळावर गंध अथवा कुंकुमतिलक यांवरून हा माणूस बाह्य लक्षणांवरून हिंदु आहे’, हे लक्षात येते.
यवन (मुसलमान) मंदिरात जात नाहीत, तर नवहिंदुत्ववादीही ‘मंदिरात जाणे, म्हणजे हिंदुत्व नाही’, म्हणून मंदिरात जात नाहीत. यवन कपाळावर टिळा लावत नाहीत, तसेच नवहिंदुत्ववादीही ‘टिळा लावणे म्हणजे हिंदुत्व नाही’, म्हणून तो लावत नाहीत. यवन जप, तप, नामस्मरण, यज्ञयाग करत नाहीत. नवहिंदुत्ववादीही ‘हे हिंदुत्व नाही’, म्हणून करत नाहीत. यवन गायीला कापतात, तर नवहिंदुत्वादी उपयुक्त पशू मानतात. तुम्ही तुमचे ‘स्वत्व’ एकदा विसरला की, या नवीन कोर्या पाटीवर रेहमान लिहिले किंवा सुलेमान लिहिले, तरी तफावत जाणवणार नाही; कारण तुम्ही स्वत्व विसरलेले असाल. मग पुढे ‘यामुळे काय फरक पडतो ?’, असे म्हणता म्हणता तुम्ही आपसूकच त्यांचे आचरण स्वीकारू लागता, हेच लक्षात येत नाही.
३. ऋषीमुनी आणि संतसज्जन यांच्या तत्त्वज्ञानाला देवतांचे आशीर्वाद असणे
त्यांनी (मुसलमानांनी) ‘केवळ उपासनापद्धत पालटली आहे’, असे नसून त्यांनी क्रौर्यता आत्मसात् केली आहे आणि ती पूर्ण जग अनुभवते आहे. आजही सीरियामध्ये महिलांचे बाजार भरत आहेत. नवीन स्वीकारू नका, असे अजिबात नाही. जे नाविन्यपूर्ण आणि चांगले असेल, ज्यामुळे संतसज्जनांनी दाखवलेल्या मार्गाला बाधा येणार नसेल, तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे; पण जुने त्याज्यच आहे, ते टाकून नवीन हिंदुत्वनिष्ठ विचारसरणी निर्माण करणे अशक्य आहे. ऋषीमुनी, संतसज्जन यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाला देवतांचे आशीर्वाद आहेत. त्यामागे निष्काम उपासनेचे प्रचंड मोठे सामर्थ्य आहे.
४. केवळ समाजसेवा किंवा सामाजिक कार्य म्हणजे हिंदुत्व नाही !
‘जे का रंजले गांजले’, हे सांगण्याआधी जगद़्गुरु संत तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर तपश्चर्या केली आहे. ‘अवघाची संसार सुखाचा करीन’, असे म्हणतांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊलींनी आधी केलेली उपासना आहे. संत एकनाथ यांनी ‘गाढवाच्या मुखात गंगेची कावड ओतली’, हे आपण सांगतो; पण जनार्दनस्वामींच्या अनुग्रहाने त्यांनी केलेली उपासना लक्षात घेत नाही. या सर्वांनी आधी उपासना केली आहे, मग सामाजिक कार्य केले आहे. आचरण संपन्न उपासनेचे सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना हे हिंदुत्व आहे. वाईट गोष्टी पटकन चिकटतात; पण चांगल्या गोष्टी प्रयत्नपूर्वक शिकाव्या लागतात. शिव्या ऐकून पटकन बोलल्या जातात; पण ‘शुभं करोती’ मुलांकडून म्हणून घ्यावी लागते. चित्रपटातील गाणी ही ऐकून पाठ होतात; पण पाढे प्रयत्नपूर्वक पाठ करावे लागतात.
ऋषीमुनी, संतसज्जन यांनी दाखवलेला आचार, हा अनुभव सिद्ध आणि प्रासादिक आहे. तो टाकू नका एवढीच अपेक्षा !
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग (९.११.२०२२)