चिनी नौका जगातील ८० देशांच्या समुद्री सीमेत करतात अवैध मासेमारी !

हेरगिरी करत असल्याचा भारतीय अधिकार्‍यांना संशय !

नवी देहली – हिंद महासागराच्या उत्तरी क्षेत्रामध्ये चिनी नौका अवैधपणे मासेमारी करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या माध्यमातून चीनचा हेरगिरी करण्याचा प्रयत्न असून त्याने याआधीही असे केले असल्याचे मत भारतीय अधिकार्‍यांनी व्यक्त केले. एवढेच नाही, तर ‘डिस्टंट वॉटर फिशिंग’ (दूरच्या अंतरावर जाऊन मासेमारी) प्रकारच्या या चिनी नौका जगातील तब्बल ८० देशांच्या समुद्री सीमांमध्ये अशा प्रकारे मासेमारी करत आहेत, असा धक्कादायक खुलासा ‘पॉलिसी रिसर्च ग्रूप’ नावाच्या एका संस्थेने एका अहवालातून नुकताच केला.

१. या संस्थेच्या अहवालानुसार साधारण १८ सहस्र चिनी नौका जगभरातील समुद्र आणि महासागर येथे अवैधरित्या कार्यरत आहेत. समुद्री अन्नाची (‘सी फूड’ची) निर्मिती करण्यात चीन जगात अग्रक्रमावर आहे, हे येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र आहे.

२. चीन प्रतिवर्षी १२ लाख टन समुद्री अन्नाचे उत्पादन करतो. हे प्रमाण यासंदर्भात जगात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या तुलनेत दुप्पट आहे. यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोपही ‘पॉलिसी रिसर्च ग्रूप’ने केला आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवरही वाईट परिणाम होत आहे.

अशा प्रकारे देशांना फसवत आहे धूर्त चीन !

  • धूर्त चीन त्याच्या नौकांना स्वत:च्या समुद्री क्षेत्रामध्ये मासेमारी करण्यापासून मज्जाव करतो, परंतु आफ्रिका खंड, रशिया, हिंद महासागर या क्षेत्रातील अन्य देशांच्या ‘एक्सक्ल्युझिव इकॉनॉमिक झोन्स’मध्ये त्यांना अवैधपणे मासेमारी करण्यास अनुमती देतो. (‘एक्सक्ल्युझिव इकॉनॉमिक झोन’ हा सागरातील असा भाग असतो, जेथे कोणतेही कार्य करण्याचा अधिकार केवळ त्या क्षेत्रात असलेल्या राष्ट्रालाच असतो.)
  • चिनी नौका त्या देशांच्या या क्षेत्रांमध्ये गेल्यावर तेथील अधिकार्‍यांना त्यांचा संशय आल्यास नौका धूर्तपणे त्यांना फसवून पळून जातात. जेव्हा नौका संशयाच्या भोवर्‍यात अडकतात, तेव्हा त्या त्यांची विद्युत् यंत्रणा बंद करतात. त्यामुळे संबंधित देशांच्या अधिकार्‍यांना नौकांचा थांगपत्ता लागू शकत नाही.

३. अनेक चिनी नौका भारत, श्रीलंका, पाकिस्तान, इराण आणि ओमान यांच्या सीमांमधील समुद्रात कार्यरत आहेत. वर्ष २०२१ मध्ये हिंद महासागरात साधारण ३९२ नोंदणीकृत नसलेल्या चिनी नौका आढळून आल्या होत्या. वर्ष २०२० मध्ये हा आकडा ३७९ होता.

४. एकट्या इराणच्या समुद्री सीमेचा विचार केल्यास चीनने तेथील हिंद महासागरातून ४६ सहस्र टन मासे पळवून नेले.

५. गतवर्षी चीनचे हेरगिरी करणारे जहाज श्रीलंकेच्या क्षेत्रात आले होते. त्यामुळे भारत सतर्क झाला होता.

संपादकीय भूमिका 

चीनच्या या अवैध कृत्यांना उघडे पाडण्यासाठी आता भारताने जागतिक स्तरावर पुढाकार घेणे आवश्यक आहे !