सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाच्या मर्यादा विज्ञानाने मिळवलेल्या ज्ञानापेक्षा निश्चितपणे अमर्याद असणे !
‘वैज्ञानिकाची ज्ञानार्जनाची पद्धत इंद्रियांपर्यंतच सीमित आहे. त्यामुळे इंद्रियांना धरून विश्वाचे रहस्य तो गणिते मांडून सोडवू पहातो. प्रयोग आणि उपकरणे यांच्या साहाय्याने जे ज्ञान कळते तेवढेच सत्य आहे. त्याचप्रमाणे ‘जे विज्ञानात नाही, ते जगात नाही’, असे मानण्याची आधुनिक शास्त्रज्ञांची अहंकारी मनोवृत्ती चुकीची आणि घातक आहे; कारण आधुनिक विज्ञानाने आपणास दिसणारे विश्वाचे स्वरूप फारच मर्यादित आहे. विश्वात काही घटना अशा घडत असतात की, ज्याचे स्पष्टीकरण किंवा कारण विज्ञानास देता येत नाही आणि विज्ञान इथे थिटे पडते. याउलट आपल्या शास्त्रात म्हटले आहे की, पाचही ज्ञानेंद्रिये बंद करा, म्हणजे त्या पलिकडच्या अंतिम सत्याचे आणि सूक्ष्मतम विश्वाचे आकलन होईल; कारण हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी तितकेच सूक्ष्म होण्याची आवश्यकता आहे. सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाच्या मर्यादा जड विज्ञानाने मिळवलेल्या ज्ञानापेक्षा निश्चितपणे अमर्याद आहेत. येथे सूक्ष्म म्हणजे केवळ लहान असा अर्थ अभिप्रेत नाही; कारण परब्रह्म – ब्रह्म सूक्ष्मातीसूक्ष्म असूनही सर्वव्यापी आहे, तर ‘सूक्ष्म म्हणजे स्थुलाच्या उलट किंवा वायुपेक्षाही अत्यंत विरळ अवस्था’, असा अर्थ घ्यायचा. सहस्रावधी वर्षांचे ज्ञान आणि अनुभव यांवर आधारलेला आपला विश्वास अन् श्रद्धा खोटे ठरवता येणार नाही.’
(साभार : मासिक ‘संतकृपा’, सप्टेंबर २०००)