धर्मशास्त्र सांगण्यात माध्यमांमध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’अग्रगण्य ! – अधिवक्ता सचिन रेमणे
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २३ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा !
रत्नागिरी, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – आपण जेव्हा देह धारण करतो, तेव्हा धर्माचे सर्व नियम लागू होतात. ते धर्माचरण नेमकेपणाने कसे करावे ? याविषयी ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून नियमितपणे मार्गदर्शन केले जाते. धर्मशास्त्र समजावून सांगणार्या प्रसारमाध्यमांमध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चे नाव अग्रगण्य आहे, असे उद्गार विश्व हिंदु परिषदेच्या धर्मप्रसार विभागाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख अधिवक्ता सचिन रेमणे यांनी काढले. येथील जोशी पाळंदमधील अखिल चित्पावन ब्राह्मण संघाच्या ल.वि. केळकर सभागृहात आयोजित केलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २३ व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि हिंदु जनजागृती समितीचे विनय पानवळकर उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे पूजन करण्यात आले. दैनिक ‘सनातन प्रभात’चे पूजन श्री. मच्छिंद्र खेराडे यांनी केले. तसेच पौरोहित्य श्री. विजय पाध्ये यांनी केले. वर्धापनदिन सोहळ्याचा प्रारंभ श्री. संतोष धनावडे यांनी केलेल्या शंखनादाने झाला. त्यानंतर सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी वर्धापनदिनानिमित्त पाठवलेल्या संदेशाचे वाचन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. त्यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. गोविंद भारद्वाज यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा ताम्हनकर यांनी केले.
अधिवक्ता सचिन रेमणे यांचा परिचयअधिवक्ता सचिन रेमणे यांनी रत्नागिरी जिल्हा न्यायालय येथे १८ वर्षे वकिली केली आहे. १९८९ पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. वर्ष २०१२ ते २०१७ या कालावधीत धर्मजागरण विभागात जिल्हा विधी प्रमुख म्हणून त्यांनी दायित्व पार पाडले आहे. २०१७ ते २०२१ या कालावधीत अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या जिल्हा सचिव या पदी ते कार्यरत होते. सध्या ते वर्ष २०२० पासून ते विश्व हिंदु परिषदेच्या धर्मप्रसार विभागात दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख हे दायित्व पहात आहेत. |
समाजमनावर होणारे विपरीत परिणाम रोखण्यासाठी योग्य दृष्टिकोन देणारे ‘सनातन प्रभात’ – अधिवक्ता सचिन रेमणे
महाविद्यालयामध्ये शिकत असतांना आजी हे दैनिक आवडीने वाचत असे. प्रारंभीच्या काळात आमच्या घरी भाजी निवडण्यासाठी अनावधानाने दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक कुणीतरी घेतला. त्यावर आजीने ‘हे वर्तमानपत्र त्यासाठी नाही, त्याचे वेगळे स्थान आहे’, असे सांगितलेले वाक्य माझ्या मनावर खोलवर बिंबले गेले. तेव्हापासून दैनिक ‘सनातन प्रभात’वरील श्रद्धा दिवसेंदिवस आजतागायत वृद्धींगत होत गेली. न्यायालयीन कामकाज करतांना काही नकारात्मक घटना लक्षात आल्यावर त्यावर सकारात्मक दृष्टिकोन कसा घ्यायचा ? याविषयी ‘सनातन प्रभात’मधील वाचनाने लाभ झाला. समाजात खूप धार्मिक संघटना कार्यरत आहेत. ‘सनातन प्रभात’ आणि सनातन संस्थेचे कार्य हे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या स्वानुभवातून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने चालू आहे. धर्माचे आणि परमेश्वराचे अधिष्ठान ठेवून सातत्याने चालू असल्यामुळे ते परिणामकारक होत आहे. सध्याच्या सांस्कृतिक आक्रमणांचा विचार केला, तर नकारात्मक विचारांमुळे समाजमनावर मोठा विपरीत परिणाम होत आहे, तो थांबवण्यासाठी ‘सनातन प्रभात’ परखडपणे योग्य दृष्टिकोन देत असते आणि हे कार्य आता यशस्वी होतांना दिसत आहे. ‘सनातन प्रभात’चे अनेक आघाड्यांवर कार्य चालू असून त्यासाठी सज्जनांना आधार देण्याचे खंबीरपणे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे. या धर्मसंस्थापनेच्या कार्यात हिंदूंनी वेळ काढून साधनेचे महत्त्व समजून घेऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत व्हायला हवे. लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना होऊन भारत हे विश्ववंदनीय हिंदु राष्ट्र व्हावे, ही संत सज्जनांच्या चरणी प्रार्थना करतो.
पू. (कै.) चंद्रसेन मयेकर यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त !वर्धापनदिनाच्या सोहळ्यात दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करून प्रथम ६० टक्के आणि त्यानंतर २९ जुलै २०१८ या दिवशी संतपद गाठणार्या राजापूर येथील पू. (कै.) चंद्रसेन मयेकरकाका यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करण्यात आला. |
सन्मान आणि सत्कार
सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. प्रवीण बोरकर यांनी केला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अधिवक्ता सचिन रेमणे यांचा सत्कार दैनिक ‘सनातन प्रभात’चे श्री. मोहन बेडेकर यांनी केला. तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांचा सत्कार वाचक श्री. प्रवीण बोरकर यांनी केला.
वितरकांचा सत्कार
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध असलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरक श्री. प्रकाश गुळेकर, पावस; श्री. संतोष धनावडे, पानवळ आणि श्री. प्रदीप साखरपेकर, राजीवडा यांचा सत्कार अधिवक्ता सचिन रेमणे यांच्या हस्ते करण्यात आला.
राष्ट्र-धर्माची सद्य:स्थिती सांगून त्यावरील उपाययोजना सांगणारे एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – सद्गुरु सत्यवान कदम
राष्ट्र-धर्माची सद्य:स्थिती परखडपणे मांडणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ आहे. केवळ सद्य:स्थिती सांगून न थांबता त्यावरील उपाययोजना सांगतो. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संख्याबळापेक्षा अध्यात्मबळाची आवश्यकता अधिक असल्याने नियमितपणे साधनेविषयी ‘सनातन प्रभात’मधून मार्गदर्शन केले जाते. ‘सनातन प्रभात’मध्ये वैज्ञानिक परिभाषेत धर्मशास्त्र समजावून दिले जाते. या दैनिकात संतांचे मार्गदर्शन, धर्माचरणामुळे झालेले लाभ प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे या दैनिकातून चैतन्य मिळते, तसेच साधनेसाठी आणि हिंदु राष्ट-धर्म यासाठीचे कार्य करण्यासाठी प्रेरणाही मिळते. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सर्वत्रच्या तीर्थस्थळांना भेटी देऊन तेथील स्थानमाहात्म्य आणि वैशिष्ट्ये याविषयी मार्गदर्शन करतात अन् ते सर्व समाजात कळावे; म्हणून त्याचा संपूर्ण वृत्तांत ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रसिद्ध केला जातो. परात्पर गुरु डॉक्टर जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार नेहमी दैनिकातून प्रसिद्ध केले जातात. त्यातून सर्वांना प्रेरणा मिळते. प्रभावी आणि सोप्या भाषेत प्रसिद्ध केले जाणारे संपादकीयातून वाचकांना कर्तव्याची जाणीव होते. दैवी बालकांचा परिचय आणि गुणवैशिष्ट्ये यांमुळे भावजागृती होते. आपत्काळाची स्थिती दैनिकातील सर्वत्रच्या वृत्तांमुळे लक्षात येते. या दैनिकाचे वाचन करून अनेकांनी साधनेला प्रारंभ केला, काही साधकांची जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका झाली, तर काही साधक दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करून, तसेच चिंतन आणि साधना करून संतही झालेले आहेत.
‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना हिंदूंच्या मनात रुजणे हे ‘सनातन प्रभात’चे मोठे यश ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या यशस्वी वाटचालीला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली आहेत. २० वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्दही कुणाच्या ध्यानीमनी नव्हता. अशा स्थितीत हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय घेऊन समितीची वाटचाल चालू झाली. या ध्येयाची आवश्यकता समाजाच्या अंतर्मनापर्यंत घेऊन जाण्यात दैनिक ‘सनातन प्रभात’चा सिंहाचा वाटा आहे. हिंदूंच्या मनात रुजलेली ‘हिंदु राष्ट्रा’ची संकल्पना हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे मोठे यश आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याच्या अनुषंगाने दैनिक ‘सनातन प्रभात’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. समितीच्या प्रत्येक उपक्रमाची दखल ‘सनातन प्रभात’ने घेतली आहे. त्या उपक्रमाचे स्वरूप, त्यातील अडथळे, तसेच त्याच्या समाजावर होणारा परिणाम अत्यंत योग्य शब्दांत आणि योग्य वेळी समाजासमोर मांडण्याचे महत् कार्य ‘सनातन प्रभात’ने पार पाडले आहे. ज्या राष्ट्र-धर्मावरील आघातांविषयी समाजात कृतीशीलता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी समितीची धडपड असायची, त्या विषयांचे वास्तव स्वरूप समाजासमोर मांडतांना ‘सनातन प्रभात’ची लेखणी कधी थरथरली नाही. पंथ, पक्ष, संघटना यांचे विकृत पुष्टीकरणवादी आणि द्वेषमूलक स्वरूप समाजासमोर उघडकीस आणतांना त्या संदर्भातील बातम्यांचे लेखन करतांनाही स्वत:ची निर्भीड भूमिका ‘सनातन प्रभात’ने कधी पालटली नाही. यामुळेच काल-परवापर्यंत भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ व्हावे, ही स्वप्नवत् वाटणारी संकल्पना आज प्रत्येक हिंदूंच्या मनात रुजली आहे, प्रत्येकाच्या ओठातून ती बाहेरही पडत आहे, हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे मोठे यश आहे.
सनातन प्रभात : घोर आपत्काळातील आधारवड ! – गोविंद भारद्वाज, दैनिक ‘सनातन प्रभात’
‘कि न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने’, या उक्तीनुसार ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अहोरात्र कार्यरत आहे. वाचकांनी आम्हाला पाठवलेले अभिप्राय हे त्यांचा ‘सनातन प्रभात’वर असलेल्या दृढ विश्वासाची पोचपावतीच आहे. यावरून ‘सनातन प्रभात’ ज्या उदात्त ध्येयाने चालू झाले होते, ते ध्येय साकार होत असल्याचे निश्चिती पटते. ‘हिंदूंवरील सर्व आघातांचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’, हा ‘सनातन प्रभात’चा दृष्टीकोन प्रारंभीपासून प्रसिद्ध केला जात आहे. सातत्याने हिंदु राष्ट्राविषयीचे विचार मांडल्यामुळे तो विचार आज जनमानसावर बिंबला आहे. हिंदूंच्या आघातांच्या विरोधात या परशुरामभूमीच्या उत्कर्षासाठी ‘सनातन प्रभात’ नेहमीच कार्यरत राहील ! कोरोनाची २ वर्षे गेल्यानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजून थांबण्याचे नाव घेत नाही. यातूनच तिसरे महायुद्ध चालू होईल का? याची चर्चा चालू आहे. तसेच चालू झालेल्या आपत्काळात नैसर्गिक आपत्ती, आर्थिक मंदी यांनाही तोंड द्यावे लागणार आहे. दंगली, पूर, भूकंप आणि युद्ध या आपत्तींच्या वेळी स्वत:चे रक्षण कसे करायचे ?, याविषयीही ‘सनातन प्रभात’ने वेळोवेळी लेखमाला प्रसिद्ध केल्या आहेत.
‘सनातन प्रभात’मधील बातम्या, लेख आणि अन्य माहिती ‘डेली हंट’ या ‘न्यूज अॅप’द्वारेही आता प्रसारित होत आहे. त्याचे ४० सहस्रांहून अधिक ‘फॉलोअर्स’ झालेले आहेत. प्रत्येक मासाला २५ लाखांहून अधिक वेळा ‘सनातन प्रभात’चे लेख आणि बातम्या वाचल्या जात आहेत. ‘टेलीग्राम चॅनल’, ‘इन्स्टाग्राम अकाऊंट’ आणि ‘ट्विटर अकाऊंट’सुद्धा आहेत. ‘सनातन प्रभात’ची सर्व भाषांतील नियतकालिके आता ‘ई-पेपर’च्या स्वरूपातही वाचकांसाठी उपलब्ध आहे. हे ‘सनातन प्रभात’ नियतकालिक घराघरात पोचवण्यासाठी प्रयत्न करा. विविध सामाजिक प्रसारमाध्यमांतूनही ‘सनातन प्रभात’चा प्रसार करा.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांनी व्यक्त केले मनोगत !
१. ‘सनातन प्रभात’ हा हिंदूंचा आधारस्तंभ ! – केशव गोताड, जाकादेवी
गेली ५ वर्षे नियमित वाचक असून प्रारंभी दैनिक वाचतांना त्याचे आकलन होत नव्हते. दैनिकाच्या नियमित वाचनामुळे धर्मावरील आघात कळू लागले आणि त्यासाठी संघटितपणे कार्य करण्याचे महत्त्वही समजले. दैनिकात येणार्या संतांच्या मार्गदर्शनाचा खूप लाभ झाला. हे दैनिक घराघरात जायला पाहिजे. ‘सनातन प्रभात’ हा हिंदूंचा आधारस्तंभ आहे.
२. धर्म आणि राष्ट्र यांसाठी अचूक मार्गदर्शन करणारे ‘सनातन प्रभात’! – दीपकसिंह देवल, अध्यक्ष, मरुधर विष्णु समाज, रत्नागिरी.
धर्म आणि राष्ट्र यांसाठी काय करावे ? याचे अचूक मार्गदर्शन ‘सनातन प्रभात’मुळे मिळाले. धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी खारीचा वाटा उचलावा, असे वाटायचे; परंतु नेमकेपणाने धर्मासाठी काय करावे ? याविषयी ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने समजले. त्याविषयी आत्मविश्वास मिळाला. वडिलांच्या काळापासून आमच्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’ येत आहे. पूर्वी वाचन होत नसे. काही वेळा मुख्य मथळे वाचले जात. आता वेगवेगळ्या बातम्या, संतांचे मार्गदर्शन आणि हिंदु राष्ट्राविषयीचे विचार यांमुळे दैनिक आवडीने वाचले जाते. ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून जीवनात योग्य ठिकाणी आपला सहभाग दिला जात असल्याचे समाधान वाटत आहे. या दृष्टीने जीवनात खारीचा वाटा उचलण्याची संधी प्राप्त झाली म्हणून खूप आभारी आहे.
आभार
१. वर्धापनदिन सोहळ्यासाठी अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळाच्या वतीने सभागृह उपलब्ध करून देण्यात आले.
२. ‘ओंकार बॅटरीज’चे श्री. नाचणकर यांनी या सोहळ्यासाठी ‘बॅटरी’ उपलब्ध करून दिली.
विशेष
श्रीमती सावित्री हर्षे (वय ७५ वर्षे) या काठीच्या आधाराने चालतात. शहरापासून १८ किमी अंतरावरून आलेल्या आजी काठीच्या आधाराने २ जिने चढून कार्यक्रमस्थळी आल्या.