‘कोरोना’ झाल्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात असतांना श्री. अभिजित सावंत यांनी अनुभवलेली अपार गुरुकृपा !
१. वैयक्तिक कामासाठी मुंबई आणि पुणे येथे गेल्यावर ‘कोरोना’ होऊन रुग्णालयात भरती व्हावे लागणे
‘डिसेंबर २०२१ मध्ये मी घराच्या विक्रीसाठी मुंबईला गेलो होतो. तेव्हा मी ‘एपिलेप्सी पारशीयल सीजर’ (आकडी किंवा ‘फीट’ येणे) यांवरील उपचारासाठी पुण्याला आयुर्वेदीय वैद्यांकडे गेलो. त्या रात्री मला ताप आला; म्हणून माझी कोरोनासाठी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ ही चाचणी केली. त्या अहवालानुसार मला कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यामुळे मला रुग्णालयात भरती व्हावे लागले. माझी रुग्णालयात भरती होण्याची पहिलीच वेळ होती आणि तेही ‘कोरोना’मुळे ! रुग्णालयात भरती झाल्यामुळे मला थोडा ताण आला होता.
२. कोरोनासाठी राखीव शासकीय रुग्णालय असूनही देवाच्या कृपेने ते अतिशय स्वच्छ असणे आणि आधुनिक वैद्य अन् कर्मचारीवर्गही अतिशय प्रेमळ असणे
रुग्णालय शासनाच्या अंतर्गत चालवले जाणारे ‘कोरोना’साठी राखीव (सेंटर) असलेले आणि पूर्ण वातानुकूलित होते. तेथील आधुनिक वैद्य, परिचारिका आणि कर्मचारी (‘स्टाफ’) सर्व जण प्रेमळ होते. तेथील स्वच्छता आणि जेवण अन् अल्पाहार यांची व्यवस्था चांगली होती. ‘परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले), असे सर्व एकत्रित मिळणे, म्हणजे तुमची अनमोल कृपाच होती.’
३. भाऊ आणि वडील यांनाही ‘कोरोना’ झाल्याचे निदान होणे
२ – ३ दिवसांनी मला अतीदक्षता विभागात (‘आय.सी.यू.’) भरती केले. माझ्या शरिरातील प्राणवायूची पातळी न्यून झाली होती. माझा भाऊ आशिष आणि वडील (श्री. पांडुरंग सावंत) यांच्याशी माझा संपर्क झाल्यामुळे त्यांनाही ‘कोरोना’ झाल्याचे निदान झाले. त्यामुळे तेही मी असलेल्या रुग्णालयातच भरती झाले. त्यामुळे आम्हाला एकमेकांचा आधार मिळाला. त्यांना अधिक संसर्ग न झाल्यामुळे वडिलांना आणि आशिषला लवकर घरी सोडण्यात आले.
४. वैद्य उदय धुरी यांच्यामुळे मानसिक आधार मिळणे
हिंदु जनजागृती समितीच्या आरोग्य साहाय्य समितीचे सेवक वैद्य उदय धुरी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मला साहाय्य केले, उदा. ते माझी प्रतिदिन विचारपूस करून मला धीर द्यायचे आणि मला आश्वस्त करून माझा उत्साह वाढवायचे. ‘परम पूज्य, असे हिर्यासारखे साधक तुम्हीच घडवू शकता.’
५. रुग्णालयातील कर्मचारीवर्गाने रुग्णांची सेवा मनापासून आणि कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे अतिशय प्रेमाने करणे
रुग्णालयातील कर्मचारीवर्ग (स्टाफ) पुष्कळ चांगला होता. माझ्या शेजारी एक वृद्ध व्यक्ती होती. एक परिचारक (‘वार्ड बॉय’) स्वतःच्या आजोबांची सेवा करत असल्याप्रमाणे त्या वृद्ध व्यक्तीची सेवा करत होता. हे सर्व मला फार आश्चर्यचकित करणारे होते.
६. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे आध्यात्मिक बळ मिळणे
सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी माझ्यासाठी नामजपादी उपाय सांगितले होते. माझी आई आणि ताई माझ्यासाठी तो नामजप करत होत्या. ‘परात्पर गुरुदेव, साक्षात् सद़्गुरु आम्हा साधकांसाठी नामजपादी उपाय सांगतात, वेळप्रसंगी स्वतःही उपाय करतात आणि ‘परम पूज्य आहेत, तुम्ही काळजी करू नका’, असे सांगून आश्वस्त करतात. हे आम्हा सर्व साधकांचे परम भाग्यच आहे. किती ही कृपा !’ त्यांनी दिलेल्या नामजपामुळे मला आध्यात्मिक बळ मिळत होते. त्यामुळे माझ्या मनाची स्थिती चांगली राहिली. आई आणि ताई माझ्यावर विविध भाववृद्धी होण्यासाठी प्रयोग करत असत. त्यामुळे माझी प्रकृती लवकर सुधारली आणि मी स्थिर राहिलो.
७. संतांनी विचारपूस करून दिलेल्या चैतन्यामुळे ‘आता आपण मेलो, तरी काही बिघडणार नाही’, इतकी मनाची स्थिती स्थिर असणे
या काळात अनेक संत माझी विचारपूस करायचे. काही संत भ्रमणभाषही करायचे. त्यांनी चैतन्य देऊन माझ्यावर कृपा केली. या काळात काही वेळा मी पलंगावर पडून असतांना मला वाटायचे, ‘आता आपण मेलो, तरी काही बिघडणार नाही.’ माझ्या मनाची स्थिती एकदम शांत आणि स्थिर होती. मी ती स्थिती शब्दांत वर्णन करू शकत नाही.
८. अनुभूती
८ अ. उपचारांनंतर केलेल्या चाचणीचा अहवाल कोरोना नसल्याचा येणे; पण प्राणवायूची पातळी थोडी न्यून पडणे, तेव्हा हृदयात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवून ते प्राणवायू देत आहेत’, असे जाणवणे : मी बरा होत आलो आणि माझ्या ‘आर्.टी.पी.सी.आर्.’या चाचणीचा अहवाल कोरोना नसल्याचा आला; पण माझ्यातील प्राणवायूची पातळी थोडी न्यून होती. त्यामुळे आधुनिक वैद्य मला घरी सोडण्यास सिद्ध नव्हते. ‘परम पूज्य, तेव्हा मला ‘माझ्या हृदयात तुमचे अस्तित्व जाणवून तुम्ही माझ्या फुप्फुसांना प्राणवायू देत आहात’, असे जाणवले. तुम्ही इतकी कृपा केलीत की, माझी प्राणवायूची पातळी आधुनिक वैद्यांना अपेक्षित इतकी झाली आणि मला घरी जाण्याची अनुमती मिळाली. रुग्णालयातील कर्मचारीवर्गाने सर्व सेवा दायित्वाने पूर्ण केली.
‘परम पूज्य डॉक्टर, तुमची कृपा मी कितीही वर्णन करण्याचा प्रयत्न केला, तरी ती पूर्णच होऊ शकत नाही. इतकी अनमोल कृपा तुमच्याच कृपेने मला अनुभवता आली.’
(क्रमशः)
– आपल्या अनंत कोटी ऋणात राहू इच्छिणारा,
श्री. अभिजित सावंत, फोंडा, गोवा. (८.१०.२०२१)
यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/652079.html |
|