दर्जेदार साहित्यासाठी साहित्यिकांच्या पुस्तकांविना पर्याय नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

९६ वे अखिल भारतीय मराठी संमेलन

वर्धा, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – आता साहित्याची अभिव्यक्ती करण्यासाठी अनेक माध्यमे आहेत. सामाजिक माध्यमांमुळे अनेक नवसाहित्यिक निर्माण झाले आहेत. नवमाध्यमांचा सध्या संक्रमणाचा काळ असल्यामुळे त्या नवमाध्यमांतून निर्माण होणार्‍या साहित्याला उंचीही नाही आणि खोलीही नाही. कदाचित् भविष्यात ती निर्माण होईल. त्यामुळे आज दर्जेदार साहित्य हवे असेल, तर साहित्यिकांच्या पुस्तकांविना पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून शेवटच्या दिवशी केले. या वेळी व्यासपिठावर डॉ. विनय सहस्रबुद्धे, रमाकांत खलप, खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते आदी मान्यवर उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय सभारंभात उपमुख्यमंत्री उपस्थित रहाणार होते; पण त्यांनी सकाळीच संमेलनाला उपस्थिती लावली.

फडणवीस पुढे म्हणाले की,…

 

१. आपला सर्व ज्ञानाधारित अभ्यासक्रम हा इंग्रजीत करण्यात आला. इयत्ता १० वी नंतर मराठीकडील ओढा अल्प झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या नीतीमुळे सर्व उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान यांवर आधारित शिक्षण  हे मराठीत देता येणार आहे. ती ज्ञान भाषा आहेच, पण जेव्हा तिचा व्यवहारात समावेश होईल, तेव्हा मराठीच्या भवितव्याविषयीच्या चिंता दूर होतील.

२. साहित्याच्या व्यासपिठावर एवढे राजकारणी काय करतात ?, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर म्हणजे आम्ही राजकारणी अनेक साहित्यिकांची प्रेरणा आहोत. आम्ही नसलो, तर व्यंगचित्रकारांना विशेष काम उरणार नाही.

३. आमच्यातही अनेक साहित्यिक आहेत, शीघ्रकवी आहेत, स्क्रिप्ट लेखक आहेत आणि कथाकार (स्टोरी रायटर) आहेत.

४. सकाळी ९ वाजता दूरचित्रवाहिनी लावली की, आमच्यातील साहित्य ओसंडून वहात असते. कदाचित म्हणूनच सहित्य संमेलनाच्या या मंचावर थोडी जागा आम्हालाही मिळते आणि ती जागा व्यापून कशी टाकायची, हे आम्हाला निश्चित माहिती आहे. तसा प्रयत्न आम्ही करत असतो.

महाराष्ट्र सरकारकडून विदर्भ साहित्य संघाला १० कोटी रुपयांची देणगी !

विदर्भ साहित्य संघाचे शताब्दी वर्ष असल्यामुळे त्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीने देणगी स्वरूपात देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंचावरून केली.