‘पाणथळ वाचवा’ मोहिमेचा कुडचडे येथील नंदा तळे येथे शुभारंभ
पणजी, ४ फेब्रुवारी (सप) – केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान पालट मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत ‘वर्ल्ड वॅटलँड डे’च्या (जागतिक पाणथळ दिवसाच्या) राष्ट्रीय स्तरावरील उत्सवाच्या निमित्ताने कुडचडे येथील नंदा तळे या ठिकाणी ‘पाणथळ वाचवा’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. येथील नंदा तळे ‘रामसर साईट्’ (आर्द्र भूमी) घोषित करण्यात आले आहे. या वेळी पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल आणि जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित होते.
पाणथळाची ठिकाणे अपान वायू (कार्बन डाय ऑक्साईड), मिथेन आदी हरितगृह वायू सोडणे अल्प करून आर्द्रता स्थिर करण्यात साहाय्य करतात. किनारपट्टीचे रक्षण करून पुरासारख्या आपत्तींचा धोका अल्प करण्यातही पाणथळ साहाय्य करतात. ते जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि हवामान पालटाच्या समस्या अल्प करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
केंद्रीय मंत्री यादव यांनी या वेळी पर्यावरण, आर्थिक आणि हवामान सुरक्षित करण्यासाठी ‘वॅटलँड इकोसिस्टम’द्वारे बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वर्ष २०२३ च्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने अमृत धरोहर, मिष्टी, पीएम् प्रणाम, ग्रीन क्रेडिट आणि हरित विकास मोहीम आदी हरित उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ९ वर्षांतील देशाच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. पाणथळ प्रदेशांच्या संवर्धनासाठी दळणवळण, शिक्षण, जागरूकता आणि सहभाग भक्कम करण्याच्या महत्त्वावरही मंत्री महोदयांनी भर दिला.
या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘देशाच्या अमृतकाळात गोव्याच्या नंदा तळ्यासह देशातील ७५ पाणथळ ठिकाणांना ‘रामसर साईट्स’ म्हणून ओळखण्याची आणि घोषित करण्याची दृष्टी ठेवल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. शासन गोवा राज्यातील जलस्रोतांचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी ‘श्रमशक्ती से जलसमृद्धी’ या संकल्पनेचे अनुसरण करत आहे.’’
या वेळी उपस्थितांनी पाणथळ रक्षणाविषयी प्रतिज्ञा घेतली. तत्पूर्वी नंदा तळ्याच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.