विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता !
खर्च अतिक्रमण धारकांकडून वसूल करणार !
कोल्हापूर – विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी १ कोटी १७ लाख ९ सहस्र ९९१ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. अतिक्रमण काढण्याचा सर्व व्यय प्रारंभी शासन करणार आहे. नंतर हा व्यय संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार आहे.
पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक यांच्याकडे अतिक्रमण काढण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याने त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना हे अतिक्रमण काढण्यासाठी संपर्क केला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने हे अतिक्रमण काढण्याचे अंदाजपत्रक सिद्ध केले. पुरातत्व विभागाच्या संचालकांनी हे अंदाजपत्रक २५ जानेवारीला राज्यशासनाकडे सादर केले होते. त्यानुसार आता ही मान्यता देण्यात आली आहे. ही प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता अपवादात्मक परिस्थिती म्हणून देण्यात आली आहे, असे राज्यशासनाने स्पष्ट केले आहे.