संभाजीनगर येथे शाळेचे शुल्क ४० टक्के वाढवल्याने पालकांचे ठिय्या आंदोलन !
पालकांना सुधारित शुल्कपत्रक देण्याचे व्यवस्थापनाचे आश्वासन !
संभाजीनगर – शहरातील ‘फ्रान्सिलियन स्कूल ऑफ एक्सलन्स’ या शाळेने विद्यार्थ्यांचे शुल्क अचानक ४० टक्क्यांनी वाढवले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी ४ फेब्रुवारी या दिवशी शाळेत घुसून ठिय्या आंदोलन केले. पालकांनी तब्बल ३.३० घंटे आक्रमक आंदोलन केल्यामुळे शाळेचे व्यवस्थापन नरमले. शाळा व्यवस्थापनाने खुलासा केला की, पालकांना दिलेल्या नवीन शुल्कपत्रकात मुद्रणाची चूक झाली आहे. त्यामुळे पालकांनी शांत व्हावे. पालकांना सुधारित शुल्कपत्रक देण्यात येईल, असे लेखी आश्वासन शाळेने दिल्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले. पालकांचा रोष पहाता पोलीस घटनास्थळी आले होते.
पालकांना प्राचार्य भेटलेच नाहीत !
‘शाळेच्या प्राचार्यांनी याविषयी भूमिका स्पष्ट करावी’, अशी मागणी पालकांनी केली; मात्र प्राचार्य पालकांसमोर आलेच नाहीत. ते एका बैठकीत असल्याची बतावणी शाळा व्यवस्थापनाने केली. यामुळे पालक आणखी संतापले. ‘शाळेचे प्राचार्य पालकांना भेटत नाहीत. पालकांना चांगली वागणूक दिली जात नाही’, असा आरोप पालकांनी केला आहे, तसेच ‘शाळा व्यवस्थापनाने पालक समितीही आपल्या मर्जीनेच बनवली आहे. या समितीकडून विद्यार्थी आणि पालक यांच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत’, असाही आरोप पालकांनी केला आहे.
संपादकीय भूमिकाशाळेच्या व्यवस्थापनानेच जाणूनबुजून शुल्क वाढवले आणि पालकांनी विरोध केल्यावर ती चूक मुद्रणालयावर ढकलली. पालकांनी संघटितपणे लढा दिल्यामुळे शाळेचे व्यवस्थापन वठणीवर आले. यापुढे पालकांनी असाच वैध मार्गाने लढा चालू ठेवावा. |