नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘कंस्ट्रक्शन टाईम्स अॅवॉर्ड २०२३’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव !
नागरी विकासात केली उल्लेखनीय कामगिरी
नवी मुंबई, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – नागरी विकासातील उल्लेखनीय कामगिरीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेस नुकताच ‘कंस्ट्रक्शन टाईम्स अॅवॉर्ड २०२३’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडा येथील विशेष समारंभात हा पुरस्कार देण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महानगरपालिका क्षेत्रात सायन्स पार्क, सेंट्रल लायब्ररी, एन्.एम्.एम्.टी. उपक्रमाची वाशी येथील बहुउपयोगी आकर्षक इमारत यांसारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प उभारले जात आहेत. वंडर्स पार्क, पंचतत्त्वावर आधारित सेंट्रल पार्क, झेन गार्डन, संवेदना उद्यान, निसर्ग उद्यान, रॉक गार्डन अशा विविध संकल्पनांवर आधारित ‘थीम पार्क’ विकसित करण्यात आलेली आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्यालय वास्तू ही देशातील वास्तुरचनेचा एक आदर्शवत् नमुना मानला जात आहे. अशा विविध गोष्टींचा विचार करून महानगरपालिकेची वरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.