राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी पशूहत्या होऊ नये, याकरता ठळक सूचना फलक लावा ! – पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालये संचालनालय यांचे पत्र
पशूहत्या केल्यास केवळ ५०० रुपयांचा दंड !
कोल्हापूर – राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पशूहत्या होऊ नये, याकरता ठळक सूचनाफलक लावण्यात यावेत, तसेच स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने या संदर्भातील कायद्याची कार्यवाही करावी. याचे उल्लंघन झाल्यास दोषी व्यक्तीस ५०० रुपयांचा दंड आकारावा, असे पत्र मुंबई येथील पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालये संचालनालय यांनी रत्नागिरी, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नांदेड आणि नागपूर येथील पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक यांना पाठवले आहे.
पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील राज्य संरक्षित स्मारकांपैकी बर्याच स्मारकांवर विविध देवतांच्या नावाने सर्रास पशूहत्या केली जाते. ‘महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरावस्तूविषयक स्थळे आणि अवशेष नियम १९६२’ मधील कलम ८ (क) नुसार संरक्षित स्मारकाच्या परिसरात अन्न शिजवण्यास बंदी आहे. पशूहत्या हे कृत्यही अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. या संदर्भात दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार शासनास आहेत
संपादकीय भूमिकाविशाळगडावर सर्रास पशूहत्या केली जाते आणि हे गेली अनेक वर्षे गडप्रेमी शासनास निवेदन, आंदोलन यांद्वारे सांगत आहेत. त्या संदर्भात कारवाईचे अधिकार असतांनाही आजपर्यंत विशाळगडावर चालू असलेल्या पशूहत्येच्या संदर्भात कारवाई का करण्यात आली नाही ? केवळ ५०० रुपये इतक्या अल्प मूल्याचा दंड केल्याने अशी हत्या करणार्यांना जरब बसणार आहे का ? पुरातत्व विभागास खरोखरीच राज्य संरक्षित स्मारकांचे जतन करायचे आहे का ? कि हा केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार आहे ? |