गायीच्या शरिरातून प्रसारित झालेले दिव्य अन्न !
१. गाय किंवा बैल यांच्या शेणातून बाहेर पडलेले जव वा गहू यांपासून केलेले पदार्थ अत्यंत सात्त्विक असणे
‘देशी गायीला किंवा बैलाला जव अथवा गहू खाऊ घातले, तर ते शेणासह त्यांच्या शरिरातून बाहेर पडतात. ते धुऊन, सुकवून, मग दळून त्यांचे पीठ बनवले आणि त्या पिठाची पोळी, शिरा इत्यादी बनवून खाल्ली, तर त्वचा रोग, पोटातील व्रण (अल्सर) इत्यादी व्याधी दूर होतात. गायीच्या शरिरातून अन्न प्रसारित झाल्याने त्याची सात्त्विकता अत्यंत वाढते, ज्यामुळे आध्यात्मिक लाभही होतात.
२. ब्रह्महत्येसारख्या पापांतून मुक्त होण्यासाठी गायीच्या शेणातून काढलेल्या जवाच्या लापशीचे एक मास सेवन करावे
महाभारतात (अनुशासन पर्व) येते. त्यात म्हटले आहे,
निर्हृतैश्च यवैर्गोभिर्मासं प्रश्रितयावकः ।
ब्रह्महत्यासमं पापं सर्वमेतेन शुध्यते ॥
– महाभारत, पर्व १३, अध्याय ११६, श्लोक ३९
अर्थ : गायीच्या शेणातून काढलेल्या जवाच्या लापशीचे (पातळ सोजी) एक मास सेवन करावे. यामुळे मनुष्य ब्रह्महत्येसारख्या पापांतून मुक्त होतो.
पराभवार्थं दैत्यानां देवैः शौचमिदं कृतम् ।
ते देवत्वमपि प्राप्ताः संसिद्धाश्च महाबलाः ॥
– महाभारत, पर्व १३, अध्याय ११६, श्लोक ४०
अर्थ : जेव्हा दैत्यांनी देवतांना पराजित केले, तेव्हा देवतांनी याच प्रायश्चित्ताचे अनुष्ठान केले. यामुळे त्यांना पुन्हा (नष्ट झालेल्या) देवत्वाची प्राप्ती झाली आणि ते महाबलवान अन् परम सिद्ध झाले.
३. राजा ऋतंभर यांनी गायीच्या शेणातून निघालेले जव धुऊन प्रसादरूपात ग्रहण केल्याने सत्यवान नामक पुत्राची प्राप्ती होणे
‘पद्मपुराणा’त तेजःपूरचे राजा ऋतंभर यांची कथा येते की, त्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा होती; पण पुत्रलाभ होत नव्हता. तेव्हा ते जाबालीमुनींच्या आज्ञेप्रमाणे गायींची सेवा करू लागले. गायींना जव खायला घालून त्यांच्या शेणातून निघालेले जव धुऊन प्रसादरूपात ग्रहण करत सात्त्विक जीवन जगू लागले. या महापुण्यामुळे त्यांना सत्यवान नामक श्रेष्ठ भगवद़्भक्त, तसेच इंद्रासमान पराक्रमी पुत्राची प्राप्ती झाली.’
(साभार : मासिक ‘लोक कल्याण सेतू’, जुलै २०१७)