माघ पौर्णिमा म्हणजेच तेजस्वी म्हाळसादेवीच्या अवतार कार्याचे स्मरण !
उद्या ५.२.२०२३ या दिवशी ‘माघ पौर्णिमा’ आहे. त्या निमित्ताने…
‘पूर्णचंद्राची रात्र, म्हणजे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमा ही आदिशक्तीच्या म्हाळसादेवीच्या अवतार कार्याचे स्मरण करून देते. हे स्मरण भक्तांना दिलासा देणारे आहे. माघ पौर्णिमेच्या निमित्ताने तिची कथा, तिने केलेले कार्य आणि तिच्या नावाचा अर्थ येथे देत आहोत. |
१. श्री म्हाळसादेवीची प्राचीन कथा
देव आणि दैत्य यांनी समुद्रमंथन चालू केले. या मंथनातून एक एक दिव्य अशा वस्तू बाहेर पडू लागल्या. उच्चैश्रवा घोडा, हलाहल विष आणि अप्सरा आल्या. अमृताचा सुंदर कलशही आला. हा कलश पहाताच देव आणि दैत्य तो मिळवण्यासाठी झटापट करू लागले; कारण अमृत पिण्यामुळे अमरत्व मिळणार होते.
त्यामुळे भगवान विष्णूंनी यावर युक्ती काढली. त्यांनी एका सुंदर स्त्रीचे रूप घेतले. तिचे नाव मोहिनी. मोहिनीने आपल्या हाती कलश धरला. दैत्य तिच्याकडे पहाता पहाताच त्यांचे भान हरपून गेले. मोहिनीने देवांना अमृत पाजले. दैत्य तसेच राहिले. मोहिनीने आपली माया टाकून हे संकट दूर केले. मोहिनी अंतर्धान पावली. काही काळ गेला. भगवान शिवांना ते मोहिनी रूप पहाण्याची इच्छा झाली. ते विष्णूकडे आले आणि म्हणाले, ‘‘भगवंत, आपले ते अलौकिक असे मोहिनीरूप मला दाखवा.’’ भगवान विष्णूंनी मान्यता दिली.
शंकर आणि पार्वती एकत्र असतांनाच विष्णूंनी पुन्हा मोहिनीरूप धारण केले आणि ते त्यांच्यासमोर आले. शंकर ते रूप पाहून थक्कच झाले. त्यांचे भानच जणू हरपले. विष्णूंनी ते मोहिनीरूप पार्वतीमध्ये अंतर्भूत केले आणि ते अंतर्धान पावले. शंकरांनी पार्वतीकडे पाहिले. त्यांना ती मोहिनीरूपा दिसू लागली. भगवान शिवाला पुष्कळ आनंद झाला. ते तिला म्हणाले, ‘‘तुझे नाव ‘महालया शक्ती’, असे राहील.’ हीच महालयाशक्ती देवी म्हणजे म्हाळसादेवी होय ! हिचा अवतार माघ पौर्णिमेला झाला.
२. मणी आणि मल्ल नावाच्या राक्षसांचा वध
पृथ्वीवर मणी आणि मल्ल या नावाचे दोन राक्षस ऋषिमुनी आणि देवता यांना त्रास देऊ लागले. ऋषींचे आश्रम उजाड पडले. अध्ययन थांबले. सर्वत्र अत्याचाराचे थैमान चालू होते. या अत्याचाराला कोण आवर घालणार ? सर्व देव आणि ऋषिमुनी शिवलोकात गेले. तेथे भगवान शंकर-पार्वती आसनावर बसले होते. भगवान शंकरांची ज्ञानसाधना चालली होती. पार्वती ज्ञानरूपा होऊन शंकरांशी तन्मय झाली होती. तिचे तेज अलौकीकरित्या वाढले होते. तिचे डोळे चंद्रबिंबाप्रमाणे चमकत होते. ती अधूनमधून जगाकडे नेत्रकटाक्ष करी. या वेळी विश्वातील सर्व घडामोडींची जाणीव त्या कटाक्षात भरून येत असे. विश्वाच्या त्या माऊलीला जणू सर्व ज्ञान होत होते. या दिव्य रूपासमोर सर्व देव, ऋषिमुनी आले. त्यांनी भीषण अत्याचारांच्या सर्व कथा त्यांना ऐकवल्या. शंकर आणि पार्वती हे ऐकून अत्यंत संतप्त झाले. भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे भव्य रूप घेतले. पार्वतीने म्हाळसादेवीचे रूप घेतले. दोघांनी मणी आणि मल्ल या राक्षसांवर आक्रमण केले आणि त्यांचा नाश केला.
३. ‘म्हाळसा’ या नावाचा अर्थ
म्हाळसामधील ‘म’, म्हणजे ममत्व किंवा माया; ‘ह’, म्हणजे हर्ष किंवा आनंद; ‘लसा’, म्हणजे तेज. म्हाळसादेवी ही श्रद्धाळू भक्तांवर ममता करणारी आई आहे. ती आनंददायिनी आहे. ती प्रसन्नता देणारी आहे. ती अलौकिक अशा तेजाने युक्त आहे. माघ पौर्णिमा ही या तेजस्वी देवतेची अवतार कथा सांगते. त्यामुळे आपण तिला नमन करूया.’
(साभार : साप्ताहिक ‘जय हनुमान’, २२.२.२०२०)