जळगाव येथे राज्यस्तरीय मंदिर परिषदेला आजपासून प्रारंभ !
राज्यभरातील विविध देवस्थानांचे प्रतिनिधी होणार सहभागी !
जळगाव, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – मंदिरे आणि मंदिरांतील धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ येथे आजपासून राज्यस्तरीय मंदिर परिषदेला प्रारंभ होत आहे. हिंदु जनजागृती समिती आणि श्री गणपति मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ (पद्मालय, जळगाव) यांच्या वतीने आयोजित ही परिषद ४ अन् ५ फेब्रुवारी या दिवशी शिरसोली रोड येथील ‘सुदर्शन पॅलेस’ सभागृहात होणार आहे. या परिषदेला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतील विविध देवस्थानचे विश्वस्त सहभागी होणार आहेत.
🚩#जलगांव में 4 एवं 5 फरवरी को ‘#महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद’का आयोजन !
🚩 मंदिरों की समस्या सुलझाने के लिए राज्यभर से #मंदिर विश्वस्त हुए एकत्र ! – श्री. सुनील घनवट, राज्य संगठक, महाराष्ट्र और छत्तीसगड, हिन्दू जनजागृति समिति@BalwantPathak@SG_HJS
📽️ देखीये व्हिडिओ 👇 pic.twitter.com/fRMi2yVI0W
— HJS Mumbai (@HJSMumbai) February 2, 2023
या परिषदेमध्ये मंदिरांचे पावित्र्याचे रक्षण, मंदिरांच्या धर्मपरंपरांमध्ये सरकारी हस्तक्षेप, देवस्थानच्या निधीतील भ्रष्टाचार, मंदिरांच्या माध्यमातून धर्मप्रसार आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन मंदिरांच्या सुव्यवस्थापनेविषयी धोरण निश्चित करण्यात येणार आहे. या परिषदेला मंदिरांचे विश्वस्त, प्रतिनिधी आणि पुरोहित सहभागी होणार आहेत. या मंदिर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मान्यवरांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.
१. समाजाला आध्यात्मिक बनवण्यासाठी मंदिरांतील धार्मिक परंपरांचे रक्षण आवश्यक ! – आचार्य महामंडलेश्वर महंत श्री सुधीरदासजी महाराज, काळाराम मंदिर, नाशिक
केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर भारतामध्ये मंदिरांविषयीचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालले आहेत. असंख्य मंदिरे सरकार कह्यात घेऊन त्यामध्ये अहिंदु मंडळी ‘ट्रस्टी’ म्हणून नियुक्त केली जात आहेत. त्यामुळे मंदिरांतील प्राचीन परंपरा लोप पावत आहेत. मंदिरातील पैसा अन्य धर्मियांच्या कामांसाठी वापरला जात आहे. परंपरागत असलेल्या दशमहाविद्या, दशग्रंथीय अध्ययन आदी परंपरांचे संचलन मंदिरे आणि वेदपाठशाळा यांच्या माध्यमातून चालवले जात होते. आता ते बंद पडले आहे. ते पूर्ववत् चालू व्हावे. षोड्षोपचार, राजोपचार, मंत्रोपचार, तंत्रोपचार आदी पारंपरिक पूजापद्धती मंदिरांत होणे आवश्यक आहेत. या सर्व परंपरागत प्राचीन धार्मिक विधींचे अध्ययन न झालेल्या मंडळींना ‘पेड पुजारी’ (पैसे घेऊन पुजारी नियुक्त करणे) म्हणून नियुक्त केले जाते. त्यामुळे मंदिरांमध्ये देवतांच्या तत्त्वांना आवाहन करतांना बाधा येते. त्यामुळे मंदिरांमध्ये भाविकांच्या मनोकामना पूर्ण होण्यास अडथळा येतो, तसेच समाजामध्ये अशांतता निर्माण होत आहे. लोकांच्या धर्मविषयक शंकांचे निराकरण होत नाही. या सर्व कारणांमुळे मंदिरांतील आध्यात्मिक पायाच नष्ट होत आहे. परिणामस्वरूप भाविकांना आध्यात्मिक लाभ होत नाही. ही प्राचीन परंपरा आहे, मूर्तीशास्त्र, मंदिरशास्त्र, मंत्रशास्त्र, तंत्रशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आयुर्वेद, त्याचप्रमाणे धातूशास्त्र, विविध उपचारपद्धती, पंचामृताचा विकल्प या सर्व गोष्टींचा विचार करून प्राचीन काळी मंदिरांमध्ये पूजा आणि उपचार होत होते. या परिषदेच्या माध्यमातून समुद्रमंथनरूपी विचामंथन होऊन फलनिष्पत्ती मिळावी. या मंदिर परिषदेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा स्तुत्य उपक्रम घेत असल्याविषयी मी आयोजकांना धन्यवाद देतो. मीही या परिषदेत सहभागी होणार आहे.
२. परिषदेच्या माध्यमातून मंदिरांच्या संरक्षणार्थ अनेक उपक्रम उभे रहातील ! – अनुप जैस्वाल, सचिव, देवस्थान सेवा समिती (विदर्भ)
मंदिरे आणि धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ मंदिर परिषदेचा विषय आतापर्यंत कुणीही हाती घेतला नव्हता. हा महत्त्वपूर्ण विषय सर्वांसमोर येण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. या परिषदेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय मंदिर परिषद घेऊन मंदिरांच्या रक्षणासाठी, तेथील मालमत्तेच्या रक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील. मंदिर परिषदेच्या माध्यमातून मंदिरांच्या संरक्षणार्थ अनेक उपक्रम उभे रहातील, याची मला निश्चिती आहे.
३. महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचे आयोजन स्वागतार्ह ! – गणेश लंके, अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती, पंढरपूर
मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचे केलेले आयोजन स्वागतार्ह आहे. सरकारीकरण झालेली मंदिरे पुन्हा हिंदूंच्या कह्यात यावीत, तसेच हिंदूंच्या मंदिरांना मिळणारे दान हिंदु धर्मासाठी वापरले जावे, तसेच सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखला जावा, यासाठी जागृत हिंदूंचे संघटन आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर ही मंदिर परिषद आवश्यक आहे. या परिषदेला मी स्वत: उपस्थित रहाणार आहे.